मेट्रो ३ला मिळणारा प्रतिसाद हा अभूतपूर्व विजय : सौरभ राऊत

16 Oct 2025 20:44:26

saurabh raut


ट्विटरवर अनेक हँडल्स आहेत जे सरकारी निर्णय, न्यायालयीन सुनावण्या आणि प्रकल्पांच्या आकडेवारीसह सर्व माहिती देतात. फक्त आपली शिकण्याची वृत्ती हवी. त्या काळात मुद्दा लाईन ३ चा होता, उद्या तो बुलेट ट्रेनचा असेल. पण खात्रीने सांगतो, बुलेट ट्रेनदेखील सर्व स्तरांतील लोक मोठ्या प्रमाणात वापरतील. हे काही अवघड विज्ञान नाही, फक्त सामान्य विचार आणि थोडंसं संशोधन केलं तरी कोणत्याही प्रकल्पाचं महत्त्व समजू शकतं.

आजच्या घडीला मुंबई मेट्रो लाईन ३ सर्वसामान्य जनतेसाठी पूर्णपणे कार्यान्वित झाली असून, उद्घाटनाच्या पहिल्याच आठवड्यात लोक मोठ्या प्रमाणात या लाईनचा वापर करत आहेत. हे अपेक्षितच होतं, कारण ही लाईन मुंबईतील अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणांमधून जाते. जसे की, सिप्झ, विमानतळाचे दोन्ही टर्मिनल्स, बीकेसी, दादर, तसेच मुंबई सेंट्रल, सीएसएमटी, चर्चगेट यांसारखी प्रमुख रेल्वे टर्मिनल्स. एवढंच नव्हे, तर ही लाईन हुतात्मा चौकाजवळील उच्च न्यायालय आणि विधान भवनाजवळील मंत्रालयालाही जोडते. त्यामुळे, ही लाईन दैनंदिन कार्यालयीन कर्मचारी असोत किंवा विमानतळावरून दक्षिण मुंबईकडे जाणारे प्रवासी असोत या सर्व स्तरांतील लोक मोठ्या प्रमाणावर वापरतील, हे साहजिकच होतं.परंतु, काही वर्षांपूर्वी परिस्थिती वेगळी होती. त्यावेळी या कार्यक्षम मेट्रो लाईनविरुद्ध देशभर ऑनलाइन आणि ऑफलाइन आंदोलनं झाली होती.


होय, काही लोकांनी हे विरोध मुद्दामहून त्यांच्या स्वार्थासाठी किंवा स्वतःच्या प्रचारासाठी उभे केले, हे सर्वांना माहीत होते. पण दुर्दैवाने अनेकांनी त्या अफवा आणि अपप्रचारावर सत्य पडताळून न पाहताच विश्वास ठेवला. याचवेळी मला वाटलं की, ट्विटर आणि यूट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लोकांपर्यंत खरी माहिती पोहोचवावी. कारण सर्वसामान्य माणूस नोकरी, दैनंदिन आयुष्य या कारणांमुळे आरे कारशेड कुठे आहे?, लाईन नेमकी कुठून जाते?, काय जोडते? हे स्वतः जाऊन पाहू शकत नाही.

२०२२च्या पावसाळ्यात, महाराष्ट्रात सत्तांतरानंतर आदरणीय अश्विनी भिडे मॅडम पुन्हा एकदा एमएमआरसीएलच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून परतल्या. त्याच सुमारास मी ट्विटरवरून त्यांना विनंती केली की, आरे कारशेडवर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ शूट करून माझ्या यूट्यूब चॅनेलवर प्रकाशित करण्यास परवानगी द्यावी. व्हिडिओ एमएमआरसीएलकडून तपासून घेतल्यानंतरच प्रसिद्ध केले जातील, असेही मी सांगितले. भिडे मॅडमनी मोठ्या मनाने लगेचच ती परवानगी दिली. या व्हिडिओचा मुख्य उद्देश लोकांना कारशेडचे प्रत्यक्ष लोकेशन दाखवणे हा होता. कारण अनेकांना आरे कारशेड नेमकं कुठे आहे हे माहीत नव्हतं. विरोधकांचा दावा होता की, हे कारशेड संपूर्ण आरे जंगल नष्ट करेल. तसेच काही जण म्हणत होते, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पर्यावरणावरही याचा परिणाम होईल.

इन्स्टाग्रामवर लोक म्हणायचे की “आरे कारशेड म्हणजे मुंबईचे फुफ्फुसे हिरावून घेणे.” पण प्रत्यक्ष पाहिल्यावर लक्षात आलं असतं की, हे कारशेड जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडलगत म्हणजे आधीपासूनच वस्ती असलेल्या भागात आहे. तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा शेवटचा टप्पा कारशेडच्या बराच उत्तरेकडे आहे. त्यानंतर आरे मिल्क कॉलनी येते आणि हा कारशेड त्या कॉलनीच्या खालच्या टोकावर आहे. फक्त “आरे” हे नाव असल्यामुळे विरोधकांना हे लोकांच्या मनात “जंगल नष्ट होतंय” असं पटवून देणं सोपं गेलं. त्यामुळे मी ठरवलं की, लोकांना प्रत्यक्ष दाखवावं की कारशेड कुठे आहे आणि त्याचा परिसर काय आहे.गूगल अर्थच्या हिस्टरी इमेजरीत पाहिलं असता, २०१०च्या आधीपासूनच तो भूखंड ओसाड होता. हिरवाई होती, पण मोठमोठी झाडं नव्हती,ती गुरं चरण्याची मोकळी जमीन होती. पण दुर्दैवाने बहुतांश लोक कोणत्याही आंदोलनामागचं खरं शोधण्याचा प्रयत्न करत नाहीत. मी त्या ट्विटर युजरपैकी एक होतो, जे आरे कारशेडची खरी माहिती देत लोकांना सांगत असे की ते कुठे आहे आणि मेट्रो लाईन ३ प्रत्यक्षात किती उपयुक्त ठरणार आहे. खरंतर प्रचंड विरोधी वातावरणात त्यावेळी लोकांना या मार्गिकेचे फायदे पटवून सांगणे कठीण होते. ते कोणत्याही तथ्याशिवाय वाद घालत असत. शेवटी मी एमएमआरसीएलच्या मंजुरीनंतर व्हिडिओ प्रसिद्ध केला आणि त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. अनेकांनी कमेंट करून धन्यवाद दिले. या प्रतिक्रिया “आता समजलं, आम्ही गोंधळलो होतो!” अशा होत्या. हेच त्या व्हिडिओमागचं खरं उद्दिष्ट होतं.

माझा अनुभव असा आहे की, सोशल मीडियावर लोक नकारात्मकतेकडे अधिक आकर्षित होतात. आरे कारशेडच नाहीतर कोणत्याही प्रकल्पाबद्दल खरी माहिती दिली तरी लोक म्हणतात, “तुम्ही एकच बाजू दाखवत आहात.” पण स्वतः शोध घेण्याची तयारी दाखवत नाहीत. जर कोणत्याही प्रकल्पाविरुद्ध लेख किंवा आंदोलन उभं राहिलं तर त्यांच्यात पडताळणी न करता सामील व्हायला ते तयार असतात. मी असं म्हणत नाही की, कोणाचं मत चुकीचं आहे, पण मत बनवण्याआधी संशोधन गरजेचं आहे. त्या काळात वृत्तमाध्यमं आणि सोशल मीडियावर आंदोलनाचीच बाजू जास्त दाखवली जात होती. प्रकल्पाचं खरं स्वरूप दाखवणारा कोणताही व्हिडिओ किंवा लेख माध्यमात नव्हता. त्यामुळे मला असा कंटेंट तयार करण्याचा सन्मान मिळाला, ज्यामुळे अनेकांना प्रकल्पाची खरी समज मिळाली.

आज, जेव्हा मेट्रो लाईन ३ पूर्णतः सुरू झाली आहे, तेव्हा केवळ पहिल्याच आठवड्यात दररोज जवळपास दोन लाख प्रवासी या लाईनचा वापर करत आहेत. हा आकडा पुढे नक्कीच वाढेल. लोकांना नवीन सार्वजनिक सेवा वापरायला वेळ लागतो,हे कोणत्याही पायाभूत प्रकल्पासाठी खरं असतं. मेट्रो लाईन २ आणि लाईन ७ साठीही हेच पाहिलं गेलं. अटल सेतू आणि कोस्टल रोडसाठीही वाहनसंख्येत टप्प्याटप्प्याने वाढ झाली. पण अवघ्या एका आठवड्यात लाईन ३ जवळपास दोन लाख प्रवासी दररोज वाहून नेत आहे आणि अजूनही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी नियोजित केलेलं संपूर्ण मेट्रो नेटवर्क पूर्ण झालेलं नाही. एकदा सर्व लाईन्स एकमेकांशी जास्तीत जास्त इंटरचेंज झाल्या की, विशेषतः बीकेसी, T2 आणि आरे जेव्हीएलआर येथे तेव्हा लाईन ३ मुंबईतील सर्वाधिक वापरली जाणारी लाईन बनेल. आरे कारशेडविरुद्ध सुरू झालेल्या प्रचार-विरोधाला प्रत्युत्तर देण्यापासून सुरू झालेली माझी ही यात्रा आणि आता त्याच मेट्रोमध्ये संपूर्ण मार्गावर प्रवास करण्यापर्यंत पोहोचलेली ही कहाणी माझ्यासाठी एक वैयक्तिक विजय आहे.

आगामी काळातही मी अशा सर्व प्रकल्पांसाठी लोकांना खरी माहिती देत राहीन. कारण कोणत्याही सार्वजनिक किंवा राष्ट्रीय पायाभूत प्रकल्पाविरुद्ध भूमिका घेण्यापूर्वी त्या प्रकल्पाची सत्यता, उद्देश आणि परिणाम समजून घेणं आवश्यक आहे. जर तुम्ही एखाद्या अप्रमाणित स्रोतावर विश्वास ठेवत असाल, तर स्वतः संशोधन करणं गरजेचं आहे. ट्विटरवर अनेक हँडल्स आहेत जे सरकारी निर्णय, न्यायालयीन सुनावण्या आणि प्रकल्पांच्या आकडेवारीसह सर्व माहिती देतात,फक्त आपली शिकण्याची वृत्ती हवी. त्या काळात मुद्दा लाईन ३ चा होता, उद्या तो बुलेट ट्रेनचा असेल. पण खात्रीने सांगतो, बुलेट ट्रेनदेखील सर्व स्तरांतील लोक मोठ्या प्रमाणात वापरतील. हे काही अवघड विज्ञान नाही, फक्त सामान्य विचार आणि थोडंसं संशोधन केलं तरी कोणत्याही प्रकल्पाचं महत्त्व समजू शकतं.

- सौरभ राऊत,
संस्थापक, सिम्युल मोशन स्टुडिओ.
Powered By Sangraha 9.0