‘जेन-झी‌’ प्रयोगाचा दुसरा अंक

16 Oct 2025 12:03:09

The Gen-Z movement in Madagascar
 
 
 
मादागास्कर हे आफ्रिकेच्या पूर्वेला असलेलं छोटं, पण भूराजकीयदृष्ट्या महत्त्वाचं द्वीपराष्ट्र. गेल्या काही दिवसांत इथे घडलेली घटना केवळ त्या देशापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती संपूर्ण जगासाठी चिंतनाचा विषय ठरली आहे. राष्ट्रपती ॲण्ड्री राजोएलिना यांच्या विरोधात उभे राहिलेले ‌‘जेन-झी‌’चे आंदोलन इतके तीव्र झाले की, त्यामुळे राष्ट्रपतींना देश सोडून पलायन करावे लागले. वीज, पाणी आणि भ्रष्टाचाराविरुद्ध सुरू झालेली ही मोहीम काही दिवसांत सत्तांतराचा पाया ठरली. परंतु, या आंदोलनाच्या मुळाशी फक्त असंतोषच नव्हता, तर तरुणाईच्या ऊर्जेचा राजकीय हेतूसाठी वापर करण्याचा पद्धतशीर प्रयोगही होता.
 
‌‘जेन-झी‌’ म्हणजे 1997 सालानंतर जन्मलेली ती पिढी जी इंटरनेट, मोबाईल आणि सोशल मीडियाच्या युगात वाढली. माहितीचा महासागरच तिच्या बोटांच्या टोकावर आहे; पण सत्य आणि अफवा यांच्यातील अंतर ओळखण्याची क्षमता अजूनही पुरेशा प्रमाणात विकसित झालेली नाही. ही पिढी उत्साही, जोशात भरलेली आणि ‌‘बदल आता लगेच हवा‌’ या मानसिकतेने प्रेरित आहे. हाच स्वभाव तिचे बळ आणि मर्यादा दोन्ही ठरतो. मादागास्करमध्ये याचेच प्रत्यंतर पाहायला मिळाले. मादागास्करमध्ये प्रशासनातील त्रुटी, महागाई, भ्रष्टाचार या खऱ्या समस्या होत्याच. पण, त्यांचा वापर करून देशभरात आंदोलनाचा विस्फोट घडवण्यात आला. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर, लष्कराने हस्तक्षेप केला आणि मादागास्करचे लोकशाही सरकार एका क्षणात कोसळले.
 
या घटनेतील धक्कादायक बाब म्हणजे, ‌‘जेन-झी‌’च्या ऊर्जेचा अविवेकी वापर करण्याची पद्धत, ही आता जागतिक राजकारणात एक नवीन शस्त्र म्हणून उदयास येत आहे. नेपाळमध्ये काही महिन्यांपूव याचा पहिला प्रयोग जगाने पाहिला. या दोन्ही घटनांमध्ये समान सूत्र म्हणजे, तरुणाईचा उत्साह आणि त्याचा योजनाबद्ध पद्धतीने केलेला वापर. कोणत्याही समाजात असंतोष ही नैसर्गिक भावना असतेच; पण त्याचा वापर सत्तेच्या खेळासाठी केला गेला, तर लोकशाहीच्या मुळावरच घाव बसतो.
 
लोकशाहीमध्ये असंतोष व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य, हेच तिचे सौंदर्य आहे; पण जेव्हा असंतोषाचे आवाज अविवेकी आक्रोश होतात, तेव्हा लोकशाहीची संतुलनरेषा आपसूकच ओलांडली जाते. आंदोलन सरकारला जागे करण्याचा, धोरणांचे पुनर्विलोकन करण्याचा संकेत असतो. पण, अलीकडे हा संकेतच सत्ता उलथवण्याचे साधन होत चालला आहे. मादागास्करमध्ये हेच झाले. आंदोलन हळूहळू उन्मादात बदलले आणि शासनसंस्थांचा सन्मान पूर्णपणे पायदळी तुडवला गेला.
 
‌‘जेन-झी‌’ ही पिढी मीच बदल घडवू शकतो, या आत्मविश्वासाने जगते. तिच्या विचारात वेग आहे; पण तोच वेग कधीकधी दिशाहीन ठरतो. सोशल मीडियावरील मोहिमा, हॅशटॅगचे ट्रेण्ड आणि बाह्य शक्तींच्या प्रचारयंत्रणांमुळे तरुणाईची भावना सहज भडकते. आजचे युद्ध अस्त्रशस्त्रांबरोबरच, माहिती आणि भावना यांच्या माध्यमातूनही लढले जात आहे. या युद्धात तरुणाईचा वापर ‌‘प्रभावी सैन्य‌’ म्हणून करणे सोपे झाले आहे. या अदृश्य खेळात राष्ट्रविघातक कारस्थाने उभी राहतात आणि तरुणाईला त्याची कल्पनाही नसते.
  
मादागास्करची घटना म्हणजे, एक चेतावणी आहे की, तरुणाईला जर योग्य दिशा दिली नाही, तर तिची ऊर्जा विनाशाकडे वळू शकते. प्रत्येक राष्ट्राचा पाया ही त्याची तरुणाई असते. हीच पिढी शिक्षण, तंत्रज्ञान आणि उद्योगांच्या माध्यमातून देश पुढे नेते. पण, जेव्हा ही शक्ती रस्त्यावर येते आणि तिच्या मागे कोणीतरी राजकीय हेतूने सूत्र हलवत असतो, तेव्हा ती शक्ती विध्वंसक ठरते. सरकारच्या चुका सुधारण्यासाठी तरुणांनी आवाज उठवावा; पण तो आवाज विवेकाच्या चौकटीत राहावा, भावना आणि रागाच्या लाटेत वाहून जाऊ नये.
 
आज जगभरात असंतोषाच्या ठिणग्या उडत आहेत. आंदोलने आवश्यक आहेतच; पण ती संवादासाठी असावीत, सत्ताबदलासाठी नव्हे. ‌‘जेन-झी‌’ला याच गोष्टीची जाणीव करून देणे, ही आजच्या सर्व समाजघटकांची जबाबदारी. मादागास्करचा धडा जगातील प्रत्येक लोकशाहीसाठी महत्त्वाचा आहे. तरुणाईला बंदी घालायची नाही; पण तिचे दिशादर्शन करायचे आहे. कारण, आजची तरुणाई शासन उलथवण्याचे हत्यार बनली, तर ‌‘लोकशाही‌’ नावाची संकल्पनाच कोमेजून जाईल. आज जगाला गरज आहे ती संतुलनाची; तरुणांच्या उत्साहाचा आदर करतानाच, लोकशाहीच्या सीमांचेही भान ठेवण्याची!
 
 
-कौस्तुभ वीरकर  
 
Powered By Sangraha 9.0