आकाशदिव्यांची मांदियाळी

    17-Oct-2025   
Total Views |
प्रकाशाचा आनंदोत्सव म्हणजे दिवाळी. दिव्यांप्रमाणेच कंदिलांशिवाय दीपावलीचा हा सण अपूर्णच. शहरीकरणाचा रेटा जसजसा वाढत गेला, तसतसा उत्सव साजरा करण्याच्या पद्धतीमध्येसुद्धा कालौघात बदल होत गेला. सणवारांमुळे या शहरांना केवळ वेगळी ओळख मिळाली, एवढेच नाही, तर खऱ्या अर्थाने सण-उत्सवांमुळे आपली शहरं जिवंत झाली. मुंबईला ‌‘मायानगरी‌’ म्हटलं जातं आणि या मायानगरीचं तेजोमय रुप झळकतं ते दिवाळीमध्ये. दिवाळीचा सण आणि मुंबईतील माहिमची कंदीलगल्ली हे समीकरण दोन दशकांहून अधिक जुनं. तंत्रज्ञानाच्या वेगाने सावरत, घड्याळाच्या काट्यावर धावणारी मुंबई अधिकच वेगवान झाली. मात्र, कंदीलगल्लीचा प्रकाशमय थाट तसाच टिकून राहिला, किंबहुना विस्तारला आणि अधिक सर्वसमावेशी झाला. त्याचीच ही एक झलक...
 
 
diwali
 
चाकरमान्यांच्या रोजच्या येण्या-जाण्याच्या रस्त्यावर एक दिवस अचानक कंदिलांची भली मोठी आरास आपल्याला बघायला मिळते. घरी निघतानाच या कंदिलांचा प्रकाश डोळ्यांवर मोहिनी घालतो आणि आपली पावलं आपसूकच या रस्त्यावर वळतात. घरासाठी, कार्यालयासाठी, मंडळांसाठी लागणाऱ्या कंदिलांची आठवण होते आणि एका नव्या झगमगत्या विश्वामध्ये आपण प्रवेश करतो. दरवष नाना प्रकारचे कंदील, आपल्याला याठिकाणी बघायला मिळतात. विक्रीसाठी उपलब्ध असणाऱ्या या कंदिलांमुळे केवळ आपल्या घराचेच नव्हे, तर संपूर्ण शहराचे रुपडे बदलते.
 

diwali 
 
कंदीलगल्लीच्या पोटामध्ये आपल्याला या प्रकाशमय उत्सवाची रचना दिसून येते. दिवाळीच्या पाच ते सहा महिन्यांआधीपासून इथे कंदील बनवण्याची प्रक्रिया सुरू होते. काळानुरुप वाढलेल्या मागणीसह ग्राहकांची पसंतीसुद्धा बदलली आहे. हे वेगळेपण ओळखून, त्याला आपल्या सृजनातून प्रतिसाद देण्याचे काम इथले कारागीर करत असतात. घरामध्ये तसेच घराच्या बाहेर तयार होणाऱ्या कंदिलांची आरास आपल्याला यावेळी आपल्याला बघायला मिळते.
 
diwali
 
दिवाळीसाठी पारंपरिक कंदिलांच्या खरेदीला ग्राहकांची मोठी मागणी असल्याचे दिसून येते. कागदाचे, बांबूच्या काठीचे कंदील बनवणारे आणखी एक व्यवासायिक म्हणजे गुरुनाथ मांजरेकर. केवळ मुंबई आणि महाराष्ट्रच नव्हे, तर देशभरातून ग्राहक कंदिलांची खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे येतात. यासाठी कंदील तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक वयोगटातील लोकांचा सहभाग असतो. छंद म्हणून जोपासलेली कला, काळाच्या ओघात भक्कम रोजगाराचा पाया होते.

diwali 
 
कंदीलनिर्मितीच्या प्रक्रियेनंतर, थेट बाजारमध्ये विक्री सुरू होते. व्यावसायिकांसाठी आणि ग्राहकांसाठी हा आनंदाचाच क्षण असतो. आपल्याला हवा तसा कंदील मिळाल्याचा आनंद ग्राहकाच्या चेहऱ्यावर उमटलेला असतो. त्याचबरोबर लोक वैविध्यपूर्ण कलाकृतींना पसंती देतात, याचादेखील आनंद कारागिरांसाठी व व्यावसायिकांसाठी निराळाच असतो. छोट्या आकारापासून ते मोठ्या कंदिलांपर्यंत रंगांची, आकारांची, वैविध्यता थक्क करणारी असते.
 
diwali
 
रंगांच्या या बिल्लोरी दुनियेमध्ये लहान मुलं दिसली नाही तर नवलंच. आकाशदिव्यांचं नवं जग बघताना, एकाच वेळी कुतूहल, आनंद, उत्साह या सगळ्या भावना, या मुलांच्या चेहऱ्यावर झळकतात. डोळ्यांना सुखावणाऱ्या या आकाशदिव्यांची भूल जिथे मोठ्या माणसांना चुकली नाही, तिथे मुलांची काय कथा! एका क्षणासाठी साऱ्या चिंता विसरून, या नव्या विश्वामध्ये रममाण होताना आनंदाची एक वेगळीच लहर उमटते.

diwali
 
कंदीलगल्लीमध्ये एका बाजूला दिव्यांचा झगमगाट असताना, दुसऱ्या बाजूला मुंबईचं रुप-स्वरुप मात्र बदललेलं नसतं. मुंबईचा ठरलेला वेग, माणसांचा प्रवाह वाहत नेतच असतो. रस्त्याच्या एका कडेला कंदिलांची आरास मांडलेली असताना, दुसऱ्या बाजूला मुंबईच्या दैनंदिन जीवनावर त्याचं प्रतिबिंब उमटलेलं असतं. सणावाराचे दिवस जवळ आले तरी चाकरमानी आपल्या कामांत व्यस्त असतो. घरी परतत असताना, त्या दिवशीचा थकवा त्याच्या चेहऱ्यावर दिसतोच, मात्र त्याचसोबत त्याच्या डोळ्यांमध्ये दिवाळीनिमित्तचा उत्साहदेखील झळकत असतो. साऱ्यांना आपल्या पोटात सामावून घेणाऱ्या मुंबईचा असाही नवा चेहरा...
 
diwali
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‌‘आत्मनिर्भर भारता‌’चा विचार कोट्यवधी देशवासीयांच्या मनामध्ये पेरला. इथल्या कारागिरांच्या कलाकृतींना, त्यांच्या सृजनाला वाव मिळावा, त्याचबरोबर भारतीय कलाप्रकाराचं हे संचित सातासमुद्रापार जावं, हा विचार त्यांच्या मनात होता. याच पार्श्वभूमीवर ‌‘व्होकल फॉर लोकल‌’ हा विचार मनात ठेवून लोकांनी स्थानिक कारागिरांच्या हातून तयार झालेल्या कंदिलांची खरेदी केली. पर्यावरणपूरक दिवाळी साजरा करण्याचा विचार मनात ठेवून प्लास्टिक, थर्माकोलच्या कंदिलांना बाजूला सारत, तयार केलेले कंदील तितकेच नेत्रदिपक आहेत.
 
- छाया : अजिंक्य सावंत, संकलन : मुकुल आव्हाड
 
 
 
 
 
 
 

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.