आज, दि. 15 ऑक्टोबर, देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस. देशाच्या उत्थानासाठी त्यांचे कार्य शब्दातीत. त्यांच्या जीवनाचा संक्षिप्त मागोवा घेणारा हा लेख...
अनेकांचे प्रेरणास्रोत ठरलेले डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दि. 15 ऑक्टोबर 1931 रोजी रामेश्वरम, तामिळनाडू येथे झाला. शालेय शिक्षक असणारे वडील जैनुलाबदीन आणि आई आशियम्मा यांच्या पोटी जन्मलेले डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम भारताचे ‘मिसाईल मॅन’ ठरले. भारताचे 11वे राष्ट्रपती म्हणून काम करताना त्यांनी शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. याची यथायोग्य दखल घेऊन त्यांना ‘पद्मविभूषण’, ‘पद्मभूषण’ आणि 1997 मध्ये भारताचा सर्वोच्च सन्मान ‘भारतरत्न’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे दि. 27 जुलै 2015 रोजी शिलाँग येथे निधन झाले. डॉ. कलाम यांचे जीवन आणि कार्य ही आजही अनेकांसाठी प्रेरणास्रोत ठरते. या भारतरत्नाचे यथोचित स्मरण व्हावे, म्हणून दि. 15 ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक विद्याथ दिन’ आणि ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.
भारतरत्न ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे वैचारिक अधिष्ठान गहन होते. त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू विज्ञान, शिक्षण, राष्ट्रवाद आणि समाजसेवा असला, तरी त्याला अध्यात्माची आणि मानवतेची किनार होती. आध्यात्मिकता ही त्यांच्या जीवनाचा आणि विचारांचा एक महत्त्वपूर्ण भाग होता. कलाम यांच्या मते, आध्यात्मिकता म्हणजे केवळ धार्मिक ग्रंथांचे पठन, अध्ययन किंवा पूजाअर्चा नसून ती एक जीवनशैली आहे. ही शैली आपल्याला सत्य, प्रेम, करुणा आणि शांतीच्या मार्गाने घेऊन जाते. डॉ. कलामांची आध्यात्मिकता अनेकांना जमेची बाजू वाटते, तर काहींना त्यांच्या वैज्ञानिक छबीतील विसंगती वाटते. डॉ. कलाम यांचा जन्म जरी मुस्लीम कुटुंबात झाला असला, तरी त्यांच्या मुस्लीम असण्यात वेगळेपण होते. ते धार्मिक असले, तरी धर्मवादी नव्हते. त्यांनी आपली धार्मिक ओळख आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांच्यात समन्वय साधला होता. धार्मिक मूल्ये आणि संस्कारांची अभिव्यक्ती करीत असताना त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. याबरोबरच सर्वसमावेशकता, मानवता आणि सर्वधर्मसमभाव जपण्याच्या त्यांचा प्रयत्न होता. भारतातील बहुधार्मिक समाजातील शांतता, सौहार्दता आणि एकात्मतेचा कायम पुरस्कार केला.
विविध उच्च पदे भूषणारे उच्चविद्याविभूषित डॉ. कलाम यांच्या व्यक्तिमत्त्वातील साधेपणा, विनम्रता, त्याग आणि सेवाभाव राष्ट्रपतिपद सोडताना जगाने पाहिला. हातातील सुटकेस हीच आपली संपत्ती समजणारे कलाम यासाठी आदरयुक्त ठरतात. राष्ट्रपतिपद सोडल्यानंतर शिक्षक म्हणून ज्ञानदान करण्यास रुजू होणाऱ्या डॉ. कलामांचा जन्मदिवस जागतिक विद्याथ दिन म्हणून साजरा करण्यात यावा, हा खूप मोठा सन्मान आहे.
डॉ. कलाम यांचा भारतीय मुस्लीम समाजाकडून हवा तसा स्वीकार आणि सन्मान होताना दिसत नाही. याची अनेक कारणे असू शकतात. कलामांनी स्वतःची धार्मिक ओळख निर्माण करण्यापेक्षा एक वैज्ञानिक आणि भारतीय अशी ओळख ठसवली. त्यांचे विचार आणि कार्य हे केवळ एका धर्मापुरते मर्यादित नव्हते, तर संपूर्ण मानवतेसाठी होते. त्यांनी भारतीयांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, धार्मिक लोकांसाठी त्यांची धार्मिक ओळख ही त्यांच्या कार्यापेक्षा अधिक महत्त्वाची वाटली असावी. कलाम यांची विचारसरणी आणि कार्य हे धार्मिक किंवा राजकीय विचारसरणीशी जुळणारी नव्हती. कलामांच्या काळातील सामाजिक आणि राजकीय परिस्थितीदेखील एक कारण असू शकते. त्यांनी राष्ट्रपती म्हणून केलेल्या कार्यातून आणि मांडलेल्या विचारांतून काही धार्मिक नेतृत्वाच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नसतील. शाकाहारी, अविवाहित असलेल्या कलामांची वेशभूषा, श्रद्धास्थाने यात ‘मुस्लीमपण’ असे काही नव्हते. अर्थात, हे असे असणे आणि विचार-वर्तनातून भारतीयत्वच डोकावणे, ही जमेची बाजू समजायला हवी. कलाम यांना समजून घेताना त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. त्यांनी संपूर्ण भारतीयांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. भारताच्या सर्वांगीण प्रगतीत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
संमिश्र संस्कृती आणि सर्वसमावेशकता हे भारतीय समाजाचे वैशिष्ट्य असले, तरी धर्मवर्चस्ववाद आणि धर्मवादी राजकारण हेही भारतीय समाजाचे दुर्दैवी वास्तव आहे. हे वास्तव भारतीय इतिहासात, स्वातंत्र्य आंदोलनात तसेच स्वातंत्र्योत्तर काळातही टिकून राहिल्याचे नजरेआड करता येणार नाही. महात्मा गांधी आणि मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या सकारात्मक धार्मिकतेला आणि राष्ट्रवादालाही जमातवादी लोकांनी विरोध केला होता. मुस्लीम समाजातील धार्मिक आणि राजकीय नेत्यांना धार्मिक डॉ. झाकीर हुसेनही भावले नाहीत, तर बुद्धीप्रधान, धर्मनिरपेक्ष बॅरिस्टर एम. सी. छगला आणि हमीद दलवाई यांच्याबद्दलच्या अपभाव अपेक्षित करणे, हासुद्धा एक भाबडेपणाच ठरणार आहे. चांगला माणूस बनणे, म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून त्याचा अर्थ चांगला हिंदू किंवा चांगला मुसलमान बनणे असा व्यापक अर्थ काढण्यास अजून आपला समाज सुबुद्ध झाला नाही, असा होतो. भारतरत्न डॉ. कलाम यांच्या व्यक्तिमत्त्वातील चांगला माणूस हा सुसंस्कृत हिंदू आणि सुसंस्कृत मुस्लीम यांचे प्रतिनिधित्व करतो.
डॉ. कलामांनी खूप विद्वत्तापूर्ण उपदेशामृत पाजण्यात स्वारस्य दाखवले नाही. त्यांचे अंगभूत वैशिष्ट्य हे महात्मा गांधींच्या शब्दांत ’Be the change you wish to see in the world', असे होते.
- डॉ. शमसुद्दिन तांबोळी
(लेखक मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष आहेत.)
9822679391