दिवाळी आली की घराघरात सुगंध दरवळतो, तळलेल्या चकलीचा, गोड करंजीचा, आणि नव्याने उकळलेल्या तुपाचा. या सणात काही पदार्थ असे आहेत, जे नसतील तर फराळ अपूर्णच वाटतो. चला, जाणून घेऊया दिवाळीच्या फराळात ‘मस्ट हॅव’ असणारे ७ पारंपरिक स्टार पदार्थ आहेत तरी कोणते...
चकली
“चकलीशिवाय फराळाची कल्पनाच नाही!” दिवाळीच्या फराळात सर्वानाच आवडणारा पदार्थ म्हणजे चकली. भाजणीच्या पिठात जिरे-तीळ घालून केलेली ही ताजी, सोनेरी चकली तळतानाच घरभर सणाचा दरवळणारा सुगंध पसरते.
करंजी
बाहेरून कुरकुरीत, आतून गोड आणि सुगंधी… खोबरे, गूळ, साखर आणि सुका मेवा भरलेली करंजी दिवाळीच्या ताटात असायलाच हवी. तिचा अर्धचंद्र आकार ताटाला दिवाळीचा ‘फेस्टिव्ह लूक’ देतो, असं म्हणायला हरकत नाही.
लाडू
बेसन, रवा, नारळ अशा विविध रूपात तयार होणारे लाडू दिवाळीचा कायमचा भाग आहेत. टिकाऊ असल्यामुळे पाहुण्यांसाठी गिफ्टिंगलाही परफेक्ट!, नाही का...
शंकरपाळी
गोड आणि खारे दोन्ही रूपात शंकरपाळी मन जिंकते. तूप आणि दूध घालून बनवलेले हे मऊ, झटपट तयार होणारे तुकडे तोंडात टाकताच विरघळतात. झटपट बनणारा आणि कमी किचकट अशी जरी या पदार्थाची ओळख असली, तरी दिवाळीत याला फारच महत्त्व असते.
अनरसे
महाराष्ट्रातील पारंपरिक गोड पदार्थांमध्ये अनरसे खास स्थान राखतात. भिजवलेल्या तांदळाचे पीठ, गूळ आणि तूप वापरून तयार केलेले अनरसे बनवायला वेळखाऊ असले तरी दिवाळीचा सिग्नेचर पदार्थ मानला जातो.
चिवडा
गोडानंतर खारट चवीची मजा देणारा पदार्थ म्हणजे चिवडा. पोहे, शेंगदाणे, डाळी, मोहरी, कढीपत्ता अशा मसाल्यांनी फोडणी देऊन तयार केलेला चिवडा हलका आणि टिकाऊ असल्यामुळे सर्वांच्याच आवडीचा पदार्थ आहे.
खोबऱ्याची बर्फी
खोबऱ्याच्या बर्फीचे गोड तुकडे हे फराळात वैविध्य आणतात. या पदार्थामुळे बऱ्याचदा मिठाईची गरजच भासत नाही. साखर किंवा गूळ, खोबरे, तूप यांचा योग्य मिलाफ करून बनवलेली बर्फी पाहुण्यांना वाढण्यासाठी आदर्श मानली जाते.