विज्ञानाच्या नवा अध्यायाचा ‌‘नोबेल‌’ गौरव

    19-Oct-2025
Total Views |
NOBEL
(वैद्यकशास्त्रातील ‌‘नोबेल‌’चे मानकरी : शिमोन साकागुची, फ्रेड रॅम्सडेल आणि मेरी ई. ब्रुंको)
 
प्रत्येक शक्तिशाली गोष्ट नियंत्रणात ठेवली पाहिजे, नाहीतर एकेदिवशी ती स्वतःचे स्वतःवर हल्ला करून स्वतःचा विनाश करू शकते.” हे वाक्य केवळ सामाजिक वास्तवाशी सुसंगत नाही, तर 2025 सालामधील वैद्यकशास्त्रातील ‌‘नोबेल‌’ पुरस्काराचे सर्वांत अचूक वर्णन ठरते. यंदाचे ‌‘नोबेल‌’ विजेते अमेरिकन शास्त्रज्ञ मेरी ई. ब्रुंको आणि फ्रेड रॅम्सडेल तसेच, जपानी शास्त्रज्ञ शिमोन साकागुची यांनी मानवाच्या रोगप्रतिकार प्रणालीबद्दल केलेला शोध हे दर्शवतो की, आपल्या शरीरातील सर्वांत बलाढ्य शक्ती म्हणजे, आपली प्रतिकारशक्ती आणि तिचे योग्य नियंत्रण हेच आरोग्याचे मूळ आहे. जन्मापासून चार वर्षांपर्यंत एखाद्या बालकावर चार हजारांपेक्षा अधिक विषाणू, जीवाणू आणि रोगजनक हल्ला करतात. या सगळ्यांना तोंड देणारी व्यवस्था म्हणजे आपली रोगप्रतिकार प्रणाली (Immune System). पण, हीच शक्ती जर नियंत्रणाविना राहिली, तर ती स्वतःच्या पेशींवरच हल्ला करते, ज्यातून स्वयंप्रतिकार रोग (Autoimmune Diseases) निर्माण होतात.

साकागुची यांनी सर्वप्रथम दाखवून दिले की, आपल्या शरीरातील काही टी-पेशी (T-cells) या फक्त बाहेरील शत्रूंशी लढत नाहीत, तर आपल्या स्वतःच्या शरीरावर हल्ला होऊ नये, म्हणून इतर पेशींना नियंत्रित ठेवतात. या विशेष पेशींना ‌’Regulatory T-cells' (Treg Cells) असे म्हटले जाते. ब्रुंको आणि रॅम्सडेल यांनी पुढे या पेशींची कार्यपद्धती उलगडून दाखवली आणि याच संशोधनाने अनेक रोगांच्या उपचारांना नवा पाया दिला. या शोधाचा तात्त्विक अर्थ फार खोल आहे; प्रत्येक प्रणाली, मग ती जैविक असो वा सामाजिक, स्वतःच्या शक्तीवर नियंत्रण ठेवते, तेव्हाच ती निरोगी राहते.

आपण स्मार्टफोनवर बोट फिरवतो आणि क्षणात स्क्रीन प्रतिसाद देते. या वेगवान कृतीमागे केवळ न्यूरोलॉजी आणि संवेदनाच नाही, तर क्वांटमस्तरीय भौतिकशास्त्र लपलेले आहे. या वषचे भौतिकशास्त्रातील ‌‘नोबेल‌’ विजेते ब्रिटिश-अमेरिकन शास्त्रज्ञ जॉन क्लार्क, मिशेल एच. डेवोरे आणि जॉन एम. मार्टिनिस यांनी सुपरकण्डक्टिंग सर्किट्समध्ये ‌‘क्वांटम टनेलिंग‌’ आणि ‌‘एनज क्वांटायझेशन‌’ हे घटक प्रयोगाने सिद्ध केले. त्यांचे मूलभूत संशोधन आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा पाया आहे. ‌‘क्वांटम कम्प्युटिंग‌’ अत्यंत संवेदनशील सेन्सर्स आणि ऊर्जेची कार्यक्षम साठवण ही सर्व तंत्रज्ञाने त्यांच्या प्रयोगांवर उभी आहेत. आज आपण वापरत असलेले स्मार्टफोन, संगणक किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारी यंत्रणा या सर्वांच्या मुळाशी हाच विज्ञानाचा पाया आहे. या संशोधनाने भविष्यातील क्वांटम संगणकांचे युग उघडले आहे, जे आजच्या सुपरकम्प्युटरपेक्षा लाखोपट वेगवान आणि कमी ऊर्जा वापरणारे असतील. यामध्ये पुन्हा तीच संकल्पना दिसते, ऊर्जेचा आणि माहितीचा वेगवान प्रवाह नियंत्रणात ठेवणे म्हणजे प्रगती.

जगासमोर दोन गंभीर संकटे आहेत; हवामान बदल आणि पाण्याची टंचाई. याच संदर्भात यंदाचा रसायनशास्त्रातील ‌‘नोबेल पुरस्कार‌’ सुसुमु कितागावा (जपान), रिचर्ड रॉब्सन (ऑस्ट्रेलिया) आणि ओमर एम. याघी (अमेरिका) या तिघांना मिळाला. त्यांनी शोधलेला पदार्थ म्हणजे, ‌’Metal-Organic Frameworks (MOFs).‌’ हा पदार्थ धातू आयन (Metal Ions) आणि सेंद्रिय संयुगांच्या (Organic Linkers) साहाय्याने बनवलेला त्रिमितीय (3D) जाळ्यासारखा असतो. त्याची खासियत म्हणजे, तो हवेतून कार्बन डायऑक्साईड शोषून साठवू शकतो, तसेच आर्द्र हवेतून पाणी गोळा करू शकतो. कोरड्या आणि दमट प्रदेशातील पाण्याच्या समस्येवर हा शोध मोठा उपाय ठरू शकतो. याशिवाय, हा पदार्थ हायड्रोजन साठवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो. म्हणजेच, भविष्यातील हायड्रोजन-ऊर्जेवर चालणाऱ्या बस, कार किंवा औद्योगिक यंत्रणांसाठी तो अत्यावश्यक ठरेल. औषध वितरणातसुद्धा हे फ्रेमवर्क औषध हळूहळू आणि अचूक ठिकाणी पोहोचवण्यासाठी उपयोगी पडू शकते. हा शोध दर्शवितो की, निसर्गातील समस्या सोडवण्यासाठी उपायसुद्धा निसर्गाच्या घटकांमधूनच शोधता येतात, योग्य नियंत्रण आणि संरचना वापरून.

या वषच्या ‌‘नोबेल‌’ पुरस्कारांनी विज्ञानाच्या तिन्ही शाखांमध्ये जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र एक अद्भुत साम्य दाखवले आहे. तिन्ही संशोधनांचा मूळ संदेश एकच आहे; शक्ती असलीच पाहिजे; पण ती योग्य नियंत्रणात असली पाहिजे.

वैद्यकशास्त्र आपल्याला शिकवते की, शरीरातील शक्ती (प्रतिकारशक्ती) जर नियंत्रणात नसेल, तर ती विनाश घडवते. भौतिकशास्त्र सांगते की, ऊर्जेचा प्रवाह आणि माहितीचा वेग नियंत्रणात आणल्यास यंत्रे बुद्धिमान बनतात. रसायनशास्त्र दाखवते की, वातावरणातील घटक नियंत्रित करून आपण पृथ्वीच्या संतुलनाचे रक्षण करू शकतो. या तिन्ही क्षेत्रांनी मिळून मानवजातीसमोर एक नवा विचार ठेवला आहे. नियंत्रणाशिवाय शक्ती ही विनाशक असते, पण नियोजित शक्ती ही सृजनाची मूळ आहे.

मानवाच्या प्रगतीचा पुढचा टप्पा

मानवाने अग्नी शोधला, ऊर्जा साधली, रोगांवर विजय मिळवला; पण आता तो आपल्या स्वतःच्या शक्तींना समजून त्यांना संतुलित ठेवण्याच्या टप्प्यावर पोहोचला आहे. 2025 सालचे ‌‘नोबेल‌’ पुरस्कार या प्रवासातील महत्त्वाचे टप्पे ठरतात. शरीरातली जैविक शक्ती नियंत्रणात आणण्याचे तंत्र (मेडिसीन) सूक्ष्म स्तरावर ऊर्जेचा प्रवाह नियंत्रित करण्याचे तंत्र (भौतिकशास्त्र) वातावरणातील रासायनिक घटकांवर नियंत्रण ठेवण्याचे तंत्र (रसायनशास्त्र) या तिन्हींचा संगम म्हणजे सतत टिकणारी आणि संतुलित प्रगती.शेवटी, आज विज्ञान केवळ प्रयोगशाळेत सीमित नाही; ते आपल्या आरोग्यात, आपल्या स्मार्टफोनमध्ये आणि आपल्या वातावरणात एकत्र नांदत आहे. 2025 सालच्या ‌‘नोबेल‌’ पुरस्कारांनी आपल्याला दाखवून दिले आहे की, विज्ञानाचे खरे सामर्थ्य केवळ शक्तीत नाही, तर त्या शक्तीचे संतुलन राखण्यात आहे. अर्थातच, हा संतुलनाचा धडा केवळ प्रयोगशाळेतच नाही, तर समाजात, तंत्रज्ञानात आणि प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातही तितकाच लागू होतो.

- डॉ. नानासाहेब थोरात
(लेखक आयर्लंडमध्ये आरोग्य विज्ञान प्राध्यापक-संशोधक आणि ‌‘रॉयल सोसायटी ऑफ मेडिसीन, लंडन‌’चे ‌‘फेलो‌’ आहेत.)