अफगाणिस्तानाचे परराष्ट्रमंत्री आमिर खान मुत्तकी सध्या भारत दौऱ्यावर आहेत. हा दौरा प्रादेशिक कूटनीती आणि भौगोलिक-सांस्कृतिक समीकरणांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा ठरावा. हा दौरा फक्त भारत-अफगाणिस्तान संबंधांना नवीन दिशा देण्याचा संकेत देत नाही, तर प्रादेशिक सामर्थ्य संतुलनावर, विशेषतः पाकिस्तानसाठी अनेक प्रश्नही उपस्थित करतो. तालिबान सत्तेमध्ये आल्यानंतर एखाद्या वरिष्ठ तालिबान नेत्याचा हा भारतातील पहिला दौरा असून, या दौऱ्याने नवी दिल्ली आणि काबुलदरम्यान वाढणाऱ्या राजनयिक संपर्कांनाही अधोरेखित केले. भारत अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानसमर्थित दहशतवादी गतिविधींविषयी चिंतित राहिला आहे. एकीकडे आमिर खान मुत्तकी हे भारत दौऱ्यावर असताना दुसरीकडे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेजवळ तणाव वाढल्याचे दिसून आले.
पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी सांगितले की, दि. 11 ते दि. 12 ऑक्टोबर रोजीच्या रात्री झालेल्या लढाईत 23 पाकिस्तानी सैनिक ठार झाले, तर तालिबानने 58 पाकिस्तानी सैनिक ठार केले आणि 25 सैन्य चौक्यांवर कब्जा केल्याचा दावा केला. पाकिस्तानी वृत्तपत्र ‘डॉन’च्या माहितीनुसार, तालिबान आणि त्याच्या संबंधित गटांतील 200 हून अधिकजण मारले गेले; मात्र तालिबानने या संख्येची पुष्टी केलेली नाही. या संघर्षात अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवरील अनेक जिल्हे प्रभावित झाले. यामुळे सीमेजवळ राहणाऱ्या स्थानिक लोकांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. झालेल्या झटापटीनंतर दोन्ही देशांनी सीमेवर नियंत्रण कडक केले. तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने कुनार प्रांतात टँक आणि अवजड शस्त्रे तैनात केली आहेत. त्यामुळे व्यापक सैन्य दबावाचा धोका वाढला आहे. या झटापटीत ‘तहरीक-ए-तालिबान’ पाकिस्तान (टीटीपी) या गटाचे नाव प्रामुख्याने समोर आले. हे संघटन दीर्घकाळापासून पाकिस्तानमध्ये हल्ले करत आले आहे.
पाकिस्तानचा दावा आहे की, 2021 साली तालिबान अफगाणिस्तानमध्ये सत्ता मिळवल्यानंतर ‘टीटीपी’ची ताकद पुन्हा वाढली. पाकिस्तान काबुलवर ‘टीटीपी’ला आश्रय देण्याचा आरोप करतो; मात्र तालिबान सरकार यास नकार देते. ‘टीटीपी’सारख्या गटांव्यतिरिक्त पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात ड्युरंड रेषादेखील तणावाचे मुख्य कारण. 1893 साली ब्रिटिश राजवटीत तयार केलेली ड्युरंड रेषा 2 हजार, 611 किमी लांब असून अफगाणिस्तान या रेषेला मान्यता देत नाही. अफगाणिस्तानच्या ड्युरंड रेषेला नाकारण्याचे, सीमारेषेवर बॅरियर लावण्याचे, सीमापार हालचालींवर निर्बंध लादण्याचे आणि सार्वभौमत्वाचे उल्लंघन करण्याचे आरोप यामुळे तणाव वाढतो. अफगाण तालिबान ड्युरंड रेषा नाकारतो, तर पाकिस्तान या रेषेला आंतरराष्ट्रीय सीमा मानतो. पाकिस्तानने घुसखोरीच्या भीतीमुळे या सीमेला सैन्यबळाने मजबूत केले आहे. तालिबानच्या विरोधामुळे ही सीमा सतत विवादाचे कारण बनते, ज्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढतो.
इस्लामाबादस्थित ‘सेंटर फॉर रिसर्च ॲण्ड सिक्युरिटी स्टडीज’ने तणावाचा संबंध पाकिस्तानमध्ये झालेल्या ‘टीटीपी’च्या हल्ल्यांशी जोडला आहे. 2025 सालच्या पहिल्या तीन तिमाहींमध्ये 2 हजार, 414 मृत्यू नोंदवले गेले आहेत. जर ही कारवाई सुरू राहिली, तर 2025 हे गेल्या दशकातील सर्वांत घातक वर्ष ठरू शकते. अशा परिस्थितीत पाकिस्तानच्या सैन्य आणि सरकारवर ‘टीटीपी’विरुद्ध कारवाई करण्याचा प्रचंड दबाव आहे. तालिबानचे परराष्ट्रमंत्री आमिर खान मुत्तकी यांचा भारत दौरादेखील अफगाणिस्तान-पाकिस्तान तणाव वाढवणारा ठरला. भारताने काबुलमधील आपले दूतावास पुन्हा उघडण्याचे आणि तालिबान सरकारशी राजकीय संबंध वाढवण्याची घोषणा केली. भारताचा तालिबानशी संपर्क वाढतो आहे, हे इस्लामाबादला फारसे रुचत नाही. पाकिस्तानच्या दृष्टीने अफगाणिस्तानमध्ये भारताची वाढती भूमिका आणि तालिबानशी संवाद म्हणजे, क्षेत्रीय संतुलन बदलण्याचा धोका आहे. त्यामुळे पाकिस्तानने तणाव वाढवण्यासाठी सीमा क्षेत्रात सैनिकी उपाययोजना किंवा हल्ले केले असण्याची शक्यता आहे. तालिबानने स्पष्ट सांगितले आहे की, अफगाण जमीन इतर देशांविरोधी वापरासाठी दिली जाणार नाही. अफगाणिस्तानची भूमिका संतुलन साधणारी आहे, ते पाकिस्तानशी थेट युद्धात न पडता, आपल्या भूभागाचे संरक्षण आणि स्थिरता सुनिश्चित करेल. तसेच, भारतासोबत राजनयिक संबंध वापरून क्षेत्रीय प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करेल.