भटके आणि विमुक्त समाजातील मुलामुलींच्या भावी शिक्षणासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे, असे हृद्यस्थ नारायणे प्रेरणा केली आणि सुरेशरावांच्या मनात संकल्पना आली, तिला मूर्त स्वरूप देण्याचा मुहूर्त दि. ११ ऑक्टोबर २०२५ ला आला. त्यासाठी त्यांनी आम्हाला घरी बोलावले. प्रतिष्ठानाची घोषणा करून ते थांबले नाहीत, तर मी, गिरीश प्रभुणे, अप्पा कारखानीस, उद्धव काळे यांना संस्थांना देण्यासाठी २५ हजारांचा धनादेश त्यांनी प्रत्येकाला दिला.
स्टेज नसलेलं, माईक नसलेलं, आठ-दहा श्रोत्यांपेक्षा अधिक श्रोते नसलेला, पण ‘सार्वजनिक.’ असा सार्वजनिक कार्यक्रम होऊ शकतो का? आणि अशा कार्यक्रमात ‘पद्मश्री’ सन्मानित दोन व्यक्ती जाऊ शकतात का? एक ‘पद्मश्री’ पुणे-चिंचवडहून आले आणि दुसरे ‘पद्मश्री’ मुलुंडहून आलेले. कार्यक्रमाचे स्वरूपच असे होते की, आम्हा दोघांनाही कार्यक्रमास जाण्यावाचून पर्याय नव्हता.
डोंबिवलीनिवासी सुरेशराव पिंगळे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी ताई पिंगळे आणि मामा पिंगळे यांच्या नावे एक प्रतिष्ठान स्थापन करण्याचा संकल्प केला. आज सुरेशराव यांचे वय वर्षे ८७ इतके. सुरेशराव हे सुरूवातीपासून ते अनेक संस्थांशी संलग्न होते. स्वतः जवळचे ५१ लाख रूपये या प्रतिष्ठानसाठी त्यांनी देण्याचे ठरविले. सार्वजनिक न्यासाचा उद्देश असतो. या न्यासाचा उद्देश भटके आणि विमुक्त समाजातील मुलामुलींना महाविद्यालयीन आणि उच्च शिक्षणासाठी साहाय्य करण्याचा आहे.
मा. सुरेश पिंगळे हे कोणी गर्भश्रीमंत व्यक्ती नव्हे. मध्यमवर्गीय माणसाचे जसे जीवन असते, तसे त्यांचे जीवन आहे. बँकेत नोकरी केली, उच्च पदावरून निवृत्त झाले. नोकरी करीत असताना जे धन प्राप्त झाले, ते ’उदास विचारे तेच करून‘ शिल्लक जमा केली. मुलं मोठी झाली, कर्तृत्त्ववान निघाली आणि आपापल्या व्यवसायात चांगल्या स्थानी स्थिर झाली. या सर्व परिवाराने ताई पिंगळे (मनोरमा नारायण पिंगळे) आणि मामा पिंगळे (नारायण गोविंद पिंगळे) यांच्या स्मरणार्थ ५१ लाख रूपयांचा निधी उभा केला.
सुरेशराव पिंगळे यांच्या घरी या कार्यक्रमासाठी त्यांचे जवळचे मित्र एकत्र झाले होते. काहीजण ऐंशीच्या उंबरठ्यावर होते, काहीजणांनी पंचाहत्तरी पार केली, आणि साठीच्या खाली मित्रपरिवारातील कुणी नव्हता. लौकिक भाषेत सांंगायचे तर हा वयोवृद्धांचा मेळावा होता. पण, सर्वांचा उत्साह पंचवीशीतील तरूणांना लाजवेल असाच होता. वयाने शरीर थकत जाते, विचाराने आणि भव्य आकांक्षेने मन मात्र चिरतरूण राहते. अशा चिरतरूण वयोवृद्धाबरोबर बसण्याचे भाग्य मला लाभले.
आताचा काळ ‘अणु कुटुंबा’चा (न्यूक्लिअर फॅमिली) आहे. या कुटुंबात पती-पत्नी किंवा एखादे अपत्य असते. भावाबहिणींचा परस्परांशी फार घनिष्ठ संबंध राहतो असा नाही. अनेक ठिकाणी आईवडील आळीपाळीने एकेका अपत्याच्या घरी राहतात. म्हणजे त्यांचे बिर्हाड फिरस्तीचे बिर्हाड होते. तीन मुले आणि सुरेशराव पिंगळे, सुना आणि नातवंडे असे सर्व एकाच घरात राहतात. सर्वांना पुरेशी जागा मिळेल, एवढे मोठे घर आहे. नातेबंधाने ते घट्ट जोडलेले आहेत आणि त्याला ’पिंगळेशक्ती‘ म्हणायला पाहिजे. प्रत्येक परिवाराची अशी शक्ती असते. एकत्र राहण्यात शक्ती आहे. एकत्र काम करण्यात शक्ती आहे, सामूहिक निर्णय घेण्यात शक्ती आहे आणि ही शक्ती पारिवारीक परमानंद देणारी शक्ती आहे. त्याची अनुभूती मी आणि गिरीश घेत होतो.
भटके आणि विमुक्त कामाशी कल्याण-डोंबिवलीचा फार घनिष्ठ संबंध. यमगरवाडीचे काम उभे राहताना माझा निवास डोंबिवलीतच होता. प्रारंभीच्या काळात निवासी मुलांच्या अनेक अडचणींचा विचार करावा लागे. दोन वेळचे पोटभर जेवण, थंडीवार्यापासून रक्षण करणारा निवारा, औषोधोपचार, कपडे, शैक्षणिक साहित्य अशा सर्वांची व्यवस्था करण्यासाठी भरपूर पायपीट करावी लागे. डोंबिवलीतील अनेक संस्थांनी जेव्हा गरज लागेल, तेव्हा खंबीरपणे पाठीशी उभे राहून जे साहाय्य केले त्याला तोड नाही. सुरेशराव पिंगळे यांच्या घरी एकत्र आलेल्या प्रत्येकाचे यमगवाडी प्रकल्पासाठी काही ना काहीतरी योगदान राहिलेले आहे.
आता प्रकल्पाला ३० वर्षे झाली. काही पिढ्या शिक्षण घेऊन बाहेर पडल्या. चिंचवडला नवीन प्रकल्प उभा करण्याची गरज निर्माण झाली. ‘समरसता पुनरूत्थान गुरूकुलम’ या नावाने प्रकल्प सुरू झाला आणि दोन्ही ठिकाणी आता आठशेहून अधिक भटके आणि विमुक्त समाजातील मुले-मुली आपले भविष्य घडवीत आहेत. ही भारत घडविणारी उगवती पिढी आहे. अजूनही ती गरीब, वंचित आहे, पण सामर्थ्यवान आहे. आपला धर्म, संस्कृती आणि देश यांचा जिवंत अभिमान बाळगणारी आहे.
या मुलामुलींच्या भावी शिक्षणासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे, असे हृद्यस्थ नारायणे प्रेरणा केली आणि सुरेशरावांच्या मनात संकल्पना आली, तिला मूर्त स्वरूप देण्याचा मुहूर्त दि. ११ ऑक्टोबर २०२५ ला आला. त्यासाठी त्यांनी आम्हाला घरी बोलावले आणि प्रतिष्ठानाची घोषणा करून ते थांबले नाहीत. तर मी, गिरीश प्रभुणे, अप्पा कारखानीस, उद्धव काळे यांना संस्थांना देण्यासाठी २५ हजारांचा धनादेश त्यांनी प्रत्येकाला दिला. तेव्हा मला एका संस्कृत सुभाषिताची आठवण झाली. सुभाषितकार म्हणतो की, शंभरात एखादा शूर असतो, हजारात एखादा पंडित असतो, दहा हजारात एखादाच वक्ता असतो, परंतु दाता मात्र अत्यंत दुर्मीळ असतो. अशा दुर्मीळ दातृत्वाच्या परिवारात आयुष्यातील काही क्षण घालविता आले, याचा मला आनंद झाला.
सुरेशराव पिंगळे यांनी आपल्या कृतीने समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे. एका विशिष्ट जातीला शिव्या घालणारी अपवित्र तोंडे महाराष्ट्रात भरपूर आहेत. पण, ज्यांना तुम्ही शिव्या घालता ते समाजातील सर्वांत दुर्लक्षित घटकाची किती आपुलकीने चिंता करतात, हे शिव्या ऐकणार्यांनी तरी लक्षात घ्यायला हवे. समाजाभिमुख होण्याची प्रेरणा त्यातून मिळेल.