नाशिक येथील ज्येष्ठ संघ कार्यकर्ते श्रीधर राजाराम तथा मोहनराव भागवत (९१) यांचे दि. ३ ऑटोबर रोजी सांगली येथे दुःखद निधन झाले. त्यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना उजाळा देणारा हा लेख...
धर राजाराम तथा मोहनराव भागवत यांचे नाशिकमधील मेरी, म्हसरूळ, दिंडोरी रोड परिसरातील संघकाम उभे करणे, ते रुजवणे व ते वाढवणे यात मोठे योगदान होते.
माझी बदली नाशिक येथे मेरी परिसरातील सीडीओ कार्यालयात झाल्यावर तत्कालीन मुंबई महानगर प्रचारक मुकुंदराव पणशीकर यांनी मला, ‘मेरी’मध्ये ‘मोहनराव भागवत यांना भेट’ असे सांगितले होते. त्यानुसार माझी भेट झाली. त्यामुळे पुढे माझ्या संघकामातील प्राथमिक धडे मोहनरावांच्या मार्गदर्शनात गिरवलेले आहेत. आजदेखील अनेक बैठका व गप्पांमध्ये माझ्याकडून त्यांचा उल्लेख झाला नाही, असे होत नाही. संघकामातील चतुरस्र व्यक्तिमत्त्व कसे असावे, याचे ते आदर्श होते.
मोहनराव मूळ सांगलीचे. बेळगाव येथे ‘बीएस्सी’, ‘बीएड्’ हे शिक्षण घेऊन ते जमखंडी, कर्नाटक येथे संघाचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून गेले. तेथे सदानंद काकडे हे जिल्हा प्रचारक होते. त्यानंतर शासकीय नोकरीत आल्यावर कोयना धरण वसाहतीत त्यांची नियुक्ती झाली. कोयनानगर (सातारा) येथील शासकीय वसाहतीत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य उभे केले. याचा उल्लेख दामूअण्णा दाते यांच्या ‘स्मरण शिल्पे’ पुस्तकातही आहे. त्यानंतर ते नाशिकच्या मेरी वसाहत व परिसरात चार दशके वास्तव्यास होते. सोयीनुसार पुणे आणि संभाजीनगर येथे मुलांकडे वास्तव्यास असत. मेरी या शासकीय वसाहत परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वातावरण रुजवणे, टिकवणे व वाढवणे यात त्यांचा बहुमूल्य सहभाग आहे.
आदर्श शासकीय सेवा
‘मेरी’ या अभियांत्रिकी संशोधन संस्थेत वैज्ञानिक अधिकारी म्हणून प्रदीर्घ सेवेत असताना ‘काँक्रीट टेक्नोलॉजी’ या विषयावरचे ते अधिकारी मानले जात. महाराष्ट्रभरात या विषयावर शासकीय, तसेच खासगी आस्थापनेतील अभियंत्यांसाठी त्यांनी दोन हजारांवर व्याख्याने दिलेली आहेत. शासकीय नोकरीत वरिष्ठांशी स्नेहपूर्ण संबंध, सहकार्यांशी मित्रत्वाचे संबंध व कर्मचार्यांशी आत्मीयतेचे संबंध व पालकत्वाची भूमिका हे त्यांचे आदर्श गुण आहेत.
कार्यकर्ता निर्माण
आमच्या मेरी कॉलनीतील वास्तव्यात माझ्यासह अनेकांच्या मनावर संघ संस्कारांची त्यांनी मशागत केली. या वसाहतीतील सुमारे १५० जणांची गंगाजळी व्यवस्था त्यांनी लावून धरली. गटनायक रचना करणे, गटनायकाला दरमहा सक्रिय ठेवणे, गटनायकाबरोबर त्याच्या गटातील स्वयंसेवकांच्या भेटीस जाणे, यातून गट-पट व्यवस्थेचे महत्त्व त्यांनी सहजगत्या बिंबवले. या गटनायकाला वर्षभरातील विविध उत्सव, कार्यक्रमाच्या निरोपासाठी गृहसंपर्क करण्यास त्यांनी शिकवले.
माझा संघकामातील कार्यकर्ता म्हणून प्रारंभ मोहनरावांच्या गटनायक रचनेतून झाला आहे. कार्यकर्ता म्हणून विकास होताना मोहनराव यांच्या प्रारंभिक संघ सहवास व मार्गदर्शनाचा लाभ शाखा, नगर, शहर, जिल्हा, विभाग, प्रांत अशी माझी वाटचाल होताना झाला.
उपक्रमशील ‘साप्ताहिक मिलन’
त्यांच्या प्रेरणेने मेरी वसाहतीत चालणार्या ‘साप्ताहिक मिलना’द्वारे संघाचे विविध उत्सव, उपक्रम होत. या सर्वांत स्वयंसेवक पुढे असत. कौशल्याने ते सर्वांचा सहभाग घडवून आणत. त्यांच्यामुळेच आम्हाला राजाभाऊ गायधनी, नानाराव ढोबळे, सदानंद काकडे, अनंतराव देवकुळे, हरिभाऊ वझे आदी मान्यवर संघकार्यकर्त्यांचे बौद्धिक वर्ग व अनौपचारिक गप्पा ऐकण्यास मिळाले.
स्वतः मोहनराव यांचा विविध विषयांवरचा व्यासंग अफाट होता. संघ विषयावरच त्यांचे सतत चिंतन चालू असे. त्याचबरोबर इतिहास व भूगोल हे विषय त्यांच्या आवडीचे होते. प्रत्येक ‘साप्ताहिक मिलना’त अनौपचारिक गप्पांमध्ये त्यांनी संघविषयक माहितीपर, प्रबोधन व ध्येयवादात्मक विषयांची केलेली मांडणी ही आमच्या मनावर खोल संस्कार करून गेली. संघातील अनेक विषयांचा अभ्यास करण्याची प्रेरणा त्यांच्याकडून मिळाली. त्यांना शहरात व ग्रामीण जिल्ह्यांत अनेक ठिकाणी बौद्धिक वर्ग, विषय मांडणीसाठी बोलावत. ते स्वतःच्या स्कूटरने जाताना आमच्यापैकी कोणाला तरी घेऊन जात. सहप्रवासातील व विषय मांडणीतील हा आनंदानुभव मी अनेकवेळा घेतला आहे.
मेरी कॉलनीतील कोजागरी ही सर्वांच्या आकर्षणाचा विषय असे. पटावर असलेले स्वयंसेवक व इतरवेळी कुठेही न येणारे अधिकारी, कर्मचारी असे सुमारे दोन-२५० जणांचे भरपूर स्पर्धात्मक खेळ ते घेत असत. त्यानंतर विषय मांडणी होत असे.
हाडाचे मुख्य शिक्षक
हेमंत शिबिरात मोहनराव वयाच्या ज्येष्ठत्वामुळे स्वयंपाक घरातील कामे व बौद्धिक विभागातील कामे घेत असत. परंतु, ते संघकार्यातील हाडाचे मुख्य शिक्षक होते. खेळ घेण्याची त्यांची वेगळी शैली असे. वैविध्यपूर्ण खेळ, त्याला साजेशी कॉमेंट्री, स्वतःचे चापल्य हे सगळे त्यांच्याकडून आम्ही अनुभवलेले आहे. हिवाळी शिबिरात तरुण शिक्षकांना बालांचे ‘गण’ घ्यावे लागतात. या तरुण शिक्षकांना त्यामुळे स्वतः खेळता येत नाही, हे लक्षात घेऊन त्यांनी नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर येथील शिबिरात मुख्य शिक्षकाला विनंती केली की, हे सगळे तरुण शिक्षक माझ्याकडे एक तास द्या. कारण, त्यांना शिक्षक झाल्यामुळे मनमुराद खेळता येत नव्हते. मोहनरावांनी मैदानावर सर्वांना बाजूला बसून फक्त या शिक्षकांना एक तास मनसोक्त खेळवले. तासाभरात खेळांचे विविध प्रकार, खेळ बदलण्याची हातोटी, सूचना देण्याची मार्मिक शैली हे सर्वच कोणत्याही मुख्य शिक्षकाला आदर्श वाटेल असे होते. असे त्यांच्यातील संघकार्यपद्धतीचे असे एक ना अनेक गुण अनुभवता आले.
समाजव्यापी संघटन
वसाहतीत संघ वातावरण टिकून राहण्यासाठी विविध उपक्रमांची जोडणी त्यांनी केलेली होती. त्यात प्रतिवर्षीची आकर्षक अशी खिचडी बैठक, कोजागरी उत्सव, ‘विश्व हिंदू परिषद दिनदर्शिके’च्या विक्रीची प्रत्येक घरी व्यवस्था इत्यादी अनेक उपक्रम त्यांनी राबविले. मेरी कॉलनीतील लोकमान्य वाचनालय, किराणा मालाची सामूहिक खरेदी, श्रीगणेश मंदिराची स्थापना व त्याची नियमित पूजा व उत्सव, कॉलनीतील रहिवाशांसाठी दर सप्ताहाला १६ एमएम प्रोजेटरवर हिंदी चित्रपटांची मेजवानी, दिवाळीत किफायतशीर भावाने सामूहिक फटाका विक्री, त्यातील नफा सेवाकार्यास देणगी देणे, असे अनेक उपक्रम सहकार्यांना बरोबर घेऊन त्यांनी राबवलेले आहेत. संघसंस्कार समाजव्यापी परिवर्तनासाठी कसे उपयुक्त असतात, त्याचा अनुभव यातून आम्हाला मिळाला.
नव्वदी कार्यक्रम
मागील वर्षी पुण्यातील सनसिटी परिसरातील प्रभात शाखेवर त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने मी उपस्थित होतो. त्यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले. खूप आनंद वाटला. या कार्यक्रमात त्यांनी जुने ओजस्वी राष्ट्रप्रेमाचे एक छोटे गीत सांगितले. त्यांनी वयाच्या ७५, ८०, ८५व्या वाढदिवशी देणगी दिली, त्याचप्रमाणे केरळमधील राष्ट्रविरोधकांच्या हिंसाचारात मारल्या गेलेल्या स्वयंसेवकांच्या कुटुंबीयांसाठी कार्यरत असलेल्या तेथील एका ट्रस्टला त्यांनी नव्वदीनिमित्त देणगी दिली. त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र विनायक (राजू) हे पुण्यात व दुसरे सुपुत्र विक्रम हे छत्रपती संभाजीनगर (देवगिरी प्रांत) येथे संघकार्यात सक्रिय आहेत.
दि. २ ऑटोबर रोजी विजयादशमीच्या दिवशी त्यांनी आनंदाने नागपूर येथील संघशताब्दीचा प्रकट कार्यक्रम पूर्ण पाहिला. त्यानंतर दुसर्या दिवशी त्यांचे निधन झाले. मोहनरावांचे संघसमर्पित व्यक्तिमत्त्व दीर्घायुष्यातील प्रदीर्घ कालावधी संघासाठी देऊन शांत झाले.
विनम्र श्रद्धांजली!
आमचे आदर्श म्हणजे कै. श्रीधर उर्फ मोहनराव भागवत!
‘मेरी’ (चएठख) या पाटबंधारे खात्याच्या संशोधन संस्थेचा जर कुणी इतिहास लिहिला, तर त्याला श्रीधर राजाराम उर्फ मोहनराव भागवत यांचा उल्लेख केल्याशिवाय, तो इतिहास पूर्ण होणारच नाही. आम्ही ज्यावेळी ‘मेरी’ या संस्थेत नोकरी करत होतो, त्यावेळी आमचे आदर्श म्हणजे कै. मोहनराव भागवत साहेब! मोहनराव यांच्याविषयी आदर वाटावा असे काय होते? एक म्हणजे ते त्यांच्या विषयातले ज्ञानी होते. ते नुसते ज्ञानी होते असे नव्हे, तर ते आपले ज्ञान मुक्तपणे इतरांना देत असत. शासनामध्ये हा प्रकार दुर्मीळ असतो. तुम्ही कोणतीही अडचण त्यांना विचारा, ते तुम्हाला हसत मुखाने मदत करतीलच, अशी खात्री असे. त्यांनी एखाद्या विषयाचा अभ्यास सुरू केला, तर ते संपूर्ण प्रगाढ ज्ञान प्राप्त केल्याशिवाय थांबत नसत.
मी एकदा पाटबंधारे खात्याच्या स्टाफ कॉलेजमध्ये ट्रेनिंगला गेलो होतो. तिथे भागवत यांचेस ‘सॉईल मॅकेनिक्स’ या तांत्रिक विषयावर मराठीत व्याख्यान झाले. अडीच तास ते अस्खलित मराठीत बोलले. अडीच तासांत त्या तांत्रिक विषयाच्या मराठीतून दिलेल्या व्याख्यानात त्यांनी एकही इंग्रजी शब्द वापरला नाही, तरीही ते व्याख्यान सुगम होते. जडजंबाल अजिबात नव्हते. ते शासकीय कामात आज्ञाधारक असल्याने सर्व अधिकारी वर्ग, त्यांच्यावर आणि त्यांच्या ज्ञानावर व प्रामाणिकपणे काम करण्याच्या पद्धतीवर खूश असत. ‘मेरी’च्या ‘वैज्ञानिक कर्मचारी संघटने’ची अध्यक्षपदाची निवडणूक त्यांनी त्यांच्या मनाविरुद्ध; पण लोकांच्या प्रेमाखातर लढवली होती, अन्यथा निवडणुका लढवणे, हा त्यांचा प्रांत नव्हता.
- सुरेश दीक्षित, निवृत्त वैज्ञानिक अधिकारी
-दिलीप क्षीरसागर
(लेखक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणीचे सदस्य आहेत.)