विरोधकांनी पेटविले नकारात्मकतेचे दिवे!

16 Oct 2025 10:34:16
EVM machine
 
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्यामुळे राज्यातील विरोधी पक्षही खडबडून जागे झाले. म्हणूनच राहुल गांधींनी ज्याप्रमाणे मतदार यादीच्या आणि मतचोरीच्या मुद्द्यावरुन आरोपांची राळ उडवून दिली, त्यांच्याच पावलावर पाऊल काल महाविकास आघाडीने टाकले. त्यात निवडणुका ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर घेण्याची विरोधकांची मागणी म्हणजे आगामी निवडणुकीत दिसणाऱ्या संभाव्य पराभवाचेचे पडघम म्हणावे लागेल.
 
महाराष्ट्रातील राजकीय पक्षांना आता मुंबईसह राज्यातील सर्व महापालिकांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे), आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या तीन पक्षांची महायुती आणि उद्धव सेना, काँग्रेस यांची महाविकास आघाडी अधिक राज ठाकरे असे दोन प्रमुख गटांमध्ये पुन्हा एकदा संघर्ष पेटणार आहे. पण, या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल आता त्या त्या शहरातील विकास कामे ठरविणार आहेत, असे दिसते. या स्थितीत उबाठा सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या महापालिका निवडणुकांमध्ये मतदानपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची केलेली मागणी ही या पक्षांची नकारात्मक भूमिका दर्शविणारी आहे. कारण, ‌‘ईव्हीएम‌’ना सर्व देशभरातील मतदारांनी आपली पसंती दिलेली आहे. पुन्हा जुन्या पद्धतीने मतदान करणे हे मागासलेपणाचे लक्षण तर आहेच; पण विरोधकांच्या पराभूत आणि नकारात्मक मानसिकतेचेही द्योतक आहे. स्पष्टच सांगायचे झाल्यास आगामी महापालिका निवडणुकीत मुंबईकरांकडे मते मागण्यासाठी उबाठा सेना आणि मनसे यांच्याकडे एकही मुद्दा नाही. मुंबई महापालिकेच्या निकालावर मुंबईतील भूमिगत मेट्रो रेल्वे सेवा, कोस्टल रोड, नवी मुंबईतील नवा विमानतळ यांसारख्या प्रकल्पांच्या यशाचा फार मोठा प्रभाव राहील, हे उघड होत चालले आहे. हीच गोष्ट अन्य शहरांच्या महापालिका निवडणुकीबाबतही निर्णायक ठरेल.
 
कोणत्या मुद्द्यावर महाविकास आघाडी मुंबईकरांकडे मते मागणार आहे? तब्बल तीन दशके मुंबईची सत्ता हाती असूनही उबाठा सेना आणि मनसे या पक्षांकडे मुंबईकरांना सांगण्यासारखे एकही काम किंवा प्रकल्प नाही, ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे? बहुदा त्याची जाणीव झाल्यामुळे काहीतरी खुसपट काढणे आणि विघ्नसंतोषीपणा करणे, यावरच या आघाडीचा भर राहील असे दिसते. मतपत्रिकेद्वारा मतदानाची मागणी ही अशाच विघ्नसंतोषीपणाचे द्योतक. राज्यातील महापालिका निवडणुकांना अजून काही महिने अवकाश असला, तरी उबाठा सेना आणि राज ठाकरे यांची खरी अडचण ही आहे की, सध्या अशी कोणतीही लाट किंवा कोणताही भावनिक विषय नाही की, ज्यावरून मुंबईकरांची मते फिरविता येतील. कारण, त्यांचे राजकारण हे ठोस कार्यापेक्षा भावनिक मुद्द्यांभोवतीच फिरते.
 
वास्तविक गेल्या वष झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला मोठे यश प्राप्त झाले. पण, तेव्हाही मतदान हे ‌‘ईव्हीएम‌’द्वारेच घेतले गेले होते. मग तेव्हा ठाकरे बंधूंनी आणि महाविकास आघाडीतील अन्य पक्षांनी त्याविरोधात का भूमिका घेतली नाही? नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी त्याच्याबरोबर उलट निर्णय दिला. याचा अर्थ ‌‘ईव्हीएम‌’ असो की मतपत्रिका, त्याचा मतदानाशी काही संबंध नाही. मतदारांना कोणता पक्ष किंवा आघाडी सत्तेत आणायची आहे, त्यावरच निवडणुकीचा निकाल अवलंबून असतो. ‌‘ईव्हीएम‌’ना प्रभावित करता येत नाही. पण, मतदान केंद्र ताब्यात घेऊन आपल्या उमेदवाराच्या नावावर ठप्पे मारणे अधिक सोपे आहे, हेच ही मागणी करण्यामागील खरे कारण म्हणावे लागेल.
 
खरी गोष्ट अशी आहे की, गेली 25-30 वर्षे मुंबईकरांनी उबाठा सेनेचा कारभार जवळून पाहिला. केवळ पाहिला आहे, असे नव्हे, तर तो सहन केला आहे. केवळ ‌‘मराठी माणूस‌’ या एकाच निकषावर उबाठा सेनेचे सारे प्रमाद मुंबईकरांनी मोठ्या मनाने माफ केले होते. पण, त्याचा अर्थ आपण काहीही केले, तरी आपले कोणीच वाकडे करू शकत नाही आणि मुंबई महापालिकेतून आपल्याला कोणीच सत्तेबाहेर काढू शकत नाही, असा गैरसमज उबाठा सेनेने करून घेतला. महापालिकेतील प्रचंड भ्रष्टाचार हा मुंबईकरांच्या जिवावर उठू लागल्यावर मुंबईकरांनी शेवटचा घाव घालण्याचा निर्णय घेतला.
 
उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिदत तर मुंबईकरांचे दैनंदिन जीवन अधिकच धोकादायक आणि खडतर करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे निवडणुकांना अद्याप तीन महिने अवकाश असला, तरी मुंबईकरांच्या मनाने महापालिकेची सत्ता कोणत्या पक्षांकडे सोपवायची, याचा निर्णय आधीच घेऊन टाकला आहे, असे जाणवते. याचे जिवंत उदाहरण म्हणजे नुकतीच सुरू झालेली आरे कॉलनी ते कफ परेड ही भूमिगत मेट्रो रेल्वे सेवा. हा मार्ग पूर्णपणे वाहतुकीस खुला केल्याच्या दुसऱ्या दिवसापासून या मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत भरीव वाढ झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते. आज ही मेट्रो सेवा मुंबईकरांची सर्वांत लाडकी आणि मनपसंत बनली आहे. या मेट्रोला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहिल्यावर याच मेट्रोचे काम उद्धव ठाकरे यांनी आपल्या वैयक्तिक अहंकारापोटी थांबविले होते, याची सतत जाणीव मुंबईकरांना होत आहे. या वेगवान आणि सुखदायक प्रवासापासून आपल्याला या नेत्याच्या अहंकाराने तीन वर्षे वंचित ठेवले होते, हे मुंबईकर नक्कीच विसरणार नाहीत!
 
केवळ मेट्रोच नव्हे, तर मुंबईतील कोस्टल रोडमुळेही मुंबईतील वाहतुकीची समस्या हळूहळू माग लागणार आहे. कोस्टल रोडवर प्रवासी अतिशय खूश आहेत, हे या मार्गाला मिळत असलेल्या उदंड प्रतिसादाने दिसून येते. अटल सेतूमुळेही मुंबईबाहेर झटपट पडण्यास फार मोठी मदत मिळत आहे. पुणे किंवा कोकणात जाणाऱ्यांसाठी अटल सेतू वरदान ठरत आहे. आता तर नवी मुंबईतील नव्या विमानतळामुळे या अटलसेतूचे महत्त्व अधिकच वाढेल. ठाणे आणि बोरिवली तसेच गोरेगाव-मुलुंड यांना जोडणारे नवे महामार्ग बांधले जात आहेत. मुंबईतील जनजीवन अधिक सुसह्य आणि सोयीस्कर करण्यात या पायाभूत सुविधांचा निश्चितच सिंहाचा वाटा असून त्या सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या पक्षाला त्याचा लाभ नक्कीच मिळेल. पुण्यातील मेट्रो रेल्वेलाही असाच भरभरून प्रतिसाद मिळत आहे. पुणेकरांना सार्वजनिक वाहतूक सेवेची सवय नसल्याने ही मेट्रो रेल्वे अयशस्वी ठरेल, अशी भाकिते दरडावणीच्या आवाजात करणाऱ्या नेत्याची वाचा या मेट्रोला पुणेकर देत असलेला प्रतिसाद पाहून बसली आहे.
दिवाळीनिमित्त शिवाजी पार्कभोवती रोषणाई करण्याच्या मनसेच्या उपक्रमाचे उद्घाटन उद्धव ठाकरे करणार आहेत.
 
पण, महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीने नकारात्मकतेचे दिवे पेटविले आहेत, ते निकालानंतर विझल्याशिवाय
राहणार नाही!
 
 
Powered By Sangraha 9.0