आपल्या नाट्यलेखनाने चार दशके संस्कृत रंगभूमीवर वर्चस्व गाजवणाऱ्या आधुनिक संस्कृत नाटककार प्रभाकर महादेव भातखंडे यांच्याविषयी...
स्वप्न पाहण्याचे समजण्याआधीच नियतीने त्यांचा चुराडा केला. तेव्हापासून केवळ दोनवेळचे अन्न मिळवण्याच्या उद्दिष्टाने पडेल ते काम करत राहिले. गमवायला तसे काही कमावलेलेच नव्हते आणि अधिक विचार करण्यासारखी परिस्थिती नव्हती. ही कथा आहे, बल्लाळेश्वरजवळील पाली येथील प्रभाकर भातखंडे यांची.
प्रभाकर भातखंडे यांचा जन्म स्वातंत्र्यापूवचा. आर्थिक परिस्थितीही तोलोमोलाचीच. वयाच्या आठव्या वष त्यांचे पितृछत्र हरपले. त्यानंतर प्रभाकर आणि त्यांच्या मोठ्या भावाच्या खांद्यावरच घराची जबाबदारी आली. त्यांनी गावात मिळेल ते काम करत घरखर्च कसाबसा भागवला. कधी म्हशी चरायला नेणे, कोणाला पोहे दळून देणे, कोणाचा स्टोव्ह दुरुस्त करणे, मंदिरात पूजा-अभिषेक करणे अशी पडेल ती कामे करत होते. तेव्हाच नियतीने आणखी एक आघात केला. त्यांच्या आईलाही त्यांच्यापासून हिरावून घेतले.
अशा परिस्थितीतही ते ‘एसएससी’ परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आले. पण, दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असताना या यशाचे कौतुक ते काय? निकाल घेऊन प्रभाकर मुंबईत आले, ते कायमचेच. मोठा भाऊ तेव्हा मुलुंडमध्ये स्थिरावलेला असल्यामुळे निवासाची सोय असली, तरी नोकरी करणे भाग होते. तेव्हाच ‘टायपिस्ट पाहिजे’ असा फलक दिसला आणि मोठ्या भावाकडून तीन दिवसांत टायपिंग शिकून ती नोकरी मिळवली. त्याबरोबरच, उरलेल्या वेळात ते ठाणे स्थानकात दाखल होणाऱ्या रेल्वेगाड्यांमधील सामान टांग्यात नेऊन ठेवण्याचेही काम करु लागले. त्याच काळात सरकारने रेशनिंगचा नवा नियम केला. तेव्हा लोकांना ते इंग्रजीतील अर्ज भरता येत नव्हते. प्रभाकर यांना इंग्रजी टायपिंग येत असल्यामुळे त्यांनी तेही तत्परतेने भरून दिले.
प्रभाकर यांची ग्रहणशक्ती चांगली असल्यामुळे, ते कोणतेही काम सहज समजून घेत अचूक पार पाडायचे. नंतर त्यांनी मुंबई गाठत विविध कामांमध्येही असेच नशीब आजमावले. पुढे प्रामाणिकपणामुळे त्यांचा जनसंपर्कही वाढला. पुढे त्यांना ‘बॉम्बे पोर्ट ट्रस्ट’मध्ये नोकरी लागली आणि ती त्यांनी निवृत्तीपर्यंत केली.
‘बीपीटी’मधील नोकरीने प्रभाकर यांना थोडे आर्थिक स्थैर्य प्रदान केले. म्हणूनच मग त्यांनी महाविद्यालयात प्रवेशाचा निर्णय घेतला. खरं तर, त्यांना गणित विषय शिकायचा होता; परंतु नोकरीच्या वेळा सांभाळून तेथे फक्त संस्कृतच शिकणे शक्य होते. शाळेत संस्कृत अभ्यासलेले असल्यामुळे प्रभाकर यांना तेही काही नवीन नव्हते. पदवीचा अभ्यास करताना त्यांनी सर्व प्रकारचे संस्कृत साहित्य वाचले. पैकी त्यांना काव्यांमध्ये विशेष रस वाटू लागला. त्याचबरोबर त्यांनी पाणिनीय व्याकरणाचाही सखोल अभ्यास केला. प्रत्येक शब्दातील धातू शोधण्याचा चिकित्सक दृष्टिकोन देणारे गुरू त्यांना लाभले. “संस्कृत ही केवळ ग्रंथांत राहण्यासाठी बनलेली नाही. ती लिपी नाही, तर भाषा आहे. ‘एनया भाष्यते सा भाषा,” असे प्रभाकर सांगतात. त्यामुळे त्यांनी पहिल्यापासूनच संस्कृतमध्ये बोलण्याचा सराव ठेवला होता. त्या काळातील संस्कृतमध्ये भाषण करू शकणाऱ्या काही मोजक्या वक्त्यांपैकी प्रभाकर एक होते. ते ठिकठिकाणी संस्कृत साहित्यातील विविध विषयांवर व्याख्यानेही द्यायचे. तसेच, मुलुंडमध्ये ‘संस्कृत रसास्वाद’ नामक वर्ग त्यांनी 37 वर्षे मोफत चालवला. “तुझ्या कंठापासून ओठांपर्यंत सरस्वती आहे; तिला विकू नकोस,” ही त्यांच्या गुरूंची आज्ञा ते आजही नेटाने पाळतात.
प्रभाकर यांच्या सभाधीटपणाचा उपयोग त्यांना पुढे नाटकासाठी झाला. ‘महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड’तर्फे दरवष आयोजित होणाऱ्या राज्य नाट्यस्पर्धेत त्यावष संस्कृतचा समावेश केला जाणार होता. त्यासाठी प्रभाकर यांना बोलावले गेले. तिथून त्यांचा नाटकाचा प्रवास सुरू झाला. पुढे त्यांना आकाशवाणीवर चालणाऱ्या पुरातन संस्कृत नाटकांच्या वाचनासाठीही आमंत्रित केले गेले. हे उपक्रम अनेक वर्षे केल्यानंतर एकदा कथानक सापडत नसल्यामुळे प्रभाकर यांना “तू लिही रे कथा,” असे एका वरिष्ठांनी जवळपास दरडावलेच! विषयही अगदीच समोर दिसले म्हणून “या झाडांबद्दल लिही,” असे सांगितले. अचानकच जबाबदारी आली होती. पण, प्रभाकर यांनी कौशल्य पणाला लावून आपले पहिले संस्कृत नाटक लिहिले आणि त्याला संपूर्ण भारतातून चक्क पहिले बक्षीस मिळाले!
तेव्हा प्रभाकर यांना लिखाणाबद्दल आत्मविश्वास वाटला. ते बहुतकरून मोठी नाटके न लिहिता ‘एकांक’ लिहित असत. प्रभाकर यांची आतापर्यंत 25 पेक्षा अधिक नाटके प्रसिद्ध झाली आहेत. त्यासाठी त्यांना ‘महाराष्ट्र सरकार कालिदास पुरस्कार’, ‘व्याससन्मान’, ‘नाट्यतपस्वी सन्मान’ अशा 40 ते 50 पुरस्कारांनी गौरवण्यातही आले आहे.
त्यांचे लेखन नेहमीच काळाला धरून असते. त्यांनी रक्तदान, वृक्षसंवर्धन अशा सामाजिक विषयांवर लेखन केले. त्याचबरोबर ‘विधवेचा दीराशी विवाह करून देण्याची रूढी’, ‘पुतळा बोलू लागला तर...’ असे अनेक सामाजिक विषयदेखील त्यांनी हाताळले. मुली पटवण्याचे वर्ग घेणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी पकडल्याची बातमी प्रभाकर यांनी वाचली आणि त्यावरच त्यांनी ‘मुक्ता’नामक संस्कृतमधील प्रथम तमाशा लिहिला. पुरुषपात्रविरहित ‘ललनाख्यानम्’ शब्दबद्ध केले. संस्कृतमध्येही सर्व प्रकारचे लेखन व्हावे, यासाठी प्रभाकर सदैव कार्यरत राहिले. त्यांचा संस्कृत नाट्यलेखनाचा वसा असाच उत्तरोत्तर वाढत जावो, या दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!