२०२५ हे वर्ष रा. स्व. संघाचे शताब्दी वर्ष. याच वर्षी डॉ. सचिन नंधा यांचा ‘हेडगेवार : ए डेफिनिटिव्ह बायोग्राफी’ हा ग्रंथ प्रकाशित झाला. शताब्दी वर्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आणि आद्य सरसंघचालकांवर आशय आणि ऐतिहासिक तपशील या दोन्ही बाबतीत सघन स्वरूपातील ग्रंथाचे प्रकाशन, तेही इंग्रजी भाषेत झाले. ही संघाच्याच नव्हे, तर संपूर्ण भारतीय समाजाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण घटना म्हणता येईल. त्या ग्रंथाचे हे परीक्षण...
हेडगेवार : ए डेफिनिटिव्ह बायोग्राफी’ या ग्रंथाचे महत्त्व यासाठी की, अशा स्वरूपाचा सखोल अभ्यासपूर्ण इंग्रजी ग्रंथ आजवर संघाच्या संस्थापकांवर लिहिला गेला नव्हता. देशाच्या आणि जगाच्या दृष्टीने पुढील कालखंडात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आणि हिंदू समाजविचाराचे महत्त्व वाढतच जाणार असून, त्यावर शास्त्रीय व चिकित्सक दृष्टीने अभ्यास करू इच्छिणार्यांसाठी हा ग्रंथ अमूल्य संदर्भ साहित्य ठरेल. यासाठी लेखक महोदयांचे मनःपूर्वक आभार आणि हार्दिक अभिनंदन!
डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे सांगोपांग चरित्र हा ग्रंथाचा बाह्य ढाचा असून, त्या अनुषंगाने लेखकाने हेडगेवारांच्या शैशव व बाल्यकाळापासून तारुण्य, शिक्षण, क्रांतिकार्य, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील कार्य, त्यांच्यावर डॉ. मुंजे आदी अनेक ज्येष्ठ राष्ट्रीय नेतृत्वांचा असलेला प्रभाव, इतर राष्ट्रीय नेतृत्वांशी त्यांचे संबंध, हेडगेवारांचे समाज आणि राष्ट्राच्या स्थितीबद्दल असलेले मूल्यमापन, व्यक्तिगत विचार, हिंदू समाजविचाराचे डॉ. हेडगेवार यांना आलेले निराळे भान, संघाच्या स्थापनेपर्यंतचे चरित्र, त्यानंतरचे डॉटरांचे विचार, कार्य आणि कर्तृत्व, एकूण संघाची व्यवस्थात्मक रचना निर्माण करताना डॉ. हेडगेवार यांनी सातत्याने केलेला हिंदू समाजमनाचा विचार, त्याला एक राष्ट्र-समाज म्हणून राष्ट्रीय भान देण्यासाठी राष्ट्रबांधणीकडे नेणारी शाश्वत व्यवस्था म्हणून केलेला संघाचा विचार, अशा अनेक महत्त्वाच्या पैलूंवर साद्यंत व साकल्यपूर्ण अभ्यासातून लेखकाने प्रकाश टाकला आहे. हा ग्रंथ खरोखरच प्रत्येक जिज्ञासू भारतीयाने वाचावा व समजून घ्यावा असाच आहे. ग्रंथातील प्रकरणे व त्यांच्या विषयावर चर्चा न करता, या ग्रंथातून लेखकाला ज्या तीन महत्त्वपूर्ण गोष्टी वाचकांपर्यंत, अभ्यासकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत, त्यांचा आपण विचार करू.
यातील सर्वांत पहिला विचार म्हणजे, सामाजिक भांडवलाचा विचार. आपण समाज म्हणून जगत असताना एका मोठ्या, ऐतिहासिक समाज-संस्कृतीचा म्हणजेच, सभ्यतेचा भाग असतो. हिंदू समाज आणि हिंदूंचा भारत अशा विशाल समाज-संस्कृतीचे, सभ्यतेचे जिवंत उदाहरण. या समाजाचे स्वतःचे सांस्कृतिक संचित आहे. त्यातून समाजधारणा करणारा धर्म निर्माण झाला आहे. त्यातून सामाजिक आदर्श, मूल्ये निर्माण झाली. ही आपली सामाजिक उत्क्रांतीची प्रक्रिया आहे. साहचर्य, सहवास, सहजीवन आणि त्यातून सहकार अशी सामाजिक विकासाची व राष्ट्रनिर्मितीची घट्ट वीण हिंदू समाजमनाने निर्माण केली. समाजच समाजाचा निर्माता, कर्ता आणि धर्ता आहे, तोच विनाशकही आहे आणि संरक्षकही. संपूर्ण हिंदू समाजच जणू कल्पवृक्ष आहे. त्यामुळे अशा समाज-संस्कृतीचे रूपांतरण राष्ट्रात होताना ते लोकतांत्रिक राष्ट्र स्वरूपात होणे, हे नैसर्गिकही आहे आणि शास्त्रीयही. हा विकास घडून येण्यासाठी आवश्यक ऊर्जा, बुद्धी, मानसिक उर्मी, साधने आणि आध्यात्मिक शक्ती समाज स्वतःच देतो. ही निर्मिती करण्याची शक्ती म्हणजे सामाजिक भांडवल!
‘सोशल कॅपिटल’ ही मुळात पाश्चात्य संकल्पना. हिलरी पुटनाम, बोर्ड्यू अशा विद्वानांनी २०व्या शतकातील पाश्चात्य लोकशाही समाजांच्या विकासाचा राजमार्ग म्हणून हा सिद्धांत मांडला. लेखक डॉ. सचिन नंधा यांनी या सिद्धांताचा साकल्याने विचार करून डॉ. हेडगेवारांनी या स्वरूपाचा विचार कसा केला असेल, याची सखोल व साक्षेपी मांडणी केली आहे. याच विचाराला पुढे विकसित करत, सचिन नंधा यांनी परंपरानिष्ठ परिवर्तनवाद किंवा इंग्रजीत ‘प्रोग्रेसिव्ह कॉन्झर्व्हेटीजम’ ही संकल्पना निर्माण केली आहे. या संकल्पनेवर त्यांचे विद्वतपूर्ण शोधनिबंधही आहेत. आपल्या समाज-संस्कृतीच्या मूलभूत सत्याशी, आदर्शाची, ऐतिहासिक गाभ्याशी आणि विकसिक मूल्यव्यवस्थेशी कोठेही फारकत न घेता, त्याचे पुनर्चिंतन करून स्थिती-कालसापेक्ष पुनर्मांडणी करणे, राष्ट्र म्हणून विकासाला गती देण्यासाठी आधुनिक विज्ञाननिष्ठ, पण शाश्वत आणि मूलभूत व्यवस्थेची निर्मिती करणे म्हणजे परंपरानिष्ठ परिवर्तनवाद. डॉ. हेडगेवार यांनी केलेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना, त्यांचा याबात विचार आणि निर्माण केलेली संघव्यवस्था या इतिहासाची मांडणी लेखक वरील सिद्धांताच्या अनुषंगाने करतात. हा अभ्यास अभूतपूर्व ठरतो आणि पुढे तिसरा महत्त्वाचा निष्कर्ष लेखक देतात. सचिन नंधा यांच्या मते, डॉ. हेडगेवार हिंदू समाज-संस्कृतीचा विचार बृहद् संस्कृती-सभ्यता आणि त्या सभ्यतेचे राष्ट्र या अंगाने करत होते.
डॉ. हेडगेवारांना ‘समाज-सांस्कृतिक राष्ट्र’ अधिक अभिप्रेत होते. या राष्ट्राचे ‘राज्य किंवा राज्यशासन’ हा त्यांच्या विचाराचा गाभा नव्हता. काही प्रमाणात असला, तरी तो प्रासंगिक स्वरूपाचा होता. हिंदू समाजाचे समाज-सांस्कृतिक राष्ट्र म्हणून आधुनिक स्वरूपाचे, सुयोग्य, अनुशासित व ‘राष्ट्र सर्वोपरी’ मानणारे संघटित स्वरूप हेडगेवारांना निर्माण करायचे होते आणि त्यात ते यशस्वी ठरले. अशा तीन सैद्धांतिक पातळ्यांवर उभे केलेले डॉ. हेडगेवार यांचे चरित्र, लेखक म्हणतात त्याप्रमाणे खरोखरच ‘डेफिनिटिव्ह’ म्हणजेच निश्चित आणि अविवाद्य स्वरूपाचे आहे, यात शंका नाही.
संपूर्ण वाचनात फक्त एकच हुरहूर जाणवते ती म्हणजे, लेखकाने आपल्या लेखनात बृहद् हिंदू समाजाच्या राष्ट्र म्हणून उभ्या राहिलेल्या लोकचळवळीचा आणि जनप्रवाहाचा विचार पूर्ण स्वरूपात केलेला नाही. डॉ. हेडगेवार, त्यांचे कार्य आणि कर्तृत्व व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना, बृहद् लोक चळवळीचाच विलक्षण आविष्कार होता. त्या कालखंडात हिंदू समाजविचाराचा अनेक पातळ्यांवर विचार होत होता. तत्कालीन समाज-विचार, डॉ. हेडगेवारांनी त्याला दिलेला प्रतिसाद व नवा अर्थ बृहद् हिंदू समाजविचाराच्या अभ्यासातून अधिक सुस्पष्ट होतो. उदाहरण द्यायचे झाल्यास ‘सविनय कायदेभंग आंदोलना’त आपण व्यक्तिगत पातळीवर सहभागी होऊ, संघ म्हणून नाही असा डॉ. हेडगेवारांनी आणि संघाने घेतलेला निर्णय. यावर राजकारणाच्या अंगाने विचार केला जातो; पण तत्कालीन हिंदू समाजविचाराच्या अनुषंगाने या निर्णयाचा अर्थ लावून गेल्यास हेडगेवारांनी केलेली सखोल चिकित्सा अधिक स्पष्ट होते. ‘सत्याग्रह’ ही गांधीवादी आंदोलनाची मूलभूत संकल्पना.
हिंदू समाजाच्या व दर्शनिकतेच्या ‘व्यक्तिगत अस्तित्ववाद आणि सत्य’ या गाभ्याशी पूर्ण बांधील अशी संकल्पना. या संकल्पनेवर आधारित कोणतेही आंदोलन व्यक्तिगत सत्य आणि अस्तित्ववादाशी पूर्ण भिडलेले राहते. अशा आंदोलनात एखादी संस्था किंवा संघटना म्हणून उतरणे योग्य नाही. तिथे एक व्यक्ती म्हणून वैयक्तिक पातळीवरच स्वतःला झोकून देता येते. हे त्या आंदोलनाचे बलस्थानही आहे आणि दुबळेपणही. अशा स्वरूपाची चिकित्सा या ग्रंथात अधिक सखोल रूपात हवी, असे राहून राहून वाटते. पण, असे केल्याने ग्रंथ ऐतिहासिक चरित्र कमी आणि वैचारिक चरित्र जास्त होऊ शकतो. त्यामुळे लेखकाने या दृष्टीने निर्णय घेतलेला दिसतो.
एकूण हा ग्रंथ सामान्यांना तर वाचनीय आहेच; पण त्याचबरोबर अभ्यासक आणि संशोधकांसाठी ग्रंथाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या ग्रंथावर देशभरातून अधिकाधिक विद्वतचर्चा घडून येणे व हिंदी तसेच, सर्व भारतीय भाषांमध्ये भाषांतर होणे आवश्यक वाटते.
लेखक : सचिन नंधा
प्रकाशक : विंटेज बुस, ऍन इम्प्रिंट ऑफ पेंग्विन रॅण्डम हाऊस
वर्ष व आवृत्ती ः २०२५, पहिली आवृत्ती
पृष्ठसंख्या : ४३२ पाने
भाषा : इंग्रजी
मूल्य : ९९९ रुपये
- राजस वैशंपायन