मुंबई : (Chhattisgarh Naxalite Surrender) छत्तीसगडमधील रायपूरपासून सुमारे ३०० किमी दक्षिणेस असलेल्या बस्तर जिल्ह्यातील जगदलपूर येथे रिझर्व्ह पोलिस लाईनवर ११० महिला नक्षलवाद्यांसह २०८ नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलासमोर आत्मसमर्पण केले आणि मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी शस्त्रे टाकली. या घटनेमुळे छत्तीसगडमधील बंदी घातलेल्या सीपीआय माओवादी चळवळीला मोठा धक्का बसला आहे.
नक्षलवादी नेता रूपेशच्या नेतृत्वाखाली आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांकडून १५३ शस्त्रे जमा केली आहे.यामध्ये एके-४७ रायफल्स, इन्सास असॉल्ट रायफल्स, सेल्फ-लोडिंग रायफल (एसएलआर), बॅरल ग्रेनेड लाँचर (बीजीएल) आणि इतर शस्त्रे समाविष्ट आहेत. या आत्मसमर्पणासाठी 'पुना मार्गेम' हा औपचारिक समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी , व्यासपीठावरील प्रत्येकाला भारतीय संविधानाची प्रत आणि गुलाबाचे फूल देण्यात आले, जे माओवादी कार्यकर्ते पुन्हा मुख्य प्रवाहात सामील होत असल्याचे दर्शवते.
आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांचे पुनर्वसन केले जाणार आहे. त्यांना नवीन जीवन सुरू करण्यास मदत केली जाणार आहे. यासह, अबुझमाडचा बहुतांश भाग नक्षलमुक्त झाला आहे, ज्यामुळे उत्तर बस्तरमधील लाल दहशतीचा अंत झाला आहे. दरम्यान, मागील दोन दिवसात २५८ नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण केले.
जमा केलेल्या शस्त्रांची यादी:
१) एके-४७ रायफल: १९
२) एसएलआर रायफल: १७
३) आयएनएसएएस रायफल: २३
४) आयएनएसएएस एलएमजी: ०१
५) .३०३ रायफल: ३६
६) कार्बाइन: ०४
७) बीजीएल लाँचर: ११
८) १२ बोअर/ सिंगल शॉट: ४१