पतीच्या निधनानंतर पल्लवी वाघ यांनी ‘अस्तित्व गुरूकुल’ नुसते चालवलेच नाही, तर वीर पंचक्रोशीत नावारूपाला ही आणले. त्यांच्याविषयी...
सुखी-समाधानी जीवनगाड्याचे एक चाक अचानक निखळून पडते आणि मागे राहिलेल्या जोडीदाराची त्यानंतर जी ओढाताण होते, ती सर्वस्वी व्यथित करणारी अशीच. त्या एकट्या पालकावर कुटुंब आणि अर्थार्जनासोबतच मुलांच्या संगोपनाची जबाबदारी आपसुकच येते. त्यातच या मुलांकडे वेळीच लक्ष न दिल्यास, या मुलांची पाऊले गुन्हेगारीकडेही वळू शकतात. त्यामुळे अशा पालकांच्या व्यथा-वेदना समजून, पुरंदर तालुयातल्या वीर गावात संतोष वाघ आणि पुण्यातील गीतांजली देगावकर यांनी २००३ साली एकल पालक विद्यार्थ्यांसाठी ‘अस्तित्व प्रतिष्ठान’ या संस्थेची स्थापना केली. २०२१ पर्यंत छोट्यामोठ्या अडचणींनंतरही संस्थेचे ‘अस्तित्व गुरुकुल’ सुरु होते. त्यातच दि. २१ एप्रिल २०२१ रोजी रामनवमीच्या दिवशी ‘कोरोना’मुळे संतोष वाघ रामधामाला गेले. संसारगाड्याचं एक चाक निखळून अनेक कुटुंबांची जी अवस्था होते, तीच अवस्था संतोष वाघ यांच्या पत्नींची म्हणजेच पल्लवी वाघ यांची झाली. पतीच्या निधनानंतरदेखील या लहान मुलांना पतीने दिलेले ‘अस्तित्व’ सोडायचे नाही, हे पल्लवी यांनी मनाशी ठामपणे ठरविले. पुढे दुःख विसरून पल्लवी यांनी ‘अस्तित्व गुरुकुल’चे अस्तित्व केवळ अबाधितच ठेवले नाही, तर वीर पंचक्रोशीत गुरुकुल नावारूपालाही आणले.
पल्लवी यांचे आईवडील दोघेही शेतकरी. त्यात पल्लवीच्या पाठी धाकटी तीन भावंडे. त्यामुळे अवघ्या दीड वर्षांच्या पल्लवीला त्यांच्या आईने भावाकडे वाईला नेऊन ठेवले. मग पल्लवी यांचे बारावीपर्यंतचे सर्व शिक्षण मामाकडेच झाले. परंतु, घरची परिस्थिती पुढचे शिक्षण देण्याची नव्हती. बारावीनंतरच लग्नासाठी स्थळं शोधायला सुरुवात झाली. पण, पल्लवीची घरी अट एकच होती ती म्हणजे, लग्नानंतरदेखील राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याची संधी ज्या घरी देतील, तिथेच लग्न करून जाईन. पदवीच्या पहिल्या वर्षाचे शिक्षण घेत असतानाच, संतोष वाघ यांचे स्थळ आले. स्वतः शिक्षक असणार्या संतोष यांनी पुढील शिक्षण घेऊ नको म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळेच २००६ साली पल्लवी फरांदेची पल्लवी वाघ झाली. लग्नानंतर पुण्याच्या ‘कर्वे स्त्री शिक्षण संस्थे’तून ‘एमएसडब्ल्यू’ आणि नंतर ‘एसएनडीटी’ विद्यापीठातून ‘बीएड’ पूर्ण केले. यानंतर यशवंतराव मुक्त विद्यापीठातून ‘डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट’ पदविका ९७ टक्के गुण मिळवत पूर्ण केली. संतोष त्यांच्यापरिने ‘गुरुकुल’ चालवत होते. संतोष यांच्या कुटुंबीयांनी त्यांची संस्थेसाठीची तळमळ बघून संस्थेला दोन एकर जागाही देऊ केली. या दोन एकरमध्ये मुलांना राहण्यासाठी एक मोठा हॉल, मुलींसाठी दोन खोल्या आणि पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी पाच खोल्या बांधण्यात आल्या. पल्लवी यांनी इथेच मुलांना शिकवायला सुरुवात केली. परंतु, स्वतःच्याच पतीने उभारलेली संस्था असल्यामुळे फक्त शिकवून काम संपत नव्हते, तर शाळा सुटल्यानंतर खरे काम सुरू होत होते. कारण, मुलांच्या जेवणाची व्यवस्था, त्यांचा अभ्यास घेणे, कुणी आजारी पडले, तर त्याची विशेष काळजी घेणे, मुलांना सकाळी लवकर उठवण्यापासून ते आवरण्यापर्यंतची सर्व कामे पल्लवी याच करत. त्यांच्यामुळे संतोष यांना संस्थेला मदत मिळवण्यासाठी बाहेर जाण्याची मोकळीक मिळत असे. हा सर्व प्रवास सुरू असतानाच, वाघ कुटुंबावर खूप मोठे संकट कोसळले. ‘कोरोना’मुळे संतोष वाघ यांचे निधन झाले. हा त्यांच्या परिवाराला खूप मोठा धक्का तर होताच; पण ‘अस्तित्व’ परिवारातील अनेक मुलामुलींनीही त्यांचा आधारस्तंभ गमावला होता. याही परिस्थितीत मुलांना आपली आई म्हणून पल्लवी यांची खूप गरज होती. त्यामुळेच पतीने पाहिलेलं स्वप्न अर्ध्यावर सोडायचे नाही, या निर्धाराने पल्लवी यांनी अत्यंत खंबीरपणे संस्थेतील मुलांना आधार दिला. ‘कोरोना’नंतर शाळा सुरू केली. अनेक कुटुंबांना घरी किराणा पोहोचवला, अनेक मुलामुलींना शालेय साहित्य पुरविले. शाळेची संपूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत समर्थपणे निभावली. सध्या संस्थेच्या विश्वस्त व ‘अस्तित्व गुरुकुल’च्या मुख्याध्यापिका म्हणून त्या उत्साहाने काम पाहत आहेत. मुलामुलींना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी विविध प्रशिक्षण देतात. आज संस्थेत ५२ मुले-मुली, यातील दोन मुले नेपाळची असून त्यांची सर्व व्यवस्था पल्लवी याच पाहत आहेत.
पल्लवी यांच्या या अथक परिश्रमामुळेच संस्थेला विविध पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आले आहे. त्यामध्ये ‘जनकल्याण समिती’कडून ‘स्वामी विवेकानंद पुरस्कार’, ‘मालती जोशी सामाजिक पुरस्कार’, ‘जनसेवा बँक पुरस्कार’, ‘शेठ चिमणलाल पुरस्कार’, पुण्यातील मानाच्या गुरुजी तालीम यांच्याकडून ‘विघ्नहर्ता’ अशा काही पुरस्कारांचा समावेश आहे. पल्लवी वाघ यांना त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कामासाठी ‘आदर्श शिक्षक’ हा पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. इतया संकटातूनही स्वतः खंबीरपणे उभे राहून शेकडो मुलामुलींसाठी आईपणाचा वसा घेतलेल्या आणि त्यांचे ‘अस्तित्व’ ठामपणे जाणवून देणार्या पल्लवी यांना पुढील वाटचालीस दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून खूप शुभेच्छा!