हिंदू-बौद्ध सगे भाई, दुजेपन की बात कहाँ से आई?

19 Oct 2025 12:46:25
Hindu and Buddhist 
 
धम्मचक्र प्रवर्तन म्हणजे धर्मपरिवर्तनाबद्दल समाजातला एक गट म्हणतो, ‘आम्ही दीक्षा घेतली, आता वेगळे आहोत;’ तर एक गट म्हणतो, ‘त्यांनी दीक्षा घेतली म्हणजे, ते वेगळे आहेत.’ पण, तार्किकदृष्ट्या आणि वास्तविकदृष्ट्याही सत्य काय आहे? तर सत्य आहे की, दि. १४ ऑक्टोबर हा ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ म्हणजे एका अर्थी ‘राष्ट्रीय एकात्मता दिन’ आहे. त्यासंदर्भातला मागोवा घेणारा हा लेख...
 
१४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसोबत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या घटनेस ‘धम्मचक्रम प्रवर्तन’ म्हणतात. प्रवर्तन म्हणजे, पुढे जाणे. हे पुढे जाणे कशासाठी, तर सत्यासाठी, न्यायासाठी आणि मानवतेसाठी. धर्माचे सत्यचक्र सातत्याने गतिमान असते. ते धम्मचक्र सातत्याने पुढे जाणे म्हणजे ‘धम्मचक्र प्रवर्तन’ होय. हे असे असताना, या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे नाव घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे हिंदूविरोधी होते, हे दाखवण्याचा अट्टाहास काही लोक करतात. खरे तर हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा अपमानच. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे एक विधान प्रसिद्ध आहे. ते म्हणाले होते, "मी या देशाला कमीत कमी धोका होईल, असा मार्ग स्वीकारला. बौद्ध धर्म हा भारतीय संस्कृतीचाच भाग आहे, देशाच्या संस्कृती, इतिहास यांच्या परंपरेला धक्का लागणार नाही, अशी मी खबरदारी घेतली आहे.” बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे, खरंच ती खबरदारी देशाच्या ऐक्यासाठी महत्त्वाची आहे. ‘हिंदू-बौद्ध सगे भाई, दुजेपन की बात कहाँ से आई?’
 
मात्र, या धम्मदीक्षेचा चुकीचा अर्थ घेऊन हिंदू आणि बौद्ध बांधवामध्ये दुही पसरवण्याचे काम काही लोक सातत्याने करीत असतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, ‘बौद्ध, मुस्लीम भाई-भाई, हिंदू कौम कहाँ से आई,’ असे विचार समाजात पसरवणारेे. खरे तर बौद्ध आणि हिंदूंचे नाते हे सर्वांत पहिले आणि नंतर आणि कायमचेही बंधुत्वाचेच असणार आहे. याबाबत ‘समस्त हिंदू आघाडी, पुणे’चे संस्थापक मिलिंद एकबोटे म्हणतात की, "बौद्ध-मुस्लीम भाई-भाई हिंदू कोम कहाँ से आई’ यापेक्षा ‘हिंदू-बौद्ध सगे भाई दुजेपन की बात कहाँ से आई,’ हे सत्य आहे.” त्यांचे म्हणणे बरोबरच आहे. हिंदू आणि बौद्ध हे साधे भाई-भाई नाही, तर एकाच आईची लेकरं आहेत. ती आई आहे भारतीय संस्कृती, भारतीय इतिहास.
 
भारताच्या मातीत जन्मलेला आणि हिंदू संस्कृतीच्या जीवनपद्धतीच्या संस्काराने संस्कारीत झालेला बौद्ध धम्म हा परका नाही. जगाला धम्माचा प्रकाश देणारे तथागत गौतम बुद्ध आणि बुद्ध धम्माची दीक्षा अनुयायांना देणारे पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म, बालपण आणि आयुष्य हे या भारतीय मातीच्या मूळच्या संस्कार आणि संस्कृतीनेच घडलेले होते. जन्मभूमीचे संस्कार आणि इतिहास यांचा वारसा त्यांच्यातही होताच. दोघांनीही प्राप्त परिस्थितीमध्ये धर्म म्हणून जे काही आहे, त्यातले अडथळे दूर करण्याचा प्रयत्न केला. समाजाला नवचेतना दिली. त्या चेतनेमध्ये अर्थातच त्यांच्या मूळ संस्कारांचा अंतरात्मा जिवंत होताच.
 
त्यामुळे समाजाला नवदिशा देणारी ही चेतना भारतीय संस्कारांनी आणि धर्मप्रेरणेने अभिभूतच होती आणि आहे. असाही उल्लेख आहे की, धम्मदीक्षा घेण्याआधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ असा गजर करणार्‍या संत गाडगे महाराजांना भेटले होते. हिंदू धर्म त्यागण्यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळी संत गाडगे महाराज जे म्हणाले, त्याचा आशय होता की, "लोकांची तुमच्यावर श्रद्धा आहे, तुमच्या एका शब्दासाठी ते जीव टाकतील. या मातीतल्या धर्माशी जोडून ठेवा.” अर्थात, जे काही करायचे, ते देशहित आणि समाजहिताचेेच असले पाहिजे, याबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा निर्णय ठाम होता. त्यामुळेच त्यांनी सौदी अरेबियाच्या वाळवंटात जन्मलेला इस्लाम किंवा इटली युरोपच्या भूमीत जन्मलेली ख्रिश्चॅनिटी स्वीकारली नाही. बाबासाहेब हिंदू धर्म त्यागणार, असे कळताच बाबासाहेबांनी इस्लाम स्वीकारावा, यासाठी तत्कालीन मुस्लीम धर्मगुरू मान्यवरांनी प्रयत्न सुरू केले, तर ख्रिश्चन धर्मीयांनीही पाठपुरावा केला. पण, बाबासाहेबांनी दोघांनाही नकार दिला.
 
त्यावेळी बाबासाहेब लाखो अनुयायांसह मुस्लीम किंवा ख्रिश्चन झाले असते तर? तर आज समाज आणि देशाची स्थिती काय असती? पण, आधीच सांगितल्याप्रमाणे, तथागत गौतम बुद्धांच्या धम्माचे नाते काही मक्का-मदिना किंवा इटलीच्या रोमशी नाही, तर ते नाते आहे, भारतीय भूमीशी आणि संस्काराशी. त्यामुळेच आजही आपण पाहतो की, कोणी कितीही फूट पाडण्याचा प्रयत्न केला किंवा हिंदू आणि बौद्ध समाजात काही मतांतरे असली, तरीसुद्धा दहशतवाद आणि नक्षलवाद तसेच, धर्मांतरण या विषयाचे बौद्ध समाज कधीच समर्थन करीत नाही. ‘मी प्रथम भारतीय आणि अंतिमही भारतीय’ हे बाबासाहेबांचे विचार समाज मनापासून मानतो. हेच काही समाजकंटकांना खटकते आणि ते हिंदू-बौद्ध असा भेद करत असतात.
 
मुख्य म्हणजे, हे सांगताना बौद्ध आणि इस्लाम यांचे सौख्य हे लोक मांडतात. पण, हे सांगताना भारतातील बौद्ध धम्म क्षीण करण्यामागे भारतावर आक्रमण करणार्‍या हिंसक इस्लामी आक्रमणकर्त्यांची भूमिका मोठी होती, हे ते सांगत नाहीत. विश्वविद्यालय नालंदा तीन महिने जळत होते. शांती, करुणेचा मार्ग सांगणारे भिक्खू आणि भिक्खूनींचे त्यावेळी शिरकाण झाले, ते कोणी केले? हिंदूंनी का? तर नाही. निशस्त्र आणि मानवतेचा प्रसार करणार्‍या बौद्ध धम्मीयांच्या गुरूंची कत्तल करणारे इस्लामिक आक्रमणकर्तेच होते. १२व्या शतकामध्ये महाबोधी विहार परिसराची विटंबना करणारा बख्तियार खिलजी हा काय हिंदू होता? भरभराटीला असलेल्या बौद्ध धम्माचे वैभव हिंसक हल्ले करून कोणी लुटले? याबद्दल कुणीही काही म्हणत नाही.
 
तथागत बुद्धांची बामियान येथील भव्य मूर्ती अफगाणिस्तानमध्ये कुणी फोडली? ‘लव्ह जिहाद’च्या घृणास्पद वास्तवात बौद्ध धर्मीय भगिनींवर अत्याचार झाल्याच्या घटना जास्त होतात. ते अत्याचार करणारे कोण आहेत? या सगळ्यांचा मागोवा घेतला, तर काय चित्र दिसते? ‘बौद्ध-मुस्लीम भाई भाई, हिंदू कोम कहाँ से आई’ हे चित्र दिसते? छे! याच्या उलट चित्र आहे. असो. सध्या दीपोत्सव सुरू आहे. यानुसार तथागतांच्या आयुष्यातली ती घटना सांगावीशी वाटते. तथागत १८ वर्षांनंतर त्यांच्या जन्मभूमीमध्ये म्हणजे, कपिलवस्तूमध्ये आले. लोकांना आनंद झाला. त्यामुळे तथागत ज्या मार्गातून प्रवास करत होते, त्या मार्गावर लोकांनी दिव्यांची रोषणाई केली. ते पाहून तथागत म्हणाले, ‘अप्पो दीपो भव’ म्हणजेच स्वयंप्रकाशित व्हा! तथागतांनी सांगितलेले हे स्वयंप्रकाशित होणे म्हणजे काय, तर ज्ञान आणि वास्तवतेचे सत्यग्रहण करणे. मनातील द्वेष, निराशा आणि नकारात्मक विचार दूर सारून, मानवी मूल्यांच्या सकारात्मकतेचे तेज निर्माण करणे. या पार्श्वभूमीवर वाटते, हिंदू आणि बौद्धांमध्ये भेदाचे विष पेरणार्‍याविरोधात समाजाने सर्वच दृष्ट्या ‘अप्पो दीपो भव’ होणे गरजचे आहे. दिवाळीच्या शुभ मंगलमय दिनी आपण संकल्प करू की, भारतीय संस्कार आणि संस्कृतीतल्या धर्मासाठी आपण ‘अप्पो दीप होऊ!’ त्यासाठी सर्वांत आधी धम्मचक्र परिवर्तन दिन म्हणजे, राष्ट्रीय एकात्मतेच्या समर्थनाचा दिन हे समजून घेतले पाहिजे. त्यासाठी सत्य समजून घेऊ ‘हिंदू-बौद्ध भाई भाई, दुजेपन की बात कहाँ से आई.’
 
आपण सगळे एकच आहोत!
 
भगवान गौतम बुद्धांनी सारनाथला जे पहिले प्रवचन दिले, त्याला ‘धर्मचक्र प्रवर्तन’ म्हणतात. त्याचा अर्थ असा होतो की, जे लोक सत्य धर्म विसरले आहेत, तो सत्य धर्म काय आहे, याची जाणीव त्यांनी सगळ्यांना करून दिली. तथागतांनी सुखी जीवनासाठी आर्य अष्टांग मार्ग सांगितला. हा मानवतेचा मार्ग सगळ्यांसाठी आहे. हिंदूसुद्धा हा मार्ग आपापल्या पद्धतीने अंगीकारतात. तसेच, भगवान बुद्धांच्या काळी ‘हिंदू’ शब्द नव्हता. त्या जीवनपद्धतीला ‘वैदिक धर्म’ म्हटले जायचे. त्यामुळे भगवान बुद्धांनी हिंदू धर्म नाकारण्याचा प्रश्न अतार्किक आहे. आपण सगळे एकच आहोत.
- रमेश पतंगे, ज्येष्ठ विचारवंत तथा लेखक
 
 
Powered By Sangraha 9.0