मुंबई : (Louvre Museum) फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरिसमधील प्रतिष्ठित 'लुव्र संग्रहालय' (Louvre Museum) रविवार दि. १९ ऑक्टोबर रोजी दिवसभरासाठी बंद ठेवण्यात आले. फ्रान्सच्या सांस्कृतिक मंत्री 'रचिदा दाती' यांनी आज सकाळी संग्रहालयात दरोडा पडल्याची माहिती दिली, त्यामुळेच हे पाऊल उचलण्यात आले. या दरोड्यात काही अमूल्य दागिने चोरीला गेल्याची माहिती मिळाली आहे. मात्र संग्रहालयाकडून अद्याप या घटनेवर भाष्य करण्यात आलेले नाही.
फ्रान्सच्या सांस्कृतिक मंत्री 'रचिदा दाती' यांनी आज सकाळी एक्सवर पोस्ट करत घटनेसंबंधी माहीती दिली. त्या म्हणाल्या, "आज सकाळी संग्रहालय उघडण्यात आले, तेव्हा दरोडा पडल्याचे लक्षात आले. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. संग्रहालय कर्मचारी आणि पोलीसांसह घटनास्थळाची पाहणी केली आहे."
माध्यमांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, दरोडेखोर एका स्कूटरवरून आले आणि माल लिफ्टचा वापर करून लक्ष्य केलेल्या खोलीपर्यंत पोहोचले. त्यांनी खोलीत प्रवेश करण्यासाठी खिडक्या तोडल्या, "नेपोलियन आणि महाराणीच्या दागिन्यांच्या संग्रहातील नऊ वस्तू" चोरल्या. दरम्यान त्यांनी चोरी केलेल्या दागिन्यांचे मूल्य समजले नसून त्याचा तपास सुरू आहे.
पॅरिसमधील 'लुव्र संग्रहालय' (Louvre Museum) हे जगातील काही प्रतिष्ठित ऐतिहासिक संग्रहालयांपैकी एक असून, येथे तब्बल पाच लाख कलाकृती आहेत. ज्यामध्ये मोनालिसासह जगातील बऱ्याच प्रतिष्ठित ऐतिहासिक कलाकृतींचा समावेश आहे. माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार संग्रहालयातून अमूल्य दागिने चोरीला गेले असून, केवळ सात मिनिटांत चोरट्यांनी दागिने लंपास केले.