लाचखोरीच्या प्रकरणात डीआयजीला अटक, छापेमारीत सीबीआयला सापडलं मोठं घबाड! ५ कोटी कॅश, दीड किलो सोनं, आलिशान कार अन् बरंच काही..

17 Oct 2025 17:23:25
 
Punjab DIG Harcharan Singh Bhulllar
 
मुंबई : (Punjab DIG Harcharan Singh Bhulllar) केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) गुरुवारी १६ ऑक्टोबरला लाचखोरीच्या प्रकरणात पंजाब पोलीस दलातील रोपर रेंजचे डीआयजी हरचरण सिंग भुल्लर यांना अटक केली. त्यानंतर भुल्लर यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी केल्यानंतर सीबीआयच्या हाती मोठं घबाड लागलं आहे. याबाबत सीबीआयने गुरूवारी रात्री एक निवेदन दिले आहे.
 
डीआयजींच्या घरात काय-काय सापडलं?
 
दिल्ली आणि चंदीगड येथील सीबीआय पथकाच्या ५२ सदस्यांनी भुल्लर यांच्या मोहाली कार्यालयावर आणि चंदीगडमधील सेक्टर ४० येथील निवासस्थानी छापा टाकला. सीबीआय अधिकाऱ्यांनी सांगितले की, ५ कोटी रुपयांची रोकड, दीड किलो सोन्याची दागिने, २२ लग्झरी घड्याळे, ऑडी आणि मर्सिडिझ सारख्या आलिशान गाड्या, ४० लीटर उंची मद्याच्या बाटल्या, एक पिस्तूल, एक रिव्हॉलवर आणि एक डबल बॅरल बंदूक, तसेच दारूगोळ्यासह एक एअरगन जप्त करण्यात आली आहे. वेळी सीबीआयला डीआयजींच्या १५ मालमत्ता आणि आलिशान वाहनांशी संबंधित कागदपत्रे देखील सापडली.
 
लाच प्रकरण काय आहे?
 
डीआयजी भुल्लर यांनी मध्यस्थांमार्फत फतेहगड साहिबमधील मंडी गोविंदगड येथील एका भंगार विक्रेत्याकडून तब्बल आठ लाख रुपयांची लाच मागितली होती. जर त्याने पैसे देण्यास नकार दिला तर त्याने दोन वर्षांपूर्वी सरहिंदमध्ये दाखल केलेल्या जुन्या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्याची आणि नवीन खोटा खटला दाखल करण्याची धमकी दिली. व्यावसायिकाने सीबीआयकडे तक्रार केली. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली. चौकशीनंतर सीबीआयने सापळा रचला आणि डीआयजींना अटक केली.
 
डीआयजी भुल्लर २००७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. भुल्लर यांचे वडील महल सिंग भुल्लर पंजाबचे डीजीपी होते. त्यांचे भाऊ कुलदीप भुल्लर हे काँग्रेसचे आमदार होते. म्हणूनच भुल्लर यांना विविध राजकीय पक्षांच्या सरकारमध्ये सातत्याने वरिष्ठ पदे सहज मिळत गेली, असे बोलले जाते.
 
Powered By Sangraha 9.0