राज्याच्या राजकीय वर्तुळात संजय राऊत यांना सध्या ‘अति घाई संकटात नेई’ ही म्हण तंतोतंत लागू होताना दिसते. ’आपल्याला काँग्रेसला सोबत घेणे गरजेचे आहे, ही स्वतः राज ठाकरे यांची भूमिका आहे,’ असा दावा संजय राऊतांनी नुकताच केला होता. यावर मनसे नाराज झाल्याचीही चर्चा रंगली. ‘केवळ राज ठाकरे आणि आमच्या पक्षाचे प्रवक्तेच आमची भूमिका मांडतात. बाकी कुणीही आमच्या पक्षाची भूमिका मांडणार नाहीत,’ असे खरपूस उत्तर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिले. शिवाय, मनसेने नाराजी व्यक्त केल्यावर संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना मेसेज केल्याच्याही बातम्या पुढे आल्या. मात्र, यावरून सर्वांपेक्षा राऊत यांनाच मनसेला मविआत सामावून घेण्याची जास्त घाई झाल्याचे दिसते. म्हणूनच तर राज्य निवडणूक आयोगाशी चर्चेत आणि नंतर मविआच्या पत्रकार परिषदेतही राज ठाकरे यांनी कमान सांभाळलेली दिसली.
थोडक्यात सांगायचे झाल्यास, ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवर उबाठा गटासोबतच आता मनसेच्या प्रवक्तेपदाची जबाबदारीही जणू राऊतांनी आपल्याच खांद्यावर घेतल्याचे दिसते. कधीही मागचा पुढचा विचार न करता ‘ब्रेकिंग न्यूज’च्या नावाखाली काहीतरी वायफळ बोलण्याची संजय राऊत यांची जुनीच सवय. पण, यावेळी त्यांची ही सवय त्यांना चांगलीच नडली. संजय राऊत यांच्या या अतिउत्साहीपणाचा अनुभव विधानसभेच्या वेळीही प्रकर्षाने आला. खरंतर, त्यांच्या या उतावीळपणामुळे ठाकरे बंधू एकत्र येता येता पुन्हा वेगळे झालेत, तर आश्चर्य वाटायला नको. असो!
गेल्या काही दिवसांत हर्षवर्धन सपकाळ यांची मनसेसंदर्भातील वक्तव्ये बघता राऊतांच्या मनात त्यांच्याविषयी कुरबूर सुरू आहे, हे त्यांच्या पत्रकार परिषदांमधून जाणवत होते. कारण, मागच्या आठवड्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मनसे मविआत नको, अशी भूमिका मांडली. पण, एकीकडे मनसे महाविकास आघाडीत काँग्रेसला नको असली, तरी दुसरीकडे महायुतीवर दुगाण्या झाडण्यासाठी राज ठाकरे यांच्या आक्रमक प्रतिमेचा वापर झालाच, तर तो पदरात पाडून घेण्यासाठी काँग्रेसची हरकत ती नाहीच. पण, एकूणच काय तर राऊतांनी आपला हा राजकीय अतिउतावीळपणा कमी करावा, अन्यथा त्यांची ही अतिघाई त्यांना संकटात नेल्याशिवाय राहणार नाही.
काँग्रेसला नवा गडी नकोच
महाविकास आघाडीची गाडी सध्या काँग्रेस-शरद पवारांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अशा वैचारिक दलदलीत फसली आहे. एकीकडे, उबाठा गट राज ठाकरे यांना मविआत सामावून घेण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसला आहे; तर दुसरीकडे, काँग्रेसला मात्र मनसे नकोच. खुद्द प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मनसेला मविआत घेण्याबाबत काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. शिवाय त्यानंतर खासदार वर्षा गायकवाड यांनीही या भूमिकेला दुजोरा दिला. ‘’मुंबईतील 227 वॉर्डमध्ये काँग्रेसची ताकद असून येणार्या निवडणुकीत स्वबळावर लढण्याची काँग्रेसची ताकद आहे,” असे वक्तव्य गायकवाड यांनी जाहीरपणे केले. त्यामुळे साहजिकच काँग्रेसला मनसेची अडचण होणार हे स्पष्ट आहे.
यामागचे प्रमुख कारण म्हणजे, पुढील महिन्यात होऊ घातलेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुका. काँग्रेसला महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि बिहारच्या निवडणुका या दोन परीक्षा द्यायच्या आहेत. या दोन्ही परीक्षांमध्ये उत्तम गुण मिळवण्यासाठी काँग्रेसने अभ्यास सुरू केलेला दिसतो. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील निवडणुकांआधी काँग्रेसला बिहारच्या निवडणुकीत उत्तीर्ण व्हायचे असल्याने ते सध्या कोणताही धोका पत्करण्याच्या मनःस्थितीत नाहीत. अशावेळी जर मनसेला महाविकास आघाडीत सामावून घेण्यास काँग्रेसने नकार दिला, तर मुंबईतील उत्तर भारतीय मतदार काँग्रेसपासून दुरावण्याची त्यांना भीती अधिक. त्यामुळे बिहारच्या निवडणुका होईपर्यंत कोणताही धोका पत्करण्यास काँग्रेस तयार नाही आणि म्हणूनच मनसेला मविआत घेण्याबाबत काँग्रेस नेत्यांची नकारघंटा पाहायला मिळते. शिवाय कितीही स्वबळाचे नारे दिले, तरी मुंबईत काँग्रेसची ताकद किती आहे, याबद्दल सर्वजण परिचित आहेतच. शिवाय, गेल्या कित्येक वर्षांपासून परस्परविरोधी विचारधारा आणि मतदार असलेले पक्ष म्हणून काँग्रेस आणि मनसेकडे पाहिले जाते.
आता उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाशी फारकत घेऊन काँग्रेसशी हातमिळवणी केली. त्यामुळे काँग्रेसने होकार दिलाच, तर राज ठाकरेही बंधूंच्या पावलावर पाऊल ठेवतात का, हे पाहणे औत्सुक्याचे असेल. मात्र, सध्या तरी काँग्रेस, मनसे आणि उबाठा यांची वैचारिक दलदलीत फसलेली ही गाडी बिहारच्या निवडणुका होईपर्यंत बाहेर येण्याची शक्यता दिसत नाही.