बदलापूर : ( Badlapur Railway ) कर्जत रेल्वे यार्डच्या रिमॉडेलिंगचे काम येत्या ३-४ दिवसांत पूर्ण होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली असून, लोकल उशीरा येत असल्यामुळे बदलापूर येथील रेल्वे प्रवाशांची गैरसोय टळणार आहे, अशी माहिती माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली. मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक हिरेश मीना यांच्याबरोबर दूरध्वनीवरून कपिल पाटील यांनी आज संवाद साधला.
कर्जत रेल्वे यार्डच्या रिमॉडेलिंगच्या कामामुळे लोकल सेवा विस्कळित झाली होती. त्याचा बदलापूरमधील प्रवाशांना मोठा फटका बसला होता. पहाटेपासून सकाळपर्यंत कर्जतहून येणाऱ्या लोकल विलंबाने येत होत्या. तर सायंकाळीही अनेक वेळा अर्धा तास लोकल सेवा उशीराने असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत होते. या पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना प्रवाशांची व्यथा सांगितली. कपिल पाटील यांच्या आजच्या बदलापूर दौऱ्यात काही प्रवाशांसह भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक हिरेश मीना यांच्याबरोबर संवाद साधला.
हेही वाचा - औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नाव आता छत्रपती संभाजीनगर
कर्जत यार्डच्या रिमॉडेलिंगचे काम सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळेत न घेता अन्य वेळात घ्यावे, अशी मागणी कपिल पाटील यांनी केली. त्यावेळी त्यांनी येत्या तीन ते चार दिवसांत काम संपणार असल्याची माहिती दिली. तसेच लोकल सेवांचे वेळापत्रक सुरळीत करण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्न करीत असल्याचे आश्वासन दिले.
बदलापूर रेल्वे स्थानकातील सरकते जिने व लिफ्ट बंद असल्यामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयींकडेही कपिल पाटील यांनी लक्ष वेधले. त्यावेळी या संदर्भात रेल्वे स्थानकात काम करणाऱ्या मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या(एमआरव्हीसी) अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातील, असे आश्वासन हिरेश मीना यांनी दिले.