सध्याच्या पिढीतील विशेषत्वाने 25 ते 30 वयोगटातील मुलामुलींना ‘लग्न कर, लग्न कर’ म्हणून मागे लागलेले पालक आपल्या आजूबाजूला अगदी सहज दिसतात. मात्र, सगळं काही सुस्थितीत असतानाही जेव्हा लग्नाचा विचार येतो, तेव्हा आताची तरुण पिढी बरेचदा एक पाय मागे घेताना दिसते. आता यामागे प्रत्येकाची निरनिराळी कारणंही असतात. काहींना करिअर, नोकरी यावर लक्ष केंद्रित करायचे असते, काहींना योग्य जोडीदाराची वाट पाहायची असते, काहींना स्वतःचा वेळ हवा असतो, तर काहींना लग्न हे एक बंधन वाटतं. समाजातील अशा या बहुचर्चित ‘लग्न’ या विषयाचे कंगोरे ‘तू बोल ना’ या चित्रपटातून रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे. दि. 16 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दरम्यान, पूवचा ‘मनाचे लोक’ हा चित्रपट दि. 10 ऑक्टोबरला प्रदर्शित झाला होता. पण, चित्रपटाच्या नावावरून झालेल्या वादानंतर चित्रपटाचे नाव बदलून ‘तू बोल ना’ असे करुन, हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला.
पुण्यातील दोन सामान्य कुटुंबे पटवर्धन आणि अभ्यंकर यांच्या घरातील ही कथा. या दोन कुटुंबांतील मुलगी मनवा (मृण्मयी देशपांडे) आणि मुलगा लोक (राहुल पेठे) यांच्या भोवती चित्रपटाची संपूर्ण कथा गुंफलेली आहे. मनवा ही एक ट्रेकर आणि ट्रॅव्हल ब्लॉगर आहे तर लोक त्याच्या वडिलांचा व्यवसाय सांभाळतो. लोकच्या लग्नासाठी पटवर्धन कुटुंबीय प्रचंडी आग्रही आहेत. बऱ्याच चालून आलेल्या स्थळांपैकी काही मुलींना लोक भेटतो खरा, पण त्याला हवी तशी मुलगी काही मिळत नाही. मग कालपरत्वे ‘लग्न नाही केलं, तर काहीही फरक पडत नाही,’ या निष्कर्षाप्रत लोक पोहोचतो.
दुसरीकडे मनवासाठीही तिच्या पालकांचे वरसंशोधन सुरुच असते. पण, मनवालाही लग्नगाठ बांधण्यात फारसा रस नाहीच. त्यामुळे घरपर्यंत चालून आलेल्या स्थळांनीही स्वतःहूनच आपल्याला नकार द्यावा, यासाठी ती मिळेल त्या क्लृप्त्या वापरत असते. असेच पुढे एकदा लोकचं स्थळ तिला सांगून येतं आणि तेव्हाही मनवाकडून हे लग्न जुळू नये, म्हणूनची धडपड चित्रपटात पाहायला मिळते.
चित्रपटाची सुरुवात अगदी हलकी-फुलकी आणि विनोदांनी भरलेली. त्यामुळे सोप्या आणि मजेशीर संवादाने आपल्या चेहऱ्यावर आपसूकच हसू उमटतं. दोन्ही कुटुंबातले संवाद, प्रसंग अगदी घरगुती वाटावे असे. याशिवाय चित्रपटाच्या संपूर्ण कथेला दिलेली सांगीतिक जोडही तितकीच महत्त्वाची ठरते. (यात अभिनेता सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन आणि हरिष दुधाडे हे दिसतात.) ‘तू बोल ना’ हा टायटल ट्रॅकसुद्धा उत्तम आहे, जो पुन्हा पुन्हा नक्कीच ऐकावासा वाटतो. यामुळे चित्रपटाचं कथानक अलगद पुढेही जातं आणि तितकचं हलकं-फुलकंही वाटतं. दोन कुटुंबांमधली ही गोष्ट पुढे कोणत्या वळणावर जाते, मनवा आणि लोक लग्नाचा पुढे जाऊन काय निर्णय घेतात, याशिवाय दोन अतिशय भिन्न व्यक्तिमत्त्वाची माणसं जेव्हा प्रेमात पडतात, तेव्हा त्यांचं नातं खरंच टिकतं का? आणि आताच्या काळात ‘डेटिंग’ आणि ‘लग्न’ या संकल्पना कशा बदलत चालल्या आहेत, याची कथा चित्रपटात उलगडत जाते.
दरम्यान, चित्रपटाचं दिग्दर्शन, लेखन आणि अभिनेत्री म्हणून मुख्य भूमिका अशी तिहेरी जबाबदारी मृण्मयी देशपांडेने लीलया पेलली आहे. मृण्मयीचा दिग्दर्शनातला हा तसा पहिलाच प्रयत्न. पण, त्यात ती बऱ्यापैकी यशस्वी झाली आहे, असे म्हटले तर वावगे ठरु नये. चित्रपटातून मनोरंजन होतं असलं तरी, कथेचा उत्तरार्ध आणि शेवट तुम्हाला नक्कीच नाराज करू शकतो.
भारतीय चित्रपट विशेषतः प्रेमकहाणीवर आधारित चित्रपटांत तर प्रेक्षक आजही लग्नसंस्थेवर विश्वास ठेवतात. पण, या चित्रपटाच्या कथेत या सगळ्याच गोष्टींना फाटा दिला आहे. स्वतंत्र राहण्याच्या विचारांना अधिक महत्त्व, तसेच समाजमान्य गोष्टींच्या विरोधातला लढा, अशी या चित्रपटाची एकंदरच रुपरेषा. लेखिका-दिग्दर्शक म्हणून मृण्मयीचा तिचा वेगळा विचार आणि कथा मांडण्याचा हा प्रयत्न. पण, चित्रपटातील गोड प्रेमकहाण्यांमध्ये हरवून जाणाऱ्या प्रेक्षकांना हा चित्रपट बघताना मात्र विसंगती वाटू शकते. याशिवाय, सामान्य मराठी कुटुंबांतील लोक खरंच असं वागू शकतात का? आणि मग सगळ्यांनीच हा विचार केला, तर लग्न ही संस्कृती, व्यवस्थाच कायमस्वरुपी संपुष्टात येईल, असा विचारसुद्धा एक प्रेक्षक म्हणून नक्कीच विचलित करुन जातो.या चित्रपटात मृण्मयी देशपांडे, राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, करण परब, उदय टिकेकर, शुभांगी गोखले, मंगेश कदम, लीना भागवत अशी कलाकारांची तगडी फौज आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या भूमिकांना न्याय दिला आहे.पुष्कराज चिरपुटकरने नेहमीप्रमाणेच धमाल काम केलं आहे. त्याच्या प्रत्येक प्रसंगाला प्रेक्षक अगदी खळखळून हसतात. पण, चित्रपटाची ज्यापद्धतीने मांडणी करण्यात आलेली आहे, ती उत्तम आहे. खऱ्याखुऱ्या लोकेशन्सवर चित्रीकरण केल्यामुळे ते अगदी वास्तवदश वाटते. त्यामुळे केवळ मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून पाहायचा असेल, तर हा चित्रपट पाहायला हरकत नाही.
दिग्दर्शन, लेखन : मृण्मयी देशपांडे
निर्मिती : नितीन वैद्य, संजय दावरा, श्रेयश जाधव
कलाकार : मृण्मयी देशपांडे, राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, करण परब, उदय टिकेकर, शुभांगी गोखले, मंगेश कदम, लीना भागवत
छायाचित्रण : अभिजित अब्दे
संगीत दिग्दर्शक : सिद्धार्थ महादेवन, सौमिल शृंगारपुरे
गीतकार : प्राजक्त देशमुख, गौतमी देशपांडे
रेटिंग : 3
- अपर्णा कड