आरे जेव्हीएलआर ते कफ परेड अशी भूमिगत मुंबई मेट्रो-3 मार्गिका पूर्ण क्षमतेने सुरू होऊन आता आठवड्याभराचा कालावधी लोटला आहे आणि लाखो मुंबईकरांनी मेट्रो-3ला पसंती दिलेली दिसते. पण, या मेट्रो मार्गिकेच्या निर्मितीचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. या मार्गिकेच्या उभारणीत असंख्य राजकीय आणि भौगोलिक आव्हानांचा सामना करावा लागला. त्यांपैकीच एक बहुचर्चित लढा होता, तो ‘आरे कारशेड’चा! विरोधक आणि तथाकथित पर्यावरणवाद्यांनी मेट्रो प्रकल्पात खोडा घालून मुंबईकरांचीच प्रतारणा केली. हा लढा जितका राजकीय, न्यायालयीन पातळीवर लढला गेला, तसाच समाजमाध्यमांवरुनही मेट्रोप्रेमींनी ऑनलाईन मोर्चा सांभाळला. या प्रकल्पाचे महत्त्व मुंबईकरांना रीतसर पटवून देत, समाजमाध्यमांवर मेट्रो-3च्या समर्थनार्थ काही योद्धे ठामपणे उभे राहिले. त्यामुळे ही मेट्रो मार्गिका पूर्णत्वास आणण्यामध्ये या मेट्रोयोद्ध्यांचाही खारीचा वाटा आहेच. तेव्हा, मेट्रो-3 प्रकल्पाच्या समर्थनार्थ समाजमाध्यमांवर ढाल म्हणून उभ्या राहिलेल्या या मेट्रोयोद्ध्यांशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने साधलेला हा विशेष संवाद...
माझ्यासाठी वैयक्तिक विजय!
आजघडीला मुंबई मेट्रो-3 सर्वसामान्य जनतेसाठी पूर्णपणे कार्यान्वित झाली असून, उद्घाटनाच्या पहिल्याच आठवड्यात लोक मोठ्या प्रमाणात या मार्गिकेचा वापर करीत आहेत. कारण, ही मार्गिका मुंबईतील अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणांमधून जाते. त्यामुळे ही मार्गिका दैनंदिन कार्यालयीन कर्मचारी असोत किंवा विमानतळावरून दक्षिण मुंबईकडे जाणारे प्रवासी असोत, या सर्व स्तरांतील लोक मोठ्या प्रमाणावर वापरतील, हे अपेक्षितचं होतं. परंतु, काही वर्षांपूर्वी परिस्थिती वेगळी होती. त्यावेळी या मेट्रो मार्गिकेविरुद्ध देशभर ऑनलाईन आणि ऑफलाईन आंदोलनंही झाली.
होय, काही लोकांनी हे विरोध मुद्दामहून त्यांच्या स्वार्थासाठी किंवा स्वतःच्या प्रचारासाठी उभे केले, हे सर्वांना माहीत होते. पण, दुर्दैवाने अनेकांनी त्या अफवा आणि अपप्रचारावर सत्य पडताळून न पाहताच विश्वासही ठेवला. याचवेळी मला वाटलं की, ट्विटर आणि युट्यूबच्या माध्यमातून लोकांपर्यंत खरी माहिती पोहोचवावी. 2022च्या पावसाळ्यात महाराष्ट्रात सत्तांतरानंतर अश्विनी भिडे पुन्हा एकदा ‘एमएमआरसीएल’च्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून परतल्या. त्याच सुमारास मी ट्विटरवरून त्यांना विनंती केली की, आरे कारशेडवर माहितीपर व्हिडिओ शूट करून माझ्या युट्यूब चॅनेलवर प्रसिद्ध करण्यास परवानगी द्यावी. व्हिडिओ ‘एमएमआरसीएल’कडून तपासून घेतल्यानंतरच प्रसिद्ध केले जातील, अशीही मी त्यांना ग्वाही दिली. भिडे यांनीही मोठ्या मनाने लगेचच ती परवानगी दिली.
खरं तर प्रचंड विरोधी वातावरणात त्यावेळी मुंबईकरांना या मार्गिकेचे फायदे पटवून सांगणे कठीण होते. काही जण तर कोणत्याही तथ्याशिवाय वाद घालायचे. शेवटी मी ‘एमएमआरसीएल’च्या मंजुरीनंतर व्हिडिओ प्रसिद्ध केला आणि त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. अनेकांनी कमेंट करून धन्यवाद दिले. ‘आता समजलं, आम्ही गोंधळलो होतो,’ अशा त्यावर काही मुंबईकरांनी प्रतिक्रिया दिल्या. आरे कारशेडविरुद्ध सुरू झालेल्या प्रचार आणि विरोधाला प्रत्युत्तर देण्यापासून सुरू झालेली माझी ही यात्रा, आता त्याच मेट्रोमध्ये संपूर्ण मार्गावर प्रवास करण्यापर्यंत पोहोचली आहे. ही कहाणी माझ्यासाठी एक वैयक्तिक विजय आहे. आगामी काळातही मी अशा सर्व प्रकल्पांसाठी लोकांना खरी माहिती देत राहीन!
- सौरभ राऊत (एक्सवरील अकाऊंट )
मेट्रो-3चे यश हे मुंबईकरांचेच!
मी 2017 साली मेट्रो-3चा बारकाईने आढावा घ्यायला सुरुवात केली आणि त्यामुळे बर्याच गोष्टी जवळून पाहता आल्या. त्यावेळेस मी नियमितपणे या प्रकल्पाविषयी माझ्या ट्विटर हॅण्डलवरून माहिती देत होतो. हा एक नव्या काळाचा उदय होता.
अनेक भौगोलिक, नैसर्गिक अडथळे आणि आर्थिक आव्हानांच्या दिव्यांमधून मेट्रो-3चा प्रवास चालूच होता. एक नवे संकट उभे राहिले आणि ते शासकीय किंवा वित्तीय नव्हते, तर अगदी वेगळे असे पर्यावरणविषयक होते. त्यावेळेस ट्विटरवरून हा संघर्ष ‘मेट्रो-3 समर्थक विरुद्ध पर्यावरणवादी’ असा सतत रंगत होता. काही मूठभर पर्यावरणवादी सार्या मुंबापुरीला वेठीस धरायचे काम करत होते. पर्यावरणवाद्यांनी 2015 मध्ये ‘राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणा’त (छॠढ) याचिका दाखल करून आरेला ‘विकासमुक्त क्षेत्र’ घोषित करण्याची मागणी केली. 2019 मध्ये सत्तांतर झाले आणि पुन्हा एका नवीन संकटाला मेट्रो-3 तोंड देणार होती. मी त्यावेळेस ट्विटरवरून अशी काही भीती वर्तवली होती आणि मेट्रो-3च्या प्रमुख अश्विनी भिडे यांची बदली झाली. बरेच आरोप-प्रत्यारोप झाले; परंतु यामध्ये सामान्य मुंबईकर भरडला जाणार होता.
सप्टेंबर 2019 मध्ये आरे कारशेडवरुन तणाव शिगेला पोहोचला. विद्यार्थी, बॉलीवूड सेलिब्रिटी आणि कार्यकर्त्यांनी ‘आरे वाचवा’साठी मानवी साखळ्या तयार केल्या. हिंसक आंदोलनेही झाली. पण, त्यावेळी मेट्रोच्या आरे कारशेडचे अन्य समोर आलेले पर्याय हे देखील हास्यास्पद होते. जसे की, बीकेसी भूमिगत कारशेड, मुंबई पोर्ट ट्रस्ट, महालक्ष्मी रेसकोर्स असे अनेक पर्याय आंदोलकांनी दिले. परंतु, या संकटात अजून एक नवे संकट उभे राहिले होते, ते ‘कोविड-19’चे होते. वर्ष 2022 मध्ये पुन्हा एकदा सत्तापालट झाले आणि मेट्रो-3चे भाग्यही उजळले.
सुरुवातीचे विलंब, राजकीय अस्थिरता, ‘कोविड 19’ आणि पर्यावरणवादी अशा नाना संकटांना सामोरे जात आज मेट्रो-3ने मुंबईला एका नवीन वळणावर आणून ठेवले आहे. या सर्व प्रकल्पाचे श्रेय अश्विनी भिडे यांना दिले, तर नवल वाटायला नको. तसेच यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही मोलाचा वाटा आहे. मला प्रकर्षाने नाव घायचे असेल, तर मी मराठी कलाकार सुमित राघवन यांचे घेईन, त्यांचा मोलाचा पाठिंबा या प्रकल्पाला लाभला. तसेच असंख्य ट्विटर युजर्स यांचाही या श्रेयात खारीचा वाटा आहे. मेट्रो-3चे यश हे मुंबापुरीतील तमाम लोकांचे यश आहे आणि भविष्यातील एका नव्या युगाची ती नांदी ठरेल. आंदोलनाच्या घोषणांपासून प्लॅटफॉर्मवर वाट पाहण्यापर्यंत, मुंबईने एक मैलाचा दगड आज पार केला आहे आणि मुंबईचे भविष्यसुद्धा तेवढेच आशादायी आहे.
- चंद्रशेखर ढगे (‘एक्स’वरील अकाऊंट )
वाहतुककोंडीला सुरक्षित आणि सोयीस्कर पर्याय
जेव्हा आरे कारशेडवरुन वाद सुरू झाला, तेव्हा तो केवळ पायाभूत सुविधांच्या चर्चेपुरता मर्यादित राहिला नाही, तर तो भावनिक आणि अस्थिरता वादात परिवर्तित झाला. तेव्हाच मी ’उरीडहशवथरहळइरपशसर’ हा हॅशटॅग सुरू केला. हे आंदोलन म्हणून नव्हे, तर आठवण म्हणून की, विकासासंबंधीचे निर्णय भावना नव्हे, तर तर्कावर आधारित असले पाहिजेत. आरेविषयीची चर्चा झाडे वाचवण्याबद्दल नव्हतीच, तर ती मुंबई कोणत्याही राजकीय नाट्यांशिवाय आणि चुकीच्या माहितीशिवाय एक अत्यावश्यक सार्वजनिक प्रकल्प पूर्ण करू शकते का, याबद्दल होती. काळानुसार तो हॅशटॅग एका प्रतिआंदोलनात रूपांतरित झाला, जो घोषणाबाजीऐवजी माहिती, नकाशे आणि तांत्रिक तर्कांवर आधारित होता. आज पूर्णत्वास आलेली ही मेट्रो कुलाबा ते सीप्झदरम्यानचा प्रवास एका तासाच्या आत पूर्ण करते आणि शहरातील सर्वांत वाईट वाहतुककोंडीला सुरक्षित आणि सोयीस्कर पर्याय प्रदान करते.
- शिवम वाहिया (एक्सवरील अकाऊंट )
गती, प्रगती आणि विश्वास हीच मुंबईची खरी ओळख!
आम्ही पायाभूत सोयीसुविधा या विषयावरील आशयनिर्मितीच्या कामाला सुरुवात केली. कारण, आम्हाला जाणवलं की, आपल्या शहरात प्रकल्प खूप असतात; पण त्यामागचं सत्य लोकांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे अफवा, चुकीची माहिती आणि राजकारण यांच्या गोंधळात खरी मेहनत, वर्षानुवर्षांची योजना आणि तांत्रिक आव्हाने हरवत जातात. म्हणून आम्ही ठरवलं की, लोकांपर्यंत सत्य पोहोचवायचेच!
जेव्हा मुंबई मेट्रो-3 विरोधात आंदोलने झाली, त्यावेळी वृक्षतोड आणि पर्यावरणाच्या नावाखाली प्रकल्प थांबवण्याचे प्रयत्न झाले. त्यावेळी आम्हाला वाटलं, आता शांत राहणे चुकीचे होईल. आम्ही समाजमाध्यमांवर, विशेषतः ट्विटर (आताचे एक्स) वर, थेट लोकांशी संवाद साधला, त्यांचे गैरसमज दूरस्त केले आणि या प्रकल्पाचे खरे महत्त्व त्यांना पटवून दिले. आज जेव्हा या मेट्रोला विक्रमी प्रवासीसंख्या मिळाली, तेव्हा या शहराने स्वतः उत्तर दिलं, ही मेट्रो मुंबईसाठी आणि मुंबईकरांना अत्यावश्यक होती!
दिल्लीमध्येही मेट्रो प्रकल्पांसाठी प्रारंभी विरोधाचा सामना करावा लागला होता. पण, एकदा नागरिकांनी मेट्रोचे फायदे अनुभवले, तेव्हा मेट्रोला विरोध करणे, म्हणजेच राजकीय आत्महत्या असल्याचे सत्य उघड झाले. मुंबईतही तोच काळ आता आला आहे, विकास थांबवणं म्हणजे लोकांच्या भविष्याला अडवणं! मुंबई वेगाने पुढे जात आहे आणि हीच तिची खरी ओळख आहे गती, प्रगती आणि विश्वास!
- आकाश भावसार (एक्सवरील अकाऊंट )