प्रक्रिया म्हणजेच प्रोसेस. नाटक बसवताना नेमकी त्याची काय प्रोसेस आहे, असा प्रश्न कलाकारांना पडतो. ढोबळमानाने बघायला गेलो, तर नाटकाचीही एक प्रोसेस म्हणजेच प्रक्रिया असते. बालरंगभूमीत या प्रोसेसमध्ये काही बदल करावे लागतात, तसेच काही गोष्टी नव्याने विचारातही घ्याव्या लागतात. या लेखात या प्रक्रियेचा घेतलेला आढावा...
’सर्जनशील विचारांचा विकास
१) नाटकाची स्क्रिप्ट वाचताना प्रशिक्षक विद्यार्थ्यांना नाटकाची संहिता सांगतात. तिच्यामागील आशय काय आहे, आपण काय संदेश देणार आहोत यावर सखोल विचार करायला लावतात. विद्यार्थ्यांना नाटकातील पात्रांबद्दल, तसेच त्यांच्या परस्पर संबंधांबद्दलही चर्चा केली जाते.
२) विद्यार्थ्यांना काही काल्पनिक घटना दिल्या जातात आणि त्या परिस्थितीचे नाट्यरूपात सादरीकरण करताना, त्यावर उपाय शोधण्यासाठी एकत्र काम करण्यास सांगितले जाते. त्यातूनच विद्यार्थ्यांना योग्य देहबोली व आवाजातील चढउतार यांचा अभ्यास होतो.
३) विद्यार्थ्यांना नंतर ती परिस्थिती, त्यांच्या स्वतःच्या आयुष्यातील प्रसंगांशी जोडण्यास प्रोत्साहन दिले जाते. त्या प्रसंगातून विद्यार्थी काय शिकले? हे व्यक्त करायलाही सांगितले जाते.
४) चर्चांमधून विद्यार्थ्यांचे विचार, श्रद्धा, आशा आणि भावभावना शब्दांत व कृतीतून व्यक्त होतात.
५) नाटकाची संहिता आधीच लिहिलेली असली, तरी प्रत्येक प्रसंग सादर करताना मुलांच्या कल्पनाशक्तीप्रमाणे सादरीकरणात सूक्ष्म बदल होतात. त्यांना त्या परिस्थितीचे वातावरण, त्याप्रसंगी असलेली मनःस्थिती, देहबोली, हालचाली, आवाजाचा सूर आणि सादरीकरणातील तपशील यांचा स्वतःच्या दृष्टिकोनातून विचार करावा लागतो.
६) संवाद, पार्श्वसंगीत, तालबद्ध हालचाली, नृत्य आणि सादरीकरणातील सौंदर्यात्मक घटक यांच्या माध्यमातून, सौंदर्यदृष्टी अधिक बळकट होते.
७) तालमीदरम्यान प्रत्येक विद्यार्थ्याच्या वैयक्तिक गुणांची नोंद प्रशिक्षक घेतात. त्या गुणांचा विकासही केला जातो. त्यामुळेच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि ते अधिक सर्जनशीलपणे योगदानही देतात.
प्रभावी संवादाचा विकास
१) विद्यार्थ्यांना अभिनयाचे चार प्रकार समजावले जातात : वाचिक, आंगिक, आहार्य आणि सात्त्विक
२) भाषेचे आणि शब्दांचे महत्त्व संवादांद्वारे समजावले जाते. संवादांचा उच्चार करताना मजा येईल, असे शब्द निवडले जातात. यामुळे विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्यात सुधारणा होते.
३) विद्यार्थ्यांना समजावले जाते की, अभिनय म्हणजे फक्त आपले संवाद नव्हे, तर सहकलाकारांच्या संवादांवर योग्य प्रतिक्रिया देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. यातूनच त्यांना ऐकण्याची आणि निरीक्षण करण्याची सवय लागते. ज्यामुळे त्यांचे श्रवणकौशल्य विकसित होते आणि हेच प्रभावी संवादाचे मुख्य तत्त्व आहे.
४) विद्यार्थ्यांना सांगितले जाते की, चांगलं लिहायचं असेल तर चांगलं वाचा, चांगलं बोलायचं असेल, तर चांगलं ऐका आणि चांगलं जगायचं असेल, तर आयुष्यात येणार्या चांगल्या-वाईट अनुभवांकडे विद्यार्थ्याच्या दृष्टीने बघायला शिका.
५) विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांद्वारे शब्द, देहबोली आणि आवाजातील चढ-उतार यांचा योग्य वापर शिकवला जातो.
आंतरवैयक्तिक कौशल्यांचा विकास
१) नाटक म्हणजे पात्रं, त्यांचे संबंध आणि परस्पर संवाद. याचे विश्लेषण केल्याने मुलांमध्ये सामाजिक कौशल्ये विकसित होतात.
२) विद्यार्थ्यांनी आपल्या हालचाली, संवाद, मंचावरील स्थान इत्यादी बाबत प्रशिक्षकाशी चर्चा करतात. त्यामुळे परस्परसंवादाची सवय लागते. तसेच कलाकार एकमेकांशी संवाद साधून रंगमंचावरील वावर सहज होण्यासाठी मिळून काम करतात.
३) एखाद्या दृश्याचे सादरीकरण कसे करायचे यावर चर्चेदरम्यान मतभेद होऊ शकतात. शेवटी चा लोकशाही पद्धतीनेच निर्णय घेतला जातो. त्यामुळे थोडी तडजोड होतेच
४) मागील मंचावर सेट, वेशभूषा आणि साहित्य हाताळताना,मुलं एकमेकांना मदत करतात. त्यामुळे संघभावना विकसित होते.
५) विद्यार्थ्यांना नाटकाच्या तिकीट विक्रीसाठी, छोटे प्रमोशनल व्हिडिओ तयार करण्यास सांगितले जाते. त्यामुळेही त्यांच्यात आत्मविश्वास विकसित होतो.
पटकथेसाठी आवश्यक गोष्टी
१) नाटकाची शैली काळजीपूर्वक निवडली जाते. बहुतेक नाटकांत चांगल्याचा वाईटावर विजय हाच संदेश असतो, जो मुलांना सहज पटतो.
२) विषय वयोगटाला अनुरूप असावा ही सर्वांत महत्त्वाची अट.
३) प्रत्येक पात्र महत्त्चाचे ठरले अशाच पद्धतीने पटकथा तयार केली जाते
४) नाटकात नृत्य, संगीत यांचा समावेश करून ते सर्वांंसाठीच आनंददायी बनवले जाते.
दिग्दर्शकाचा दृष्टिकोन
१) दिग्दर्शकाने पटकथा सखोल समजून घ्यावी, ती सर्वांसाठीच आकर्षक कशी होईल, हे लक्षात ठेवूनच सादरीकरणाची रूपरेषा आखली जाते.
२) पाच ते १४ वयोगटातील मुलांची शारीरिक वैशिष्ट्ये, परिपक्वता आणि सादरीकरण क्षमता यांचा विचार करून भूमिकांचे वाटप होते.
३) नवनवीन तंत्रज्ञानाचाही वापर केला जातो.
४) बालनाट्य दिग्दर्शकाने आपली भूमिका वैज्ञानिक दृष्टिकोन, सामाजिक जाण आणि निष्पक्ष मनोवृत्तीने पार पाडली पाहिजे.
५) दिग्दर्शकाचा लाडका कलाकार तोच ठरतो जो वेळ पाळतो, कलेशी निष्ठावान असतो आणि कुठलेही काम प्रामाणिकपणे करतो. मग एकवेळ अभिनय कौशल्य कमी असले तरी चालते.
बालनाट्य प्रशिक्षकाकडे खालील गुणवैशिष्ट्ये असावीत:
१) प्रसंगानुसार मार्गदर्शक, शिक्षक, दिग्दर्शक, प्रशिक्षक, मित्र, तत्त्वज्ञ, सहकलाकार अशा अनेक भूमिका निभावण्याची क्षमता.
२) संपूर्ण प्रक्रियेचा आनंद घेण्याची वृत्ती आणि आव्हानांचा स्वीकार करण्याची तयारी.
३) सर्वोत्तम पद्धतींच्या आधारे स्वतःला अद्ययावत ठेवण्याची सवय.
४) विद्यार्थ्यांशी अनौपचारिक पण आदरयुक्त नातं.
५) स्वतःच्या शारीरिक तंदुरुस्तीने विद्यार्थ्यांच्या ऊर्जेशी जुळवून घेण्याची क्षमता.
६) सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, बालमानसशास्त्राचा थोडा अभ्यास आणि मुलांविषयी वात्सल्याची भावना. तसेच आपण येणारी पिढी घडवण्याचे जबाबदारीचे काम हाती घेतल्याची जाणीव.
‘जनरेशन-अल्फा’मधील समानता आणि वैयक्तिक वैशिष्ट्ये
सध्याच्या पिढीतील काही सामान्य लक्षणे तालीम आणि प्रयोग करताना लक्षात ठेवली जातात;
१) अधीरपणा
२) भाषेचे ज्ञान तुलनेने कमी
३) प्रतिक्रिया देण्यास किंवा सूचना पाळण्यास कधी कधी उशीर
४) कधी कधी आक्रमक वर्तन
५) उघडपणे रागाचे झटके देणे
६) मोबाईल व गॅझेट्समुळे दीर्घकाळ लक्ष केंद्रित न होणे
७) सामाजिक कौशल्यांचा अभाव
८) छोट्या यशासाठीही त्वरित कौतुकाची अपेक्षा
९) ईींंशपींळेप ऊशषळलळीं कूशिीरलींर्ळींळीूं ऊळीेीवशी ची वाढती लक्षणे
१०) विरुद्ध लिंगाविषयीची लवकर जागरूकता
११) बरेचदा एकच मूल असल्यामुळे, अति लाडावलेपण
१२) कुटुंब मर्यादित राहिल्यामुळे, इतर नातेसंबंध समजून घेणे अवघड होते.
ही सर्व लक्षणे बहुतांश विद्यार्थ्यांमध्ये आज आढळतात. परंतु, त्याचे प्रमाण प्रत्येकात वेगळे आहे. त्यामुळे प्रशिक्षकाला प्रत्येक विद्यार्थ्याशी वेगवेगळ्या पद्धतीने वागावे लागते. वरील लक्षणे चिंताजनक वाटू शकतात; पण नाटक हे त्यावरचे सर्वोत्तम औषध आहे. कारण, तालीम आणि प्रयोगांमुळे मुलांमध्ये;
१) संयम वाढतो
२) एकाग्रता, मेहनतीची सवय लागते
३) सातत्याने तालीम करून उत्तम परिणाम मिळवण्याची चिकाटी वाढते
४) आनंद आणि उत्साहाचा अनुभव येतो
५) संघभावना विकसित होते
६) भाषेचा विकास होतो
७) स्वतःला आणि इतरांना समजून घेण्याची आणि नंतर पात्रात पूर्णपणे रमून जाण्याची प्रक्रिया होते, ज्यामुळे सहानुभूतीचाही विकास होतो.
८) कुठल्याही घटनेकडे तटस्थ होऊन बघण्याची सवय लागते.
९) चांगल्या कामगिरीसाठी योग्य पुरस्कार मिळतो.
निर्मिती व्यवस्थापन
विद्यार्थ्यांना नाट्यनिर्मितीतील सर्व अंगांमध्ये सामील केले जाते. प्रत्येक विभागासाठी काही विद्यार्थ्यांना नेतृत्वाची जबाबदारी दिली जाते. कधी कधी त्यांना न आवडणारी कामे दिली जातात किंवा अचानक एखादे काम करायला सांगितले जाते. विद्यार्थ्यांना कोणताही आर्थिक भार येऊ नये आणि जड वस्तू उचलण्याचे काम प्रौढ स्वयंसेवकांकडून करून घ्यावे, याची खबरदारी घेतली जाते.
विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या क्रिया पुढीलप्रमाणे आहेत;
१) सेट प्रॉपर्टी तयार करणे
२) हॅण्ड प्रॉपर्टी तयार करणे
३) वेशभूषा रचना
४) नेपथ्य लावणे व बदलणे
५) प्रयोगांदरम्यान साहित्य हाताळणे
६) मेकअप करणे
७) आपल्या सोसायटीमध्ये नाटकाचे पोस्टर्स लावणे
८) तिकीट विक्रीसाठी छोटे प्रचार व्हिडिओ तयार करणे
९) पालक व मित्रांना स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणे
ही प्रोसेस वाचताना तुम्हाला लक्षात आले असेल की, ती करताना अमाप संयम, चिकाटी आणि कलेवर नितांत प्रेम असणे हे केवळ प्रशिक्षकांमध्ये नाही, तर विद्यार्थी आणि पालकांमध्येही तितकेच गरजेचे आहे.
-रानी राधिका देशपांडे