सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या राकेश किशोर यांच्याविरुद्ध अवमान कारवाई सुरू करण्यास अ‍ॅटर्नी जनरलची संमती

16 Oct 2025 12:26:28

CJI Bhushan Gavai
 
मुंबई : (CJI Bhushan Gavai) गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान राकेश किशोर या वकिलाने सरन्यायाधीश भूषण गवई यांना बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. या संतापजनक घटनेचा देशभरातून निषेध व्यक्त करण्यात आला. या प्रकरणात वकील राकेश किशोर यांच्याविरुद्ध फौजदारी अवमान कारवाई सुरू करण्यासाठी भारताचे अॅटर्नी जनरल आर वेंकटरमणी यांनी संमती दिली आहे.
 
सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ वकील विकास सिंह तसेच भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी संयुक्तपणे वरिष्ठ न्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर हा मुद्दा मांडला होता. त्यांनी या प्रकरणासाठी फौजदारी अवमान प्रकरणाची यादी तयार करण्याची मागणी केली.
 
एसजी तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला माहिती दिली की, अॅटर्नी जनरल आर वेंकटरमणी यांनी राकेश किशोर यांच्याविरुद्ध अवमान कारवाई सुरू करण्यास संमती दिली आहे. यामुळे या प्रकरणातील पुढील कार्यवाहीला न्यायालयाकडून अधिक वेग मिळण्याची शक्यता आहे. आगामी सुनावणीमध्ये या प्रकरणावर न्यायालयीन निर्णय होण्याची शक्यता आहे.
 
Powered By Sangraha 9.0