मुंबई : (Shivajirao Kardile Passed Away) भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) यांचं अल्पशा आजारानं ६७ व्या वर्षी निधन झालंय. आज (शुक्रवार, १७ ऑक्टोबर २०२५) सकाळी शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. त्यांना छातीत त्रास जाणवल्यानंतर तातडीने अहिल्यानगर येथील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. आमदार शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांचे ते सासरे होते.
आमदार शिवाजीराव कर्डिले यांचा राजकीय प्रवास...
आमदार शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) यांच्या राजकारणाची सुरुवात १९८४ ला सरपंच पदापासून झाली. नंतर पुढे त्यांनी २००३-२००४ मध्ये मत्स्य व बंदरे विकास राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं. यानंतर २००९ आणि २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर राहुरी मतदार संघातून निवडून आले. मात्र यानंतर त्यांना २०१९ मध्ये हॅट्रिक करता आली नाही. त्यांना यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्राजक्त तनपुरे यांनी पराभूत केले. मात्र २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत या पराभवाची कर्डिले यांनी प्राजक्त तनपुरेंचा ३४,४८७ मतांनी पराभव करून परतफेड केली. २०१४ मध्ये शिवाजीराव कर्डिले यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचारसभा घेतली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून श्रद्धांजली...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी शोक व्यक्त करताना म्हटले आहे..."राहुरीचे आमचे आमदार आणि ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) यांच्या अकस्मात निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. शेतकऱ्यांसाठी अतिशय पोटतिडकीने काम करणारा नेता पक्षाने गमावला आहे. जिल्हा बँक असो की दूध संघ शेतकऱ्यांसाठी त्यांनी प्रत्येक ठिकाणी काम केले. स्वच्छता आणि आरोग्याच्या क्षेत्रात त्यांनी केलेले काम सुद्धा उल्लेखनीय असे होते. मतदारसंघातील प्रश्न ते अतिशय पोटतिडकीने मांडत आणि त्यातून लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यात ते यशस्वी ठरले. तळागाळाशी जोडलेली नाळ आणि शेवटच्या घटकांसाठी काम हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांची उणीव पक्षाला सतत भासत राहील. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ॐ शांति"
आमदार रोहित पवारांकडून शिवाजीराव कर्डीले यांना श्रद्धांजली अर्पण!
आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विट करत श्रद्धांजली अर्पण केली. ते म्हणाले... "राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांचं अल्पशा आजाराने निधन झाल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांचं असं अकाली जाण्याने त्यांचं कुटुंब आणि मतदारसंघासह सर्वांनाच धक्का बसला आहे. अनेकदा आमदार, राज्यमंत्री, अहिल्यानगर जिल्हा बँकेचे चेअरमन आदी विविध पदांवर त्यांनी केलेलं लोकाभिमुख कार्य कायम स्मरणात राहील. हे दुःख पचवण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना मिळो, ही प्रार्थना! आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत!
भावपूर्व श्रद्धांजली!"