पूर्वी धनत्रयोदशीच्या दिवशीच ‘आयुर्वेद दिवस’ साजरा होत असे. पण, यंदाच्या वर्षीपासून २३ सप्टेंबर हा दिवस ‘आयुर्वेद दिन’ म्हणून घोषित करून साजरा करण्यात आला आहे. उद्या दीपोत्सवाच्या पर्वात धनत्रयोदशीला देशभरात धन्वंतरीची पूजा केली जाईल. त्यानिमित्ताने जगभरातील पारंपरिक औषधांचे वाढते महत्त्व आणि शाश्वत उपाय यांविषयी ऊहापोह करणारा हा लेख...
आयुर्वेदिक औषध प्रणालीचा वापर ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या एकूण सदस्य देशांपैकी ८८ टक्के देशांमध्ये म्हणजे, १९४ पैकी १७० देशांमध्ये केला जातो,” असे संघटनेच्या अहवालात म्हटले आहे. पारंपरिक औषधपद्धती ही अब्जावधी लोकांसाठी, विशेषतः अल्प आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये, सहज उपलब्धता आणि परवडणार्या दरांमुळे आरोग्यसेवेचा मूलाधार ठरते. त्याहून अधिक म्हणजे, पारंपरिक औषधपद्धतीचे महत्त्व उपचारांपलीकडे जैवविविधतेचे संवर्धन, पोषणमूल्यांची सुरक्षितता आणि शाश्वत उपजीविकेच्या दृष्टीने अनन्यसाधारण आहे. बाजारपेठेतील भाकितांनी या वाढत्या मान्यतेला अधोरेखित करून त्याचे महत्त्व ओळखले आहे.
२०२५ सालापर्यंत जागतिक पारंपरिक औषध बाजारपेठ ५८३ अब्ज डॉलर्सपर्यंत उलाढाल करेल आणि त्याचा वार्षिक वृद्धिदर दहा टक्के ते २० टक्के असेल, असा विश्लेषकांचा अंदाज आहे. चीनच्या पारंपरिक चिनी औषध क्षेत्राचे मूल्य १२२.४ अब्ज डॉलर्स, ऑस्ट्रेलियाच्या हर्बल औषध उद्योगाचे मूल्य ३.९७ अब्ज डॉलर्स आणि भारतातील आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमियोपॅथी (आयुष) क्षेत्राचे मूल्य ४३.४ अब्ज डॉलर्स आहे. या विस्तारातून आरोग्यसेवेच्या तत्त्वज्ञानामागील आधारभूत परिवर्तनाचे प्रतिबिंब दिसून येत आहे. म्हणजेच, प्रतिक्रियाशील उपचार पद्धतींपासून मूळ कारणांवर लक्ष केंद्रित करणार्या सक्रिय आणि प्रतिबंधात्मक दृष्टिकोनाकडे वाटचाल होत आहे, जी केवळ आजाराच्या लक्षणांवर नव्हे, तर त्यांच्या मूळ कारणांवर उपचार करते.
भारताचे आयुर्वेदातील परिवर्तन
भारताच्या पारंपरिक औषध क्षेत्रात लक्षणीय परिवर्तन घडले आहे. सुमारे ९२ हजार सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा समावेश असलेल्या ‘आयुष’ उद्योगाने गेल्या दशकभरात जवळपास आठपटीने विस्तार केला आहे. उत्पादन क्षेत्राचे उत्पन्न २०१४-१५ सालामधील २१ हजार, ६९७ कोटी रुपयांवरून वाढून सध्या १.३७ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, तर सेवा क्षेत्रामुळे १.६७ लाख कोटी रुपयांचा महसूल निर्माण झाला आहे. भारत आता १५० देशांना आयुष आणि हर्बल उत्पादनांची निर्यात करत असून त्याचे मूल्य १.५४ अब्ज अमेरिकी डॉलर्स इतके आहे. याबरोबरीने आयुर्वेदाला कित्येक देशांमध्ये ‘औपचारिक उपचार पद्धती’ म्हणून मान्यता मिळत आहे. यातूनच आर्थिक आघाडीवरील संधी आणि जागतिक स्तरावरील ‘सॉफ्टपॉवर’ म्हणून वाढते, महत्त्व दिसून येत आहे.
‘राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालया’ने (२०२२-२३) ‘आयुष’वर केलेल्या पहिल्या व्यापक सर्वेक्षणात ग्रामीण भागात ९५ टक्के आणि शहरी केंद्रांमध्ये ९६ टक्के अशी बहुतेक सर्व स्तरांवर जागरूकता दिसून आली. मागील वर्षी अर्ध्याहून अधिक लोकसंख्येने आयुष प्रणालींचा वापर केल्याची नोंद असून त्यात आयुर्वेद पुनरुज्जीवन आणि प्रतिबंधात्मक काळजीसाठी पसंतीचा पर्याय म्हणून हे क्षेत्र उदयास आल्याचे दिसून येते.
वैज्ञानिक सत्यापन, जागतिक विस्तार
भारताने ‘अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्था’, ‘आयुर्वेद संशोधन व अध्यापन संस्था’, ‘राष्ट्रीय आयुर्वेद संस्था’ व ‘केंद्रीय आयुर्वेद विज्ञान संशोधन परिषद’ अशा अनेक संस्थांमार्फत संशोधनावर मोठी गुंतवणूक केली आहे. या संस्था वैद्यकीय चाचण्या, औषध प्रमाणीकरण तसेच, परंपरागत ज्ञान आणि आधुनिक वैद्यकशास्त्राची सांगड घालणारी उपचारपद्धतींची मानके शोधण्यावर भर देत आहेत.
भारताने जागतिक स्तरावर सुरू केलेला आयुर्वेद प्रसार आता आयुष मंत्रालयाच्या ‘आंतरराष्ट्रीय सहकार्य योजने’च्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात वाढला आहे. भारताने २५ द्विपक्षीय करार आणि ५२ संस्थांशी सहकार्य करार केले असून, ३९ देशांमधून ४३ आयुष माहिती केंद्रे उघडली आहेत. अनेक परदेशी विद्यापीठांमधून १५ अध्यासनेदेखील स्थापित केली आहेत.
‘जागतिक आरोग्य संघटने’च्या सहकार्याने भारतात सुरू केलेले ‘जागतिक पारंपरिक औषधी केंद्र’ म्हणजे एक महत्त्वाचा टप्पा आहे. भारत सरकारच्या पाठिंब्याच्या जोरावर या केंद्रात आधुनिक विज्ञान, डिजिटल आरोग्यव्यवस्था व कृत्रिम बुद्धिमत्तेसहित अनेक उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पारंपरिक औषधींची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न होत आहे.
पारंपरिक औषधांशी कृत्रिम बुद्धिमत्तेची सांगड घालण्यासंबंधी ‘जागतिक आरोग्य संघटने’ने प्रकाशित केलेल्या साहित्यात अद्ययावत तंत्रज्ञानांमुळे अधिक विश्वसनीय वैद्यकीय चाचण्या, उत्तम दर्जाचे बिग डेटा विश्लेषण तसेच, आयुर्वेद व अनुषंगिक पद्धतींमधील अचूक निदान व औषधयोजना याबद्दल अभ्यासपूर्ण विवेचन आहे.
यावर्षीचा विषय
संतुलन हे आयुर्वेदाचे प्रमुख तत्त्व आहे. शरीर व मन, मानव व निसर्ग, उपभोग व संरक्षण यामधील संतुलन राखल्यास आधुनिक काळातील सर्व आव्हानांवर, समस्यांवर तर्कशुद्ध उपाय मिळू शकतात. चुकीच्या जीवनशैलीतून उद्भवणारे रोग तसेच, हवामान बदलामुळे संकटात सापडलेल्या जागतिक आरोग्यावर आयुर्वेदात जे उपाय सांगितले आहेत, त्यातून वैयक्तिक आणि जागतिक अशा दोन्ही पातळीवर आरोग्यपूर्ण जीवन जगता येऊ शकते.
पारंपरिक औषधांना जगभरात मान्यता मिळवून देण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरू असताना, रोगांपासून बचाव, परवडण्याजोगे व शाश्वत उपचार हा आरोग्यसेवांसाठी भारताचा मूलमंत्र आहे. आयुर्वेद म्हणजे केवळ वैद्यकीय उपचार पद्धत नसून, पारंपरिक ज्ञान व सध्याच्या गरजांचा ताळमेळ घालणारी एक आरोग्यरक्षक चळवळ आहे.
प्राचीन शहाणपण व आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञान यांचा मेळ घातल्यास जागतिक आरोग्यव्यवस्थेत पारंपरिक चिकित्सा पद्धत महत्त्वाची भूमिका बजावू शकते. यावर्षीच्या आयुर्वेद दिनानिमित्त जगभरातल्या लोकांना आणि एकूणच पृथ्वीला अधिक संतुलित व शाश्वत भविष्यकाळ मिळवून देण्यासाठी पारंपरिक ज्ञान व्यवस्था सक्षम असल्याचा संदेश जाईल, अशी आपण आशा करूया.
- प्रतापराव जाधव
(लेखक केंद्रीय आयुष आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमियोपॅथी आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री आहेत.)