आनंदाचा चित्रकार तू...

    17-Oct-2025
Total Views |

Praful Jadhavar
 
चित्रकला हाच श्वास अन् ध्यास असणार्‍या प्रफुल्ल जाधवर या तरूणाने लहानांपासून थोरांपर्यंत चित्ररेखाटनाचा आनंद प्रदान करुन तणावमुक्तीचा कलामंत्र दिला आहे. त्यांच्या जीवनाचा हा कॅनव्हास...
 
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक तणावमुक्तीसाठी चित्रकला हे देखील एक उपयुक्त माध्यम ठरु शकते, असा हजारोंना विश्वास देणार्‍या आणि चित्रकलेच्या माध्यमातून कलारसिकांच्या चेहर्‍यावर हसू उमटविण्याचा प्रयत्न करणारा युवक म्हणजे प्रफुल्ल जाधवर. कुंचल्यातून कॅनव्हासवर मानवी तणावाचे कागदावर रेखाटन करून, कलारसिकांना तणावमुक्त करण्याचे काम हा युवक करीत आहे. कलेतून मनस्वी आनंद उपभोगणार्‍या आणि त्याची मुक्तहस्ते उधळण करणार्‍या हा तरुणाने आपल्या संकल्पनांना आधुनिक काळात अनेकार्थांनी विकसित केले. म्हणूनच नव्या पिढीला सकारात्मकतेकडे घेऊन जाणार्‍या या तरुणाची चित्रकलेसंदर्भातील ही वाटचाल लक्षणीय.
 
विविध रंगछटांनी साकारलेली चित्रे ही नेत्रसुखकारक अशीच. पण, ही चित्रं आयुष्यातील ताणतणाव व्यवस्थापनासाठीही उपयुक्त ठरू शकतात, याची बव्हंशी कल्पना नसतेच. पण, पुण्यातील प्रफुल्ल जाधवर हा युवक चित्रकलेचा याच अनुषंगाने नित्यनेमाने प्रचार-प्रसार करतो. चित्रकला हा एकमेव ध्यास डोळ्यासमोर ठेवून, चित्रकारांची भावी पिढी घडविण्याचा प्रफुल्लचा मानस आहे. पण, दुसरीकडे चित्रकलेला मिळणारा अल्प प्रतिसाद असेल किंवा त्याकडे होणारे काहीसे दुर्लक्ष, याबाबत प्रफुल्ल खंतदेखील व्यक्त करतो. या जाणिवेतूनच कल्पनेचा कुंचला समाजाला आनंद प्रदान करण्यासाठी रंगवण्याचा विडा प्रफुल्लने उचलला आहे.
 
लहानपणी वृत्तपत्रांमध्ये छापून येणार्‍या गणपतीच्या चित्रांचे सूक्ष्म निरीक्षण करून प्रफुल्ल जसेच्या तसे त्या चित्रांचे पुन्हा रेखाटन करीत असे. यातून हळूहळू त्याला चित्रकलेची आवड निर्माण झाली. पुण्याच्या भवानी पेठेत बालपण गेल्याने, शहरात फिरताना प्रत्येक भागाचा इतिहास माहिती करून घेणे, याचा जणू त्याला छंदच जडला. पर्वती, तळजाई टेकडी, हनुमान टेकडी या ठिकाणी ट्रेकिंगची सवय लागली. ट्रेकिंगसोबत गड-किल्ल्यांचेही रेखाटन प्रफुल्लने आरंभले. पर्यावरणाच्या सान्निध्यात गेलो की, चित्र काढताना मन त्यातच रममाण होऊन जाते, हे लक्षात आल्यावर प्रफुल्लने चित्रकलेसोबत ट्रेकिंग असा आगळावेगळा दुहेरी उपक्रम हाती घेतला. एवढेच नाही तर त्याच्या हौशीला पुढे छायाचित्रणाचीही जोड मिळाली. पुण्यातील बाल जीवन विकास शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, चित्रकला विषयातच करिअर करणार, हे प्रफुल्लने घरात जाहीरच करुन टाकले होते आणि त्याच दिशेने त्याच्या चित्रकलेतील प्रवास साकारत गेला.
 
प्राणी, पक्षीनिरीक्षण तसेच, गड-किल्ल्यांच्या पायवाटा तुडवताना त्याच्या कुंचल्यातील रंग अधिक गहिरे होत गेले. ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स’मधून चित्रकला विषयात पदवी संपादन करुन कलासाधनेच्या तपस्येला प्रफुल्लने मूर्त रुप दिले. आपल्यातील कला स्वत:पुरती मर्यादित न ठेवता, प्रफुल्लने कलाप्रसाराचा निर्णय घेतला. विविध शाळांमध्ये आजही चित्रकला विषयाला म्हणावे तितके महत्त्व दिले जात नाही, हे बघून प्रफुल्लचे मन हेलावले. चित्रकला मोठी करायची असेल, तर चित्रकलेचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवावे लागेल, हे मनाशी पक्के ठरवून त्याने या कलासागरात स्वतःला झोकून दिले. तसेच त्याअनुषंगाने कार्य सुरू केले. मुंबई, हैदराबाद, राजस्थान, राजधानी दिल्लीसह देशातील विविध चित्रकारांच्या प्रदर्शनांना प्रफुल्लने आवर्जून भेटी दिल्या. नामांकित चित्रकारांना एकत्र करून चित्रकलेच्या प्रसारासाठी नियोजनबद्ध अनेक उपक्रमही हाती घेतले. देशाच्या कानाकोपर्‍यात चित्रकलेच्या कार्यशाळा आयोजित केल्या.
 
‘राष्ट्रीय संरक्षण अकादमीत’मधून तसेच अन्य शाळांतून कलाशिक्षक म्हणून काम करताना, विद्यार्थ्यांनी कल्पनाशक्ती, शिस्त आणि कलाप्रेमाचा संगम कसा साधायचा, कलाकौशल्य कसे विकसित करायचे, याचे धडे प्रफुल्ल आज देत आहेत. ‘चित्रकलेला आपली साधना समजून विद्यार्थ्यांचे यश हाच आपला अभिमान’ या विचाराने झपाटून प्रफुल्ल कार्यरत आहेत. तसेच ‘राष्ट्रीय संरक्षण अकादमी’त भावी अधिकार्‍यांनाही ते चित्रकलेचे धडे देतात. चित्रकलाच नाही तर मातीचा उपयोग करून विविध वस्तू घडवण्याचे कामदेखील प्रफुल्ल करतो. निसर्गाच्या सान्निध्यातून आपली कला आणखी प्रभावी करण्यासाठी त्याला बळ मिळते. पर्यावरण संवर्धनासाठी विविध वयोगटाच्या मुलांच्या सहलींचे आयोजनही प्रफुल्ल आणि त्याचे मित्र करतात. त्यातून लहान मुलांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले जाते आणि सहलींमध्ये मुलांना चित्रकलेचे धडेही दिले जातात.
 
‘पर्यावरणाची चित्रकला’ असा हा खूपच वेगळा विषय. निसर्गाच्या सान्निध्यात, पक्ष्यांच्या किलबिलाटात चित्र रेखाटताना एक वेगळाच मानसिक आनंद असतो. आपल्या मनातील भाव चित्रांद्वारे कागदावर रेखाटताना मनावरचा ताणही हलका होतो. यासाठी प्रफुल्ल विविध कार्यशाळांचे आयोजन करतो. पुण्यातील अनेक नामांकित शाळा, महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांसोबत गप्पा मारणे तर त्याला फार आवडते. पण, फक्त गप्पाटप्पाच नाही, तर विद्यार्थ्यांना कला विषयाचे कंगोरेही तो समजावून सांगतो. कला माणसाला विचारप्रवण करते. सध्याच्या काळात प्रत्येकजण धावत आहे. त्यामुळे स्वतःमधील गुण आपण विसरत चाललो आहोत. म्हणूनच कोणती तरी कला प्रत्येकाने आत्मसात केली पाहिजे, हा विचार घेऊन प्रफुल्लने चित्रकलेच्या प्रसारात स्वत:ला झोकून दिले आहे. त्याच्या या चित्रमयी कार्याला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!
 
 
 
- शशांक तांबे