आदि शंकराचार्यांच्या साहित्यकृतींपैकी एक म्हणजे सौंदर्यलहरी होय! सौंदर्यलहरी हे श्रीविद्या उपासकांच्या साठी अत्यंत महत्वाचे महाकाव्य . श्रीशक्ती उपासनेच्या दृष्टीने अन्य काही करता आले नाही तरी सौंदर्यलहरी पठन तरी व्हावे असा या महाकाव्याचा महिमा आहे. या महाकाव्याचे साहित्यिक मूल्य सुद्धा थोर आहे. सर्वप्रकारचे अलंकार, दृष्टांत यांचा या लोकात मुक्त वापर आहे. पार्वतीदेवीच्या स्वरूपाचे अत्यंत कलासक्त आणि सुंदर वर्णन केलेलं आहे. या महाकाव्यातील प्रत्येक लोकाचा सर्वार्थाने मागोवा या लेखमालिकेत घेण्यात येणार आहे. या पहिल्या भागात सौंदर्यलहरी माहाकाव्याची केलेली ही तोंडओळख...
वन्दे मातरम्बिकां भगवतीं वाणीरमासेवितां|
कल्याणीं कमनीयकल्पलतिकां कैलासनाथप्रियाम॥
वेदान्तप्रतिपाद्यमानविभवां विद्वन्मनोरञ्जनीं|
श्रीचक्राञ्चितरत्नपीठनिलयां श्रीराजराजेश्वरीं॥
‘सौंदर्यलहरी’ हे महाकाव्य म्हणजे आदि शंकराचार्यांनी मानवजातीला दिलेली अत्युकृष्ट देणगी आहे. या काव्याचा महिमा फारच मोठा. पहिले आपण याची उत्पत्ती समजून घेऊ.
एकदा आदि शंकराचार्य कैलासावर गेले असता, तिथे त्यांनी सदाशिव आणि माता पार्वती यांचे दर्शन घेतले. श्री शंकरांनी प्रसन्न होऊन आचार्यांना पंच स्फटिक शिवलिंगे प्रदान केली. पंच शिवलिंगे ही साक्षात परमेश्वर शिवाचेच आत्मस्वरूप होते आणि पार्वती मातेने त्यांना पंच भूर्जपत्रांचा गठ्ठा दिला. या पाच भूर्जपत्रांवर साक्षात शिवशंकरांनी अंकित केलेले, आपली पत्नी श्री राजराजेश्वरी त्रिपुरसुंदरी पार्वतीची स्तुती करणारे ‘सौंदर्यलहरी’ हे महाकाव्य अर्थात हे आदिशक्तीचे मंत्रस्वरूप होते.
आदि शंकराचार्य हे शिवाचा अवतार मानले जातात. त्यांचा जन्म वेदांच्या तत्त्वज्ञानाचे पुनरुत्थान आणि अद्वैत मत पुनश्च स्थापित करणे, याचसाठी झाला होता. शिव आणि पार्वती यांनी दिलेली ही भेटसुद्धा हे कार्य अधिक प्रभावीपणे आणि शीघ्र व्हावे, याचसाठी दिली होती. ही भेट प्राप्त करून, आचार्य भूलोकाकडे यायला निघाले. अद्वैताच्या रुपात जर याला समजून घ्यायचे असेल, तर निर्गुण ब्रह्म शिव, त्याचेच सगुण रूप पार्वती आणि त्यांचाच जागृत मानव अंश म्हणजे आदि शंकराचार्य. जणू सूर्यानेच आपले तेज काढून, आपल्या अंशाला प्रदान केले होते. आचार्यांना शिवपार्वतीकडून प्राप्त झालेल्या या वरदानाचा प्रसार सर्वत्र करून, आपले कार्य सिद्धीस न्यायचे होते.
परंतु म्हणतात ना तुम्ही ईश्वराला प्रसन्न करून घ्याल, पण पुजाऱ्यालासुद्धा प्रसन्न करून घेणे आवश्यक आहे. अन्यथा पुजारी तुम्हाला ईश्वराने दिलेल्या वरदानाच्या प्राप्तीत अडथळा निर्माण करतोच. त्याचप्रमाणे नंदिकेश्वर हा शिवगण (नंदी शिवाचे वाहन) या भेटी पाहून विचलित झाला. नंदीला हे महाकाव्य आणि आत्मस्वरूप स्फटिक लिंग, दोन्ही कैलासावरून पृथ्वीवर जाणे रुचले नाही आणि त्याने आचार्यांवर हल्ला केला. आचार्यांशी झटापट करून त्याने, त्या महाकाव्य लिहिलेल्या भूर्जपत्रातील काही भाग हिसकावून घेतला. या शतलोकी महाकाव्यातील केवळ 41 लोकांचा भाग आचार्यांना मिळाला आणि अन्य भाग नंदीने हिसकावून घेतला.
या घटनेने आचार्य अत्यंत दुःखी झाले. मला मातेने विश्वासाने एक ठेवा दिला होता, जो मी मानवजातीला प्रदान करून लोककल्याण साधणार होतो, परंतु मला त्याचे रक्षण करता आले नाही. त्याक्षणी तिथे माता पार्वती स्वयं प्रकट झाली आणि तिने शंकराचार्यांना सांगितले, “जे घडले ते माझ्याच इच्छेने घडले आहे. माझी इच्छा आहे की, तू नंदीने हिसकावून घेतलेल्या 59 लोकांची स्वतः तुझ्या शब्दांत रचना करावी आणि जगाला पूर्ण अखंडित असे शतलोकी काव्यच प्रदान करावे.” आता या शतलोकी ‘सौंदर्यलहरी’ या महाकाव्यातील पहिला 41 लोकांचा भाग हा ‘आनंदलहरी’ म्हणून ओळखला जातो आणि नंतरच्या 59 लोकांचा भाग हा ‘सौंदर्यलहरी’ म्हणून ओळखला जातो. परंतु, संपूर्ण शतलोकी काव्याचा एकत्रित उल्लेख ‘सौंदर्यलहरी’ असाच होतो.
पहिल्या 41 लोकात पूर्ण मंत्रशास्त्र समाविष्ट आहे. ज्याचे मनन करणे अत्यंत लाभप्रद आहे. याच्या नुसत्या मननाने तुमच्या चित्तात ‘आनंदलहरी’ उमटू लागतात, हे या लोकांचे सामर्थ्य आहे. नंतरच्या 59 लोकात, आचार्यांनी मातेच्या सौंदर्याचे आणि तिच्या विराट स्वरूपाचे पादकेशांत वर्णन केलेले आहे. हे लोक तंत्र आणि यंत्र शास्त्राचे सारस्वरूपसुद्धा आहेत.
याचे प्रचलित 100 लोकच आहेत, परंतु उत्तर भारतात 103 पर्यंत लोक असलेले काव्य प्रचलित आहे. त्यातील शेवटचे तीन लोक हे फलश्रुतीसमान आहेत. हे काव्य अनुष्टुप छंदात आणि शिखरिणी वृत्तात बद्ध आहे. शिखरिणी वृत्तात प्रत्येक ओळीत 17 अक्षरे असतात. त्याच्या उच्चारणाची एक विशिष्ट पद्धत आहे. पहिली सहा अक्षरे एक टप्पा म्हणून आणि नंतरची 11 अक्षरे दुसऱ्या टप्प्यात उच्चारलीजातात. त्यातसुद्धा जर अधिक खंडित भाव निर्माण करता आला, तर त्याचे उच्चारण खालील संकेतात मांडले जाऊ शकते.
जयामध्ये येती यमनसभलगा शिखरिणी -
अर्थात, यात पहिली सहा अक्षरे एकत्र एकदा उच्चारली जातात आणि थोडा विलंब देऊन पुढील 11 अक्षरांचे उच्चारण केले जाते. हे इतके विस्तृत सांगण्याचे कारण की, ‘सौंदर्यलहरी’ हे संपूर्ण तंत्रशास्त्राला व्यापून असलेले महाकाव्य आहे त्यामुळे उच्चारण आणि तत्संबंधी व्याकरणाचे नियम यांचेसुद्धा पालन होणे अत्यावश्यकच. जर या नियमांना बद्ध राहून आपण उच्चारण केले, तर आपल्याला केवळ अबोध बालकाप्रमाणेच नुसते पठण केले, म्हणूनसुद्धा प्रचंड लाभ प्राप्त होऊ शकतो.
आचार्यांनी या काव्याची महती सांगताना असे म्हटले आहे की, हे काव्य सिद्ध करू शकलेला साधक, पर्वत आणि वने यांनासुद्धा गदागदा हलवू शकतो. शब्द हेसुद्धा श्री ललिता त्रिपुरसुंदरी देवीचेच स्वरूप आहे. त्यामुळे शब्दांचे विशिष्ट ताल, लय आणि नादात केलेले आवर्तनरुपी उच्चारणसुद्धा, तुमचे शरीर आणि आत्मा शुद्ध करू शकते. इतकेच नाही, तर तुमचे सभोवतालसुद्धा शुद्ध आणि सकारात्मक करू शकतो. हे सामर्थ्य देवीने शब्दांना प्रदान केले आहे. म्हणूनच आपल्याकडे वेदमंत्रांचे त्यांच्या विकृतीसह योग्य उच्चारण, योग्य प्रमाणातील आवर्तनात केले असता, दृष्टिगोचर परिणाम अनुभवण्यास येतो असे सांगितले जाते.
याचे मूर्तिमंत उदाहरण स्वतः आचार्य आहेत. केवळ आठ वर्षांचे असताना एका वृद्धेचे दारिद्य पाहून, त्यांनी श्रीलक्ष्मी देवीचे एक स्तुतीपर काव्य रचून त्याचे आवर्तन केले असता, तिथे साक्षात लक्ष्मीदेवी प्रकट झाली आणि तिने आचार्यांची इच्छा म्हणून, त्या वृद्धेचे दैन्य दूर केले होते. हे शब्दसामर्थ्य आहे , हे मंत्रसामर्थ्य आहे. परंतु, त्यांचे उच्चारण आणि आवर्तन निर्दोष असावे, हाच मानक आहे.
हे विवेचन विषयप्रवेश करताना याचसाठी केले जात आहे की, एखाद्या साधकाला इच्छा असेल, तर तो ‘सौंदर्यलहरीं’चे नित्य पठणसुद्धा करू शकतो. परंतु त्यासाठी त्याने ही उच्चारण पद्धती समजून घेतली पाहिजे. सध्याच्या युगात योग्य तालात उच्चारण करणारे ऑडिओ उपलब्ध असतात. त्यांचे उच्चारण वारंवार ऐकून आणि शिखरिणी वृत्त उच्चारणपद्धती यांचा थोडासा सराव करून, सामान्य साधकसुद्धा भक्तिभावाने तालासुरात पठण करू शकतो आणि श्री ललिता त्रिपुरसुंदरीच्या कृपेला पात्र होऊ शकतो.
हे झाले ‘सौंदर्यलहरी’ या महाकाव्याचे
उत्पत्तीचे प्राथमिक विवेचन. आता यासह मिळालेली भेट म्हणजे स्फटिक लिंग. यापैकी एक शिवलिंग कांचीकामकोटी येथील मठात स्थापित आहे. त्याचा उल्लेख चंद्रमौलीश्वर असा होतो. हे योगलिंग आहे. बाकीच्या चारपैकी एक केदारनाथ इथे आहे, ज्याचा उल्लेख ‘मुक्तिलिंग’ असा होतो. वरलिंग आहे नीलकंठ नेपाल इथे, तर भोगलिंग शृंगेरी मठात आहे आणि मोक्षलिंग हे चिदंबरम इथे आहे.
‘सौंदर्यलहरी’ हे श्रीविद्या उपासकांसाठी अत्यंत महत्त्वाचे महाकाव्य . श्रीशक्ती उपासनेच्या दृष्टीने अन्य काही करता आले नाही तरी ‘सौंदर्यलहरी’पठण तरी व्हावे, असा या महाकाव्याचा महिमा आहे. श्रीविद्या उपासनेचा मुख्य भाग म्हणजे श्रीयंत्र उपासना. ‘सौंदर्यलहरीं’मध्ये श्रीयंत्राची रचना, त्याचे स्वरूप याचे विस्तृत वर्णन केले आहे. ‘सौंदर्यलहरी’मध्ये तंत्रशास्त्र, मंत्रशास्त्र, योगशास्त्र, आणि तत्त्वज्ञान अत्यंत गूढपणे समाविष्ट केलेली आहेत. या महाकाव्याचे साहित्यिक मूल्यसुद्धा थोर आहे. सर्व प्रकारचे अलंकार, दृष्टांत यांचा या लोकात मुक्त वापर आहे. पार्वतीदेवीच्या स्वरूपाचे अत्यंत कलासक्त आणि सुंदर वर्णन यात केलेलं आहे. एक सामान्य उपासक म्हणून या महाकाव्याचे आपण रसग्रहण करू शकतो. हे काव्य अत्यंत गेय आहे. व्याकरणाच्या नियमांनी बद्ध आणि तरीही अत्यंत रसाळ आणि गोड आहे. त्यामुळे याचे पठण हासुद्धा एक सुखद अनुभवच आहे.
- सुजीत भोगले