बिहार निवडणुकीसाठी जदयुची पहिली यादी जाहीर! पाहा कोणाला मिळाली संधी?

15 Oct 2025 13:47:18

JDU

 
मुंबई : (JDU) बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरु आहे. या निवडणुकीचा केंद्रीय राजकारणावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने संपूर्ण देशाचं या निवडणुकीकडे लक्ष लागलं आहे. एनडीएच्या जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर झाल्यानंतर आता युतीतील पक्षांकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा व्हायला सुरुवात झाली. भाजपने मंगळवारी बिहार निवडणुकीसाठी ७१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर आता सत्ताधारी पक्ष जनता दल युनायटेडने (JDU) बुधवारी आगामी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी ५७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.


जदयुने चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाने (रामविलास) पूर्वी दावा केलेल्या चार मतदारसंघांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे, जे एनडीएमध्ये आपले स्थान निश्चित करण्यासाठी एक धोरणात्मक पाऊल असल्याचे दर्शवते. दुसरीकडे इंडी आघाडीतील जागावाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. जागावाटपावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी राष्ट्रीय जनता दल (RJD) चे नेते तेजस्वी प्रसाद यादव यांनी सोमवारी नवी दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. या भेटीत जागावाटपाच्या चर्चेला वेग आला असून, लवकरच जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित होण्याची शक्यता आहे.
 
सत्ताधारी एनडीएने रविवारी तिकीट वाटपाचा निर्णय घेतला. भाजप आणि जदयु (JDU) प्रत्येकी १०१ जागा लढवतील, तर लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) २९ जागा लढवणार आहे. राष्ट्रीय लोक मोर्चा (आरएलएम) आणि हिंदुस्तानी अवाम मोर्चा (एचएएम) प्रत्येकी सहा जागा लढवतील. बिहारमध्ये विधानसभेच्या २४३ जागांसाठी ६ नोव्हेंबर आणि ११ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर १४ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.



Powered By Sangraha 9.0