मोठी बातमी! गुजरातमध्ये राजकीय भूकंप; मुख्यमंत्री वगळता संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा

16 Oct 2025 17:12:11

Gujarat Cabinet Reshuffle
 
मुंबई : (Gujarat Cabinet Reshuffle) गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल वगळता त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. गुजरात मंत्रिमंडळात मुख्यमंत्री पटेल यांच्यासह १७ मंत्री होते. आठ कॅबिनेट दर्जाचे मंत्री होते, तर इतर तितकेच राज्यमंत्री (एमओएस) होते. मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त सर्व मंत्र्यांनी आपल्या पदाचे राजीनामे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याकडे सुपूर्द केले असून, ते त्यांनी स्वीकारले आहेत. यानंतर आता नवीन मंत्रिमंडळाच्या (Cabinet) स्थापनेची प्रक्रिया सुरू झाली आहे.
 
नव्या मंत्रिमंडळाचा कधी शपथविधी?
 
नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी शुक्रवारी दि. १७ ऑक्टोबर रोजी होणार आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे गुरुवारी रात्री राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट घेऊन नवीन सरकार स्थापनेचा दावा सादर करणार आहेत. यानुसार, शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता गांधीनगर येथील महात्मा मंदिर येथे नवीन मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडेल.
 
गुजरात विधानसभेत १८२ सदस्य आहेत आणि त्यात २७ मंत्री किंवा सभागृहाच्या एकूण सदस्यसंख्येच्या १५ टक्के सदस्य असू शकतात.आगामी मंत्रिमंडळ विस्तारात राज्यात सुमारे १० नवीन मंत्री मिळण्याची अपेक्षा आहे, असे पीटीआय वृत्तसंस्थेने भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याच्या हवाल्याने सांगितले आहे. सध्याच्या मंत्र्यांपैकी जवळजवळ निम्मे मंत्री बदलले जाऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0