आदिवासी संस्कृतीतील ‘वाघबारस’ – निसर्गासोबत सहअस्तित्वाचा सण

17 Oct 2025 14:34:20
 
‘वाघबारस’
 
भारतीय जीवनदर्शनात निसर्गपूजेचे एक अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. येथे पूजा म्हणजे फक्त कर्मकांड नव्हे, तर जल, अग्नी, वायू, आकाश आणि पृथ्वी या पंचमहाभूतांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची एक जीवनशैली आहे. या परंपरेत मानव आणि निसर्ग यांच्यातील संतुलन व सहजीवनाचे सुंदर तत्त्वज्ञान दिसते. या जीवनदर्शनाचे एक अद्भुत उदाहरण म्हणजे ‘वाघबारस’, असा सण जो भय, श्रद्धा आणि सहअस्तित्व या भावनांचा सुंदर संगम आहे. दीपावलीचा प्रारंभ ‘वसुबारस’पासून होतो, ज्या दिवशी गाय आणि तिच्या वासराचे पूजन केले जाते. परंतु आदिवासी समाजात हाच दिवस ‘वाघबारस’ म्हणून साजरा होतो. ज्या दिवशी गाईंचे रक्षण व्हावे म्हणून वाघदेवाची (व्याघ्रदेव) याची पूजा केली जाते.
 
वाघ – भय नव्हे, तर संरक्षणाचे प्रतीक
 
आदिवासी श्रद्धेनुसार वाघ हा केवळ शक्तीचा किंवा हिंसेचा नव्हे, तर जंगलाचा स्वामी आणि रक्षक मानला जातो. अशी मान्यता आहे की जर वाघदेव प्रसन्न झाला, तर तो गावातील गाई-बैलांचे रक्षण करतो. म्हणूनच ग्रामस्थ प्रार्थना करतात – “आमच्या जनावरांचे रक्षण कर, त्यांची शिकार करू नको.” ही पूजा हे दाखवते की आदिवासी समाज निसर्गाशी संघर्ष करत नाही, तर संवाद साधतो. भय श्रद्धेत रूपांतरित होते आणि सहअस्तित्वाची भावना अधिक दृढ होते.
 
निसर्गाशी घट्ट जोडलेले आदिवासी जीवन
 
महाराष्ट्रातील अकोले, जुन्नर, ठाणे, इगतपुरी, आंबेगाव, खोडद आणि कुंभारली घाट या भागांत वाघबारस मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. अनेक गावांत वाघदेवाचे छोटे मंदिरे असतात; जिथे मंदिर नसते, तिथे लाकूड किंवा दगडावर वाघाचे चित्र काढून त्यावर सिंदूर चढवला जातो. कुठे कोंबड्याचा तर कुठे खीर किंवा धान्याचा नैवेद्य अर्पण केला जातो. गुराखी सर्व जनावरे एकत्र करून वाघदेवाची पूजा करतात. तर महिला वर्ग शेणाणे जमीन सारवून आपला परिसर सुशोभित करतात. फुलांनी सजावट करतात. रात्री पारंपरिक गाणी गातात.
 
वन्यजीव आणि मानव – सहजीवनाचा संदेश
 
आदिवासी संस्कृतीत प्रत्येक प्राणी, पक्षी, वृक्ष, नदी, डोंगर हे देवतुल्य मानले जाते. वाघदेव, नागदेव, गौमाता, मोर, सर्प हे सर्व त्यांच्या जीवनाचा आणि श्रद्धेचा भाग आहेत. ही जीवनपद्धती निसर्गसंरक्षणावर आधारित आहे. आज जेव्हा पर्यावरणीय असंतुलन आणि वन्यजीवांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे, तेव्हा वाघबारससारखे सण आपल्याला आठवण करून देतात की, आदिवासी समाजाने हजारो वर्षांपूर्वीच ‘पर्यावरणीय संतुलनाचा मंत्र’ आपल्या जीवनात उतरवला होता.

Powered By Sangraha 9.0