‘कॅन्डेला’ची सफर...

18 Oct 2025 11:34:22
Candela Z-12
 
मुंबईच्या जलवाहतुकीत एक ऐतिहासिक बदल घडणार आहे. लवकरच मुंबईच्या समुद्रात ‘वॉटर फ्लाईंग टॅसी’ म्हणजेच ‘पाण्यावर उडणार्‍या’ इलेट्रिक फेरीज धावताना दिसतील. राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरेमंत्री नितेश राणे यांनी आपल्या स्वीडन दौर्‍यात या नव्या युगाच्या तंत्रज्ञानाची थेट पाहणी केली. राणे यांनी स्वीडनमधील ‘कॅन्डेला’ (उरपवशश्रर) या जागतिक दर्जाच्या हायड्रोफॉईल तंत्रज्ञान कंपनीच्या मुख्यालयाला भेट देऊन त्यांच्या अत्याधुनिक इलेट्रिक नौकांचे निरीक्षण केले आणि स्वतः त्या बोटींचा अनुभवही घेतला. त्यांनी बाल्टिक समुद्रावर ‘कॅन्डेला’च्या ‘उ-८’ आणि ‘झ-१२’ या दोन नौकांमधून प्रवास केला आणि या प्रवासाचे वर्णन करताना त्यांनी सांगितले की, जणू पाण्यावर उडत असल्याचा अनुभव मिळाला. राणे यांनी पाहिलेली ‘कॅन्डेला झ-१२’ ही नौका लवकरच मुंबईत दाखल होणार आहे. तिच्या आगमनाने शहरातील जलवाहतुकीचे संपूर्ण चित्र बदलणार आहे. त्यानिमित्ताने या ‘कॅन्डेला’विषयी...
 
‘कॅन्डेला झ-१२’ ही इलेट्रिक प्रपल्शन आणि हायड्रोफॉईल तंत्रज्ञानाचा संगम असलेली जगातील पहिली प्रवासी फेरी. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे ही फेरी पाण्याच्या पृष्ठभागावर अगदी अलगदपणे मार्गक्रमण करते. २५ नॉट्स (सुमारे ४६ किमी प्रतितास) या वेगाने चालणारी ही नौका केवळ जलद नाही, तर डिझेल फेरीपेक्षा ८० टक्के कमी ऊर्जा वापरते आणि शून्य उत्सर्जन करते. त्यामुळे ती पर्यावरणपूरक, शांत आणि टिकाऊ वाहतुकीचे उत्तम उदाहरण ठरते. स्वीडनची ‘कॅन्डेला’ कंपनी ही या क्षेत्रातील जागतिक आघाडीची संस्था असून, तिचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गुस्ताव हॅसेलस्कॉग. त्यांनीच ‘हायड्रोफॉईल इलेट्रिक फेरी’ या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले. आज जगातील मोठ्या शहरांमध्ये वाहतुककोंडी, इंधनाचा वाढता वापर आणि प्रदूषण ही मोठी आव्हाने बनली आहेत. या पार्श्वभूमीवर, ‘कॅन्डेला’ची ‘झ-१२’ ही नौका जलमार्गांचा वापर करून या समस्यांना टिकाऊ उपाय देत आहे.
 
‘कॅन्डेला’ची पहिली यशस्वी फेरी ‘झ-१२ छजतअ’ ही सध्या स्टॉकहोमच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत धावत आहे. ‘नोव्हा’ने तिथल्या प्रवाशांचा प्रवासाचा अनुभवच बदलून टाकला आहे. स्टॉकहोममध्ये चालणार्‍या पारंपरिक डिझेल फेरीच्या तुलनेत ‘नोव्हा’ने ९५ टक्के कमी कार्बन उत्सर्जन आणि ८४ टक्के कमी ऊर्जा वापर केला आहे. प्रवासी प्रतिसाद इतका प्रचंड आहे की, ८० टक्के आसनक्षमता नेहमी भरलेली असते.
 
‘कॅन्डेला झ-१२’मध्ये अनेक अत्याधुनिक वैशिष्ट्ये आहेत. जसे की, फ्लेसिबल बाऊ रॅम्पमुळे फेरी विविध उंचीच्या डॉसशी सहज जुळवून घेते. ‘रिट्रॅटेबल फॉईल्स’ हे तंत्रज्ञान कोणत्याही बंदरात डॉकिंग सोपे करते. डीसी फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान एका तासात संपूर्ण चार्ज होते. इलेट्रिक ड्राईव्हट्रेन व प्रेडिटिव मेंटेनन्स हे देखभालीचा आणि ऑपरेटिंग खर्च मोठ्या प्रमाणात कमी करतात. फ्लाईट कंट्रोलर आणि अ‍ॅटिव फॉईल्स सिस्टम ही अगदी वादळाच्या काळातही आणि सुरक्षितता सुनिश्चित करतात. ही फेरी केवळ दोन मिनिटांत ‘फॉईलिंग मोड’वरून ‘डॉकिंग मोड’मध्ये जाऊ शकते. तिचा फ्री-फ्लोटिंग बाऊ रॅम्प लाटांमध्येही स्थिर राहतो आणि प्रवाशांना सुरक्षित चढ-उताराची सुविधा देतो.
 
सध्या ‘कॅन्डेला’च्या ‘झ-१२’ नौकांना सौदी अरेबिया, न्यूझीलंड आणि अमेरिका यांसारख्या देशांकडून प्रचंड मागणी आहे. रीजन स्टॉकहोमने आम्हाला सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत हायड्रोफॉईल तंत्रज्ञान दाखविण्याची संधी दिली, याचा आम्हाला अभिमान आहे. जगातील शहरांमध्ये जलमार्गांचा वापर जलद, स्वस्त आणि प्रदूषणमुक्त वाहतुकीसाठी करता येतो, हीच भविष्यातील दिशा आहे, असे हॅसेलस्कॉग म्हणाले.
 
मुंबईसारख्या किनारी महानगरात या फेरींची सेवा सुरू झाल्यास, प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि रस्त्यावरील कोंडी कमी करण्यासही मदत होईल. शिवाय, प्रदूषणमुक्त आणि ऊर्जा-कार्यक्षम प्रणालीमुळे पर्यावरणालाही मोठा दिलासा मिळेल. मुंबईच्या किनार्‍यावर ही फेरी धावली, तर ते फक्त प्रवास नव्हे, तर आधुनिक, स्वच्छ आणि टिकाऊ शहरी जीवनाकडे नेणारी उड्डाण ठरेल.
 
Powered By Sangraha 9.0