सिद्धरामय्या सरकारची कारवाई बेकायदेशीर; निलंबित अधिकाऱ्यासाठी तेजस्वी सूर्या यांची कायदेशीर लढ्याची घोषणा

18 Oct 2025 17:33:28

मुंबई
: कर्नाटकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्याला भाजपचे खासदार व भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांनी पाठिंबा दर्शविला आहे. त्यांनी या प्रकरणात सिद्धरामय्या सरकारवर राजकीय सूडभावनेने प्रेरित बेकायदेशीर कारवाई केल्याचा आरोप करत न्यायालयात कायदेशीर लढा देण्याची घोषणा केली आहे.

अलीकडेच एका पंचायत विकास अधिकाऱ्याने त्यांच्या वैयक्तिक वेळेत संघाच्या विजयादशमी उत्सवात सहभाग घेतला होता. त्यानंतर कर्नाटक सरकारने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत तात्काळ निलंबनाचा आदेश दिला. या निर्णयामुळे राज्यात राजकीय वातावरण तापले असून विरोधकांनी सरकारवर संघविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप केला आहे.

तेजस्वी सूर्या यांनी या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत सोशल मीडियावर लिहिले की, “सरकारी कर्मचाऱ्याने आपल्या सुट्टीच्या वेळेत सामाजिक किंवा राष्ट्रभक्तीपर कार्यक्रमात सहभागी होणे हा गुन्हा ठरू शकत नाही. सिद्धरामय्या सरकारने केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयीच्या द्वेषातून ही कारवाई केली आहे. ही कारवाई संविधानविरोधी आणि बेकायदेशीर आहे.”

सूर्या यांनी पुढे सांगितले की, त्यांनी निलंबित अधिकाऱ्याशी वैयक्तिक संवाद साधला असून त्याला कायदेशीर मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी सांगितले की, “मी स्वतः न्यायालयात उभा राहून या अधिकाऱ्याच्या न्यायासाठी लढेन. अनेक न्यायालयीन निर्णयांमध्ये सरकारी सेवकांना रा.स्व.संघ सारख्या सामाजिक संस्थांमध्ये सहभागी होण्याचा अधिकार मान्य करण्यात आला आहे. सिद्धरामय्या सरकारचा हा निर्णय कायद्याच्या चौकटीबाहेरचा आहे.”



Powered By Sangraha 9.0