‘एआय’ भाग्यविधाता!

    16-Oct-2025   
Total Views |

एकेकाळी ज्याप्रकारे भारतात ‘आयटी बूम’ हा प्रघात झाला होता, तशीच स्थिती सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’ तंत्रज्ञानाची. गुगलची अमेरिका वगळता अन्य देशांत इतिहासातील आजवरची सर्वांत मोठी भारतातील गुंतवणूक ही त्याचीच नांदी!

जुलै २०२५ सालची घटना. पाकिस्तानमधून सुमारे २५ वर्षांनी ‘मायक्रोसॉफ्ट’ या कंपनीने आपला गाशा गुंडाळला. पाकिस्तानातील आर्थिक संकट, अनिश्चितता, स्थानिक आयटी कंपन्यांपुढे ओढावलेली स्थिती, याला सर्वस्वी कारणीभूत ठरले. राजकीय अस्थिरता, अराजकतेच्या उंबरठ्यावरचा आणि दहशतवादाचा निर्माता अशी पाकिस्तानची जागतिक ओळख. त्याउलट स्थिती भारताची. भारताने मोदी सरकारच्या नेतृत्वात आपली ‘सोने की चिडीया’ या युक्तीप्रमाणे गतवैभव प्राप्तीचे धोरण यशस्वीरित्या अवलंबले. ‘टेक जायंट’ कंपनी ‘गुगल’ने अमेरिकेबाहेर केलेल्या आजवरच्या सर्वांत मोठ्या म्हणजे एकूण १५ अब्ज डॉलर्सच्या भारतातील गुंतवणुकीच्या घोषणेद्वारे हे दिसून येते. २०२६ ते २०३० या काळात ‘गुगल’ ही गुंतवणूक भारतात करणार असल्याची घोषणा कंपनीने केली. भारत आणि आसपासच्या देशांमध्ये सेवा प्रदान करणारे ‘पर्पज-बिल्ट डेटा सेंटर’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे ‘डेटा सेंटर’ हे सामान्य ‘डेटा सेंटर’पेक्षा उजवे ठरतात, ज्यात एक संपूर्ण इमारतच ही डेटा साठवणुकीसाठी तंत्रसुसज्जता, विद्युतीकरण, तापमान नियंत्रण, नेटवर्किंग आदी नियोजन समोर ठेवूनच तयार केली जाते.

इमारतीची मूळ रचनाच ‘डेटा सेंटर’च्या गरजा लक्षात ठेवून केली जाते, जिथे सुरक्षा हा प्रमुख उद्देश असतो. आत प्रवेश करणार्‍यांवर सीसीटीव्हीची करडी नजर, बायोमॅट्रिक नोंदणी आदींसारखे तंत्रज्ञान तैनात करुन, या केंद्राची उभारणी केली जाते. ‘हाय डेटा ट्राफिक’, ‘हाय परफॉर्मन्स कम्प्युटर किंवा सर्व्हर’, ‘लाऊड इन्फ्रास्ट्रचर’ किंवा ‘एआय प्रोसेसिंग’साठी लागणारी सर्वोत्तम वातावरणनिर्मिती या केंद्रात होते. शिवाय ऊर्जाबचतीकडेही सातत्याने लक्ष केंद्रित ठेवावे लागते. कारण, अशा केंद्रांसाठी दिवसाचे २४ तास, आठवड्याचे सातही दिवस आणि वर्षाचे ३६५ दिवस काम सुरूच असते. वर्षातून कधीतरी मोठ्या सोशल मीडियाचे सर्व्हर डाऊन, असे मेसेज किंवा बातम्या समोर येतात आणि आजच्या तरुणाईलाही लगोलग अस्वस्थता जाणवू लागते. हे सर्व्हर डाऊन होते म्हणजे नेमके काय होते? तर त्या कंपनीच्या डेटा प्रोसेसिंग करणार्‍या केंद्रातील बिघाड, हे त्यामागील एक कारण असू शकते. म्हणजेच आपण वापरत असलेल्या प्रत्येक अ‍ॅप किंवा सॉफ्टवेअरचा डेटा ‘लाऊड बेस’ म्हणून कोणत्या ना कोणत्या डेटा सेंटरमध्ये साठवला जातो. शिवाय, त्यावर प्रक्रियाही होत असते. जितके जास्त मोबाईल किंवा संगणक तितके जास्त डेटा सेंटरची गरज. सोप्या शब्दांत सांगायचे झाले, तर मोबाईल किंवा संगणकावर दिसणार्‍या प्रत्येक गोष्टीला साठवण करण्यासाठी एक प्रकारे सर्व्हर सेंटरची गरज लागते. याच प्रकारे इंटरनेटचा हा संपूर्ण पसारा कुठून सांभाळला जात असेल, तर तो याच आणि अशाच प्रकारच्या केंद्रातून चालवला जातो.

यासंबंधी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अदानी समूह, एअरटेल यांच्या भागीदारीत हा प्रकल्प उभा राहील. शिवाय, याअंतर्गत समुद्राखालील डेटा केबल उभारणीचाही समावेश असणार आहे. वरकरणी पाहता, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हेकेखोर धोरणांमुळे भारत-अमेरिका संबंध काहीसे ताणले गेले आहेत. मात्र, कंपन्यांना त्यांच्या व्यवसाय विस्ताराचा विचार हा करावाच लागतो. यापूर्वीच ट्रम्प यांनी ‘अ‍ॅपल’ कंपनीचे सीईओ टीम कूक यांनीही भारतातील गुंतवणुकीबद्दल धारेवर धरले होते. पण, यामुळे कूक यांनी भारतातील गुंतवणूक माघारी घेतली नाही, तर ती वृद्धिंगत होईल, असे आश्वासनही दिले. भारतातील भूमी ही व्यवसायासाठी सुपीक आहे, असा विश्वास जागतिक कंपन्यांना वाटू लागला आहे, हे काहीअंशी गुंतवणुकीची आकडेवारीच सांगते. २०२५ या वर्षांत एकूण १.८८ लाख कोटी रुपये इतया किमतींचे आयफोन निर्यात झाले आहेत. एकीकडे खुद्द नरेंद्र मोदी आणि त्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ ‘जोहो’सारख्या स्वदेशी कंपन्यांना प्रोत्साहन देण्याचे आंदोलन उभे करण्याच्या प्रयत्नात असताना, ‘गुगल’ने अशा प्रकारची आणलेली गुंतवणूक अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली आहे.

गुगल डेटा सेंटर हे विशाखापट्टणम या बंदरानजीक उभारले जाणार असून जगभरातील एकूण १२ देशांना ‘एआय’ नेटवर्क सुविधा देण्यासाठी उपयोगात आणण्यात येणार आहे. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे, ही डेटा सेंटर्स इतर डेटा सेंटर्सपेक्षा जास्त प्रभावी आणि अद्ययावत असू शकतात. पारंपरिक केंद्रांमध्ये केवळ वेबसाईट, होस्टिंग, लाऊड स्टोरेज आणि बिझनेस अ‍ॅप्स यांसाठी वापरला जाणार आहे. मात्र, हे नवे डेटा सेंटर ‘एआय’वरआधारित डेटा प्रोसेसिंगचे काम करणारे आहेत. ज्यात प्रचंड गतीने डेटा प्रोसेस करावा लागतो. आपल्याकडे मध्येच चालणारे ‘एआय’ फोटो, व्हिडिओ ट्रेण्ड प्रत्येकाच्या नजरेस पडत असतील. पण, हे तयार करण्यासाठीही मोठ्या प्रमाणावर डेटा प्रोसेस व्हावा लागतो. सुरुवातीला प्रचंड व्हायरल झालेल्या ‘गिबली चॅलेंज’ वेळी ‘चॅट जीपीटी’च्या सीईओ सॅम ऑल्टमन यांना ‘एस’वर ”please chill on genersting image this is insane our team needs sleep.” हा मेसेज ‘एस’वर पोस्ट करावा लागला. अनेकांनी एकाच वेळी केलेल्या इमेज प्रोसेसमुळे डेटा सेंटरमध्ये हार्डवेअरवरही ताण येऊ लागला. ज्यामुळे कंपनीला अधिक अभियंत्यांची कुमक तैनात करावी लागली. अर्थात, सॅम ऑल्टमन पुढे स्वतःच म्हणाला की, "एआय’चा वापर असे फोटो तयार करून घेण्यापेक्षा संशोधनासाठी होणे अपेक्षित आहे. पण, नेटीझन्सनी त्याचा ट्रेण्ड तयार केला.” असो. ही गोष्ट लक्षात घेता, भविष्यात अशा डेटा सेंटर्सची गरज कंपन्यांना लक्षात येऊ लागलेली आहे. सध्या अशा प्रकारच्या फोटोंसाठी कंपन्यांनी दिवसभरात काही मर्यादा ठेवलेली आहे. पण, अनेकांनी वर्गणीदार होऊन असे प्रयोग केले आणि व्यवस्थेवर ताण येऊ लागला.

भविष्यातील ‘एआय’चा वाढता वापर लक्षात घेता, अशा पायाभूत सुविधांची गरज आणखी भासणार आहेच. ‘अदानी कोनेस’ आणि ‘एअरटेल’च्या माध्यमातून ‘एआय हब’सहित युट्यूब, सर्च आणि गुगल वर्कस्पेसचाही विस्तार केला जाणार आहे. ‘अदानी कोनेस’ ही ‘अदानी एंटरप्रायजेस’ आणि ‘एजकोनेस’ यांचे जॉईट व्हेंचर आहे, ज्यात ‘अदानी कोनेस’ डेटा सेंटरसाठी लागणारी हरित ऊर्जा संसाधने निर्माण करणार आहे. या प्रकल्पांतर्गत अनेक आंतरराष्ट्रीय समुद्रातील इंटरनेट केबल्स भारताच्या पूर्व किनार्‍यावर असलेल्या विशाखापट्टणमला जोडल्या जाणार आहेत. त्या ‘गुगल’च्या दोन दशलक्ष मैलांहून अधिक लांबीच्या भू आणि सागरी केबल नेटवर्कशी जोडल्या जातील. शिवाय, ‘एआय’ डेटा सेंटर्सच्या उभारणीत केंद्र सरकार अणुऊर्जेतून वीजनिर्मितीच्या या धोरणावर गांभीर्याने विचार करत आहे. हे फक्त हिमनगाचे टोक. भविष्यात असे ‘एआय’आधारित अनेक प्रयोग, गुंतवणूक आणि विस्तार भारतात अपेक्षित आहे. आता भारतीयांना गरज आहे, ती ‘एआय’आधारित तंत्रसुसज्जता आणि साक्षरता वृद्धिंगत करण्याची!

तेजस परब

मुंबई विद्यापीठातून एमएसीजेपर्यंत शिक्षण. वाणिज्य शाखेतून पदवी. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (वेब) म्हणून कार्यरत. पाच वर्षांपासून विविध वृत्तपत्रांमध्ये वार्ताहर व उपसंपादक पदाचा अनुभव. दोन प्रमुख वृत्तपत्रांतील निनावी सुत्रांच्या बातम्यांबद्दल संशोधन. डिजिटल मीडियासाठी लेखन. डिजिटल मार्केटींग विषयाचा अभ्यासक.