तेथेचि झाला जाणिजे||

19 Oct 2025 13:34:58

TEMPLES
 
काशीविश्वेश्वर मंदिर म्हटले की आपल्या डोळ्यासमोर आपसुकच उभा राहतो तो उत्तर प्रदेशच्या वाराणसीतील सोन्याचा मुलामा देऊन उजळणारा मंदिराचा भव्य कळस, जो भगवान शंकराच्या आध्यात्मिक तेज आणि दिव्यत्वाचे प्रतीक मानला जातो. पण, असेच एक काशीविश्वेश्वर मंदिर महाराष्ट्रातही कऱ्हेकाठी बारामतीत स्थित आहे. याच मंदिरात शिवभक्त श्रीधर स्वामींनी 1718 साली शिवलीलामृताची रचना केली. तेव्हा, आज या मंदिराविषयी जाणून घेऊया...
 
भारताची भूमी ही नद्यांनी, संतांनी आणि मंदिरांनी पवित्र झालेली भूमी. प्रत्येक प्रदेशाने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली; पण त्या ओळखीच्या पायाशी एकच तत्त्व झळकतं, अध्यात्म संस्कृतीचा अविरत प्रवाह! महाराष्ट्राची एक महत्त्वाची नदी म्हणजे कऱ्हा. पाचगणी जवळपासच्या डोंगररांगांमध्ये हिचा उगम होतो आणि भोर, पुरंदर असा प्रवास करत बारामती मार्गे नीरेपर्यंत ही जीवनदायिनी वाहते. हिच्या काठावर अनेक महत्त्वाची मंदिरे तयार झाली, संस्कृती उदयाला आल्या, लोप पावल्या, नगरे तयार झाली आणि काळाच्या ओघात नष्टदेखील झाली. पण, या सगळ्या कथा आपल्या उराशी बाळगून ही नदी आजही वाहते आहे. या नदीने अजून एक महत्त्वाची गोष्ट प्रत्यक्ष घडताना बघितली. शिवतत्त्वाने झपाटलेला एक माणूस काही शतकांपूव या नदीकाठी ध्यानस्थ बसला, त्या मंदिरातली शांतता, शतकानुशतके गर्भगृहात झालेले संस्कार त्या व्यक्तीच्या साधनेला मदतच करत होते. साक्षात ईश्वराने रचावी अशी एक एक ओवी जन्म घेऊ लागली, प्रत्येक ओवी म्हणजे जणू स्तंभ आणि प्रत्येक अध्याय म्हणजे, मंदिराचा गुढमंडप. हे अजरामर धर्मसाहित्य म्हणजेच, लिलामृत, ध्यानस्थ बसलेला तो शिवभक्त म्हणजेच श्रीधर स्वामी आणि ज्या ठिकाणी हे सगळं घडलं ते ठिकाण म्हणजे काशी विश्वेश्वर मंदिर. याच मंदिराची ओळख आपण आज करून घेणार आहोत.
 
पुण्यापासून 100 किमी अंतरावर बारामती हे गाव. याच गावात कऱ्हा नदीच्या काठावर वसलेले मंदिर म्हणजे काशीविश्वेश्वर मंदिर. साधारण हजार वर्षांपूव या मंदिराची निर्मिती झाली. मधल्या काळात परकीय आक्रमकांकडून मोठ्या प्रमाणात या मंदिराचे नुकसान झाले, मग परत स्वराज्याच्या काळात हे मंदिर बांधले गेले. आज मंदिराचे बाह्यांग आधुनिक मराठा शैलीमधले जरी असले, तर अंतरंग हे प्राचीन स्थापत्यात आहे.
 
TEMPLES 
 
काशीविश्वेश्वर मंदिराच्या स्थापत्त्यात भारतीय शिल्पपरंपरेची प्रगल्भ अभिव्यक्ती दिसते. मंदिराचा आराखडा पारंपरिक पद्धतीनुसार नंदीमंडप, गुढमंडप, अंतराळ आणि गर्भगृह या चार प्रमुख घटकांनी बनलेला आहे. कऱ्हेच्या काठी उभ्या असलेल्या या मंदिरासमोर सुंदर दीपमाळ आहे; पण ती जीर्णोद्धार करताना बांधली गेली असावी. नंदीमंडपात चार स्तंभ असून मध्यभागी नंदीची मूत आहे. तथापि, कालांतराने झालेल्या पुनर्बांधणीत काही अतिरिक्त स्तंभ उभारले गेल्यामुळे मूळ आराखड्यात थोडासा बदल झाला आहे. तरीही त्या दगडात कोरलेल्या नंदीचे समाधानी रूप आजही भक्तांना पवित्र शांततेचा अनुभव देते.
 
मंदिराचा मधला भाग म्हणजे गुढमंडप. या मंडपाच्या द्वारशाखा त्रिस्तरी असून त्यात रत्नशाखा, लताशाखा आणि स्तंभशाखा अशा आहेत. या सर्व शाखा नक्षीकामांनी सुशोभित आहेत. द्वारांच्या तळाशी गंगा-यमुना आणि शैव द्वारपाल यांच्या प्रतिमा दिसतात, तर ललाटबिंबावर कोमलतेने कोरलेली गणेशमूत आहे. गुढमंडपात चार मुख्य स्तंभ आणि 12 अर्धस्तंभ आहेत; प्रत्येकावर विविध दृश्ये कोरलेली आहेत. कधी सुरसुंदरींचे नर्तन, कधी वीरयुद्ध, कधी भक्तिभाव. स्तंभांच्या तळभागी लहान मंदिरांच्या प्रतिकृती कोरल्या असून, वरच्या भागी भारवाहक यक्ष मूत आहेत. मंडपातील वितान म्हणजेच, छत सपाट असून त्यावर वर्तुळाकार अलंकार आहेत. चारही दिशांना असलेल्या देवकोष्ठांमध्ये दक्षिणेकडे गणेश, उत्तरेला भद्रकाली, पश्चिमेकडे नागशिल्प आणि एका कोष्ठात मराठाकालीन विष्णुमूत आहे. इथूनच आपण गर्भगृहात असणाऱ्या शिवपिंडीचे दर्शन घ्यायला जातो. या मंदिरातल्या काही शिल्पांचा परिचय आपण करून घेणार आहोत.
 
राशीचक्र शिळा : अतिशय दुमळ असे हे शिल्पं. हे त्या मंदिरात का आहे? का तयार करतात? याबद्दल अभ्यास सुरू असून, या प्रश्नांची उत्तरे आपल्याला लवकरच मिळतील. एका दगडावर समोरच्या बाजूला सात घोडे कोरलेले असतात, जे सूर्याच्या रथाचे प्रतीक आहे. आयताकृती दगडाच्या वरच्या सपाट भागावर कमळाचा आकार कोरलेला असतो, तर त्याच्या बाजूने 12 राशींची चिन्हे कोरलेली दिसतात. अशा पद्धतीच्या शिळा महाराष्ट्रातल्या खूप कमी मंदिरांमध्ये सापडल्या आहेत. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातदेखील अशी एक शिळा बघायला मिळते. त्या मंदिराचे महत्त्व लक्षात घेता, राशीचक्र शिळा मिळालेले काशीविश्वेश्वर मंदिर धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या किती महत्त्वाचे आहे, याचा अंदाज आपण लावू शकतो. दुर्दैवाने इथे असलेली शिळा ही मधोमध भग्न झालेली असून, तिला प्रयत्नपूर्वक जपून ठेवण्याची गरज आहे.
 
TEMPLES 
 
नटराज : मंडपाच्या स्तंभांवर खालच्या भागात अनेक शिल्पं आहेत. तिथेच हे नटराजाचे शिल्पं आहे. नृत्य करणारा हा शिव चतुर्हस्त असून, हातामध्ये त्याने डमरू आणि त्रिशूळ धरलेले आहेत. एक पाय दुमडून हा नृत्य करतो आहे, तर पायाशी त्याचे वाहन नंदीदेखील बसलेला आपल्याला दिसतो.
 
मरीचिका : शिकार करणारी स्त्री. स्तंभाच्या मधल्या भागात हे शिल्पं असून, हातामध्ये धनुष्य आणि बाण घेतलेली नायिका कोरलेली आहे. तिथे ज्या प्राण्याला बाण मारला आहे, तो प्राणी पळून जाताना मागे वळून तिच्याकडे बघतानादेखील कलाकाराने इथे कोरलेला दिसतो. अशाच प्रकारचे मरीचिकेचे सुंदर आणि मोठे शिल्पं गडचिरोली इथल्या मार्कंडा मंदिरातदेखील आहे.
 
महिषासुरमर्दिनी : महिषाचा वध करणारी दुर्गा हे शिल्पं अनेक मंदिरांमध्ये कोरलेले आपल्याला दिसतो. ते इथेदेखील आहे. देवी चतुर्हस्त असून तिने हातामध्ये त्रिशूळ, तलवार, ढाल आणि असुराचे मुंडके अशा गोष्टी पकडलेल्या आहेत. आपल्याला पायाखाली तिने महिषाला दाबलेले असून, त्याचे उडवलेले बैलाच्या रूपातले मुंडके तिच्या पायाशी पडलेले दिसते. या शिल्पाचा आकार छोटा असूनदेखील यात केलेले बारीक काम आणि कथेबरोबर जोपासलेली व्यक्त होण्याची प्रामाणिक शैली आपल्याला भुरळ घालतात.
TEMPLES 
 
याचबरोबर इथे चामुंडा, नरसिंह, विष्णू, भारवाहक यक्ष, सुरसुंदरी, नायिका, याचीदेखील शिल्पं आहेत. गुढमंडपात उभे असलेले स्तंभ म्हणजे, या मंदिराचा आत्मा. प्रत्येक स्तंभावर एक वेगळी कथा सांगितली गेली आहे. एका स्तंभावर हनुमान-इंद्रजित युद्ध, दुसऱ्यावर शिकारीचा प्रसंग, तर तिसऱ्यावर नृत्यरत सुरसुंदरी दिसते. या नक्षीकामात दगड जिवंत झाल्यासारखा भासतो. शिल्पकारांनी काळ्या बेसाल्ट दगडावर अतिशय बारीक आणि समतोल रेषांनी काम केलेले दिसते. हे दगड कोरण्यासाठी कठीण मानले जातात; पण एकदा कोरल्यावर ते शतकानुशतके टिकून राहतात आणि तेच इथे घडले आहे.
 
आज हे मंदिर अजूनही पूजाअर्चेने जागृत आहे; पण बाह्य भागावर आधुनिक शिखर बांधले गेल्याने मूळ शैलीचा गाभा थोडा झाकला गेला आहे, तरीही आतल्या भागातील शिल्पकलेचा थाट अविचल आहे. आपली जबाबदारी केवळ पूजा करणे नाही, तर या वारशाची जपणूक करणे आहे. मंदिराभोवती स्वच्छता राखणे, जलप्रवाह स्वच्छ ठेवणे, मूळ शिल्पांचे संरक्षण आणि वैज्ञानिक दस्तऐवजीकरण करणे या गोष्टी केल्या, तर हे मंदिर भावी पिढ्यांसाठीही तितकेच जिवंत राहील.
 
- इंद्रनील बंकापुरे
9960936474
Powered By Sangraha 9.0