संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचे प्रतिपादन; ओझर येथील कार्यक्रमात तेजससह प्रशिक्षणार्थी विमान राष्ट्राला समर्पित

17 Oct 2025 19:06:53

Rajnath Singh
 
नाशिक : (Defence Minister Rajnath Singh) नाशिकची भूमी आध्यात्मिकतेबरोबरचआत्मनिर्भरतेचे प्रतिक असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत आत्मनिर्भर होऊन बलशाली करण्यासाठी या भूमीतील हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) या प्रकल्पाची महत्त्वाची भूमिका आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. ओझरच्या एचएएल येथे तेजस विमानाची तिसरी उत्पादन साखळी आणि एचटीटी ४० या प्रशिक्षणार्थी विमानाच्या दुसर्‍या उत्पादन साखळीचा शुभारंभ शुक्रवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी सकाळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन, एचएएलचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. डी. के. सुनील, संरक्षण उत्पादन विभागाचे सचिव संजीवकुमार आदि उपस्थित होते.
 
संरक्षणमंत्री सिंह म्हणाले की, एचएएलमध्ये मिग, सुखोई ३०, तेजस आणि प्रशिक्षणार्थी विमानांची निर्मिती होऊन त्यांनी अवकाशात घेतलेले उड्डाण देश आणि संरक्षण विभागासाठी अभिमानाची बाब आहे. हे केवळ गौरवाचे उड्डाण नसून आत्मनिर्भर भारताचे उड्डाण आहे. गेल्या सहा दशकांपासून कार्यान्वित एचएएल संरक्षण उत्पादनांसाठी महत्त्वाचे आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत देशाला संरक्षण उत्पादनांबाबत इतर देशांवर अवलंबून राहावे लागत असे. ६५ ते ७० टक्के साहित्य आयात करावे लागायचे. आता परिस्थितीत बदलत असून ६५ टक्के साहित्य देशातच तयार होत आहे. लवकरच सर्व साहित्य आपल्या देशातच तयार करण्यात येईल. देशाचे हवाई दल नवीन तंत्रज्ञानाच्या विमानांमुळे अधिक मजबूत होईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह सैन्य दल, वायू दलातील वरिष्ठ अधिकारी, जिल्हा प्रशासन, एचएएलचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
२०२९ पर्यंत दुप्पट निर्यातमूल्य
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश संरक्षण साहित्य उत्पादनात स्वयंपूर्ण आणि सक्षम होत आहे. २०२९पर्यंत देशांतर्गत संरक्षण उत्पादन मूल्याचे तीन लाख कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. तर निर्यात मूल्य दुप्पट म्हणजेच ५० हजार कोटी रुपयांपर्यंत करण्याचे ध्येय आहे. गेल्या १० वर्षांत भारताने गतीने संरक्षण उत्पादन क्षेत्रात प्रगती केली आहे. त्यामुळे लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे, यंत्र, लढण्यासाठी आवश्यक इलेक्ट्रॉनिक साधनांची निर्मिती भारतातच होत आहे. तसेच मेक इन इंडियांतर्गत स्थानिक उत्पादकांना प्रेरणा देण्याचे काम सुरू असून स्थानिक उद्योजकांनाही पाठबळ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
 
ऑपरेशन सिंदूरमध्ये एचएएलचे योगदान
 
सध्या युद्धनीतीत बदल होत असून वेगवेगळ्या पातळ्यांवर लढाया लढल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर, ड्रोन सिस्टिम आणि नेक्स्ट जनरेशनमधील विमाने भविष्यातील लढायांची दिशा निश्चित करतील. एचएएल निर्मित मिग-२१ विमानांची देशांच्या सीमांचे संरक्षण केले. त्यात एचएएलचे योगदान उल्लेखनीय आहे, असे सांगत त्यांनी अलिकडेच राबविण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस एचएएलने पूर्ण क्षमतेने काम केले. या काळात त्यांनी २४ तास सेवा बजावली, असे सांगत एचएएलच्या अधिकारी व कर्मचार्‍यांचे संरक्षणमंत्री सिंह यांनी कौतुक केले.
 
रोजगाराची संधी उपलब्ध
 
एचएएल खासगी क्षेत्राच्या सहकार्याने जागतिक पातळीवर दर्जेदार उत्पादनांची निर्मिती करत आहे. हा परिसर डिजिटल, पेपरलेस आणि परिपूर्ण शाश्वत झाला आहे. तेजस आणि प्रशिक्षणार्थी विमानाच्या निर्मितीमुळे परिसरातील अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. तसेच आगामी काळात नागरी आणि सैन्य दलाच्या विमानांची दुरुस्ती, व्यवस्थापन आणि ओव्हरऑलची सुविधा यामुळे या दोन्ही क्षेत्रांत भारताची विकासाकडे वाटचाल सुरू झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.

Powered By Sangraha 9.0