मुंबई (अक्षय मांडवकर) - 'संकटग्रस्त' प्राण्यांच्या यादीत समाविष्ट असणाऱ्या रानकुत्र्यांच्या अधिवासाचा विस्तार सह्याद्रीच्या उत्तरेच्या क्षेत्रात झाला आहे (wild dog range extension). 'वाईल्डलाईफ काॅन्झर्वेशन ट्रस्ट'च्या (डब्लूसीटी) संशोधकांना पुण्यातील पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रानकुत्र्याच्या अधिवासाचा पुरावा सापडला आहे (wild dog range extension). याठिकाणी रानकुत्र्याच्या अधिवासाचे छायाचित्र प्राप्त झाल्याने सह्याद्रीच्या उत्तरेच्या क्षेत्रात रानकुत्र्यांचा अधिवास वाढत असल्याचे यावरून निदर्शनास येत आहे (wild dog range extension).
'इंटरनॅशनल युनियन फॉर काॅन्झर्वेशन आॅफ नेचर'च्या (आययूसीएन) लाल यादीनुसार रानकुत्रा या प्राण्याला 'संकटग्रस्त' श्रेणीमध्ये स्थान देण्यात आले आहे. 'आययूसीएन'नुसार रानकुत्र्यांची संख्या ही केवळ ९४९ ते २ हजार २१५ एवढ्या घरात आहे. रानकुत्रा हा श्वान कुळातील प्राणी असून तो कळपामध्ये राहतो. स्थानिक भाषेत याला कोळसुंदा, कोळसुंदे, कोळसना, कोळसुना, देवाचा कुत्रा, सोनकुत्रा अशा विविध नावांनी ओळख जाते. मात्र, गेल्या काही वर्षात सह्याद्रीच्या परिसरात रानकुत्र्यांच्या अधिवासाचा विस्तार झाल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. दै. 'मुंबई तरुण भारत'ने २०२४ साली देवरुख येथे आयोजित केलेल्या 'रानकुत्रा कुत्री आरखडा बैठकी'त देखील संशोधक, ग्रामस्थ आणि वनकर्मचाऱ्यांचा काहीसा असाच सूर होता. या बैठकीच्या माध्यमातून कोकण आणि सह्याद्रीच्या उत्तरेस खास करुन रायगड आणि पुणे जिल्ह्यात रानकुत्र्यांचा अधिवास विस्तार होत असल्याचे निदर्शनास आले होते.
आता 'डब्लूसीटी' या संस्थेने रानकुत्र्याची नोंद पुणे जिल्ह्यातील पवना धरण परिसरातून केली आहे. १९७३ साली पवना नदीवर धरण बांधण्यात आले. उत्तर सह्याद्रीच्या भागात येणाऱ्या या धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील जमीन विविध कारणांसाठी उपयोगात आणली गेली आहे. याठिकाणी 'डब्लूसीटी'कडून 'इको-हायड्रोलॉजिकल' मूल्यांकनाचे काम सुरू आहे. या कामासाठी लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये जानेवारी महिन्यात एका रानकुत्र्याचे छायाचित्र टिपले गेले आहे. या छायाचित्रामुळे सह्याद्रीतील रानकुत्र्यांच्या अधिवासाचा उत्तरेकडे विस्तार झाला आहे. यापूर्वी भीमाशंकरमध्ये रानकुत्रा आढळल्याची नोंद करण्यात आली होती. मात्र, तो रानकुत्रा नसून कोल्हा असल्याची पुष्टी 'आययूसीएन'च्या 'रानकुत्रा स्पेशालिस्ट गुप्र'च्या सदस्यांनी केली होती.
अधिवासाचा झाला विस्तार
सह्याद्रीतील रानकुत्रांचा अधिवास हा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पापासून खाली दक्षिणेकडे सर्व दूर प्रामुख्याने आहे. 'डब्लूसीटी'च्या अभ्यासानुसार महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प ते तिलारी परिसरापर्यंत रानकुत्र्यांच्या अधिवास विस्तार २०१०-११ साली ६५ टक्के होता. ज्यामध्ये २०१९-२० साली वाढ होऊन ही टक्केवारी ८१ टक्क्यांवर गेली. कोकणातील किनारी तालुक्यांमध्येही रानकुत्र्यांचा वावर वाढत आहे. परिणामी यापूर्वी सह्याद्रीत रानकुत्र्यांचा उत्तरेकडील अधिवास क्षेत्राचा विस्तार हा रायगडमधील फणसाड वन्यजीव अभयारण्य आणि पुण्यातील मुळशी तालुक्यात होता. पुण्यातील वेल्हे, पानशेत, राजगड, दिपदरा याभागात रानकुत्र्यांच्या नोंदी आढळल्या होत्या. म्हणजे त्या वरच्या क्षेत्रात रानकुत्र्यांच्या अधिवासाचा ठोस पुरावा नव्हता. अशा परिस्थितीत आता मावळ तालुक्यातून रानकुत्र्याची नोंद झाल्याने सह्याद्रीतील त्याच्या अधिवासाचा विस्तार झाल्याची माहिती 'डब्लूसीटी'चे संशोधक आणि 'आययूसीएन'च्या 'रानकुत्रा स्पेशालिस्ट ग्रुप'चे सदस्य गिरीश पंजाबी यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली.