तेव्हा मान शरमेने का झुकली नाही?

15 Oct 2025 12:56:08

‘तालिबानला दिलेला सन्मान बघून मान शरमेने खाली झुकली,’ असे वक्तव्य करणार्‍या जावेद अख्तर यांच्यासारख्या दांभिक पुरोगाम्यांनी भारताने कोणत्या देशाशी संबंध राखायचे, किती राखायचे त्याची नसती उठाठेव करूच नये. कारण, भारतात असो वा बांगलादेशात हिंदूंवर, त्यांच्या मंदिरांवर, मालमत्तेवर जीवघेणे हल्ले झाले, तेव्हा अख्तरांची मान शरमेने कधी खाली का झुकली नाही?

अफगाणिस्तानातील तालिबान राजवटीचे परराष्ट्रमंत्री मुत्तकी यांचे भारताने अधिकृतरित्या स्वागत करून त्यांच्याशी राजनैतिक संबंध प्रस्थापित केल्याबद्दल नामवंत गीतकार आणि पटकथाकार जावेद अख्तर यांनी सरकारवर टीका केली. "तालिबान ही जगातील एक दहशतवादी संघटना असून तिच्या प्रतिनिधीचे भारतासारख्या लोकशाहीवादी आणि सेयुलर देशाच्या सरकारने अशा प्रकारे स्वागत-सन्मान करणे ही चिंताजनक गोष्ट आहे,” असे अख्तर यांचे म्हणणे. एवढेच नाही तर "भारत सरकारच्या या कृतीने आपली मान शरमेने खाली गेली आहे,” असेही अख्तर म्हणाले. हिंदी चित्रपटसृष्टीत कलाकारांपेक्षा संधिसाधू, ढोंगी आणि नफाखोर लोकांची भाऊगर्दी झाली आहे. या संधिसाधूंना केवळ स्वत:चा फायदा दिसतो आणि तेव्हा त्यांना कोणतेही तत्त्वज्ञान आठवत नाही की, मूल्ये आठवत नाहीत. जावेद अख्तर हे अशा ढोंगी सेयुलरांचे शिरोमणी आहेत. त्यांनी केलेल्या काही पाकिस्तानविरोधी वक्तव्यांचा हवाला देऊन ते कसे राष्ट्रभक्त आहेत किंवा धर्मनिरपेक्ष आहेत, याची भलामण करणारे अनेक आहेत. पण, या अख्तर यांची धर्मनिरपेक्षता ही निवडक असून ती त्यांच्या सोयीनुसार जागृत होत असते, हे लक्षात घ्यायला हवे.

कहर म्हणजे याच अख्तर महाशयांनी अवघ्या तीन वर्षांपूर्वी रा. स्व. संघ, ‘बजरंग दल’ आणि ‘विश्व हिंदू परिषद’ यांची तुलना तालिबानशी केली होती. त्याबद्दल त्यांच्यावर मानहानीचा खटलाही दाखल करण्यात आला. चार वर्षांपूर्वी तालिबानने पुन्हा एकदा अफगाणिस्तानात सत्ता हस्तगत केली होती, तेव्हा अख्तर यांनी संघ आणि तालिबान यांची तुलना केली होती. "तालिबान ही एक हिंसक आणि कट्टरपंथीय संघटना आहे. तालिबानला ज्या प्रकारे एक इस्लामी राष्ट्र उभे करायचे आहे, त्याच प्रकारे भारतातही संघ आणि त्याच्या हिंदुत्ववादी संघटनांना भारत हे एक हिंदूराष्ट्र करायचे आहे,” असे तारे अख्तरांनी तोडले होते. त्याबद्दल त्यांच्यावर मानहानीचा खटलाही दाखल करण्यात आला. अख्तर यांना ना संघ आणि त्याची विचारसरणी याची कल्पना आहे, ना हिंदूराष्ट्र म्हणजे काय, त्याची. ज्याप्रमाणे कट्टर इस्लामी विचारसरणीत इस्लामव्यतिरिक्त अन्य कोणत्याही धर्माला स्थान नाही, तसेच या कथित हिंदूराष्ट्रात अन्य धर्मीयांना स्थान असणार नाही, असे अख्तर यांचे फसवे गृहितक. ‘अल-कायदा’, ‘इसिस’, ‘तालिबान’सारख्या संघटनांनी हजारो निरपराध लोकांचे हत्याकांड धर्माच्या आधारावरच केले. त्याउलट संघ आणि परिवारातील संघटना जातीपाती, धर्मभेद न मानता समाजात सक्रियपणे काम करतात, संकटसमयी मदतीला जातात. पण, हिंदूराष्ट्र म्हणजे हिंदू धर्माच्या तत्त्वज्ञानावर आधारलेले राष्ट्र. हे तत्त्वज्ञान काय सांगते? ‘वसुधैव कुटुम्बकम्’, ‘सर्वे सन्तु निरामय’ ही या हिंदूराष्ट्राची संकल्पना. त्यात धर्माच्या आधारावर भेदाभेद नाही. आजही भारतात सर्वच धर्मीयांना आपल्या उपासना पद्धती आचरण्याचे स्वातंत्र्य आहे. अख्तर यांच्या धर्माने त्यांच्या डोयात ज्या कट्टर धार्मिक राष्ट्राची संकल्पना भरविली आहे, त्यावरूनच ते हिंदूंनाही जोखत आहेत. पण, अन्य धर्मीयांमध्ये आणि हिंदूंमध्ये नेमका हाच फरक आहे, हे अख्तर यांना स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांनीही उमगत नसेल, तर तो त्यांचा बौद्धिक दिवाळखोरपणा आहे.

भारताची फाळणी धार्मिक आधारावर होऊन मुस्लिमांना स्वतंत्र देश मिळाला. तरीही उर्वरित भारतात मुस्लिमांना राहण्याचे आणि त्यांचे धार्मिक आचरणाचे स्वातंत्र्य आज गेली सुमारे आठ दशके उपलब्ध आहे, तेही भारतात हिंदू बहुसंख्य असल्यामुळेच! उलट पाकिस्तान आणि नंतरचा बांगलादेश या देशांमध्ये हिंदूंची संख्या केवळ रोडावली असे नव्हे, तर ते जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. अगदी गेल्या वर्षी बांगलादेशात झालेल्या रक्तरंजित उठावात हिंदूंवर किती अत्याचार झाले, तेही अख्तर विसरले काय?

ज्या तालिबानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या स्वागतामुळे अख्तर नाराज झाले आहेत, त्या अख्तर यांनी यापूर्वी पाकिस्तानचे लष्करशहा परवेज मुशर्रफ यांच्या भारतातील स्वागतावर अशी टीका केली नव्हती. कारगिलमध्ये विश्वासघाताने पाकिस्तानी फौजा घुसवून भारतावर युद्ध लादणारे मुशर्रफच होते. त्या युद्धात अनेक तरुण भारतीय जवानांना आपले बलिदान द्यावे लागले. तरीही आग्रा येथे मुशर्रफ यांना वाटाघाटी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. तेव्हा अख्तर यांना लाज वाटली नव्हती का? ते पाकिस्तानात कवी संमेलनात सहभागी झाले होते, तेव्हा त्यांना त्याची लाज वाटली नाही का? इतकेच नव्हे, तर पाकिस्तानी कलाकारांना भारतीय चित्रपटांमध्ये भूमिका देण्यावर आणि तेथील गायकांना भारतात कार्यक्रम आयोजित करण्यावर अख्तर कधी नाराज झाल्याचे दिसले नाहीत. किती भारतीय कलाकारांना पाकिस्तानी चित्रपटांमध्ये भूमिका मिळाल्या आहेत, ते अख्तर सांगतील काय?

त्यातच अफगाणिस्तान हा आजच्या काळात भारताच्या सार्वभौम सुरक्षेच्या दृष्टीने आणि सामरिक डावपेचांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा देश आहे, हे कदापि नाकारुन चालणार नाही. पाकिस्तानशी त्याचे संबंध विकोपाला गेले आहेत. मुस्लीम असूनही अफगाणी लोकांना पाकिस्तानबद्दल कधीच प्रेम नव्हते. आता तर तो देश पाकिस्तानशी युद्धच लढण्याच्या तयारीत आहे. पाकिस्तानमधील इस्लामी दहशतवादी संघटनांना सर्वतोपरी मदत देण्याचे धोरण पाकिस्तानातील लष्करी आणि मुलकी नेतृत्व राबवित आहे. त्या संघटनांचा उपद्रव आता फक्त भारतालाच होत नसून तो अफगाणिस्तानलाही होत आहे. तसेच, पाकिस्तानी लष्कराच्या दमनशाहीविरोधात बलुचिस्तान, खैबर पख्तुनख्वा प्रांत, पाकव्याप्त काश्मीर, गिलगिट-बाल्टिस्तान आणि पंजाब या प्रदेशांतील जनतेने आता उठाव केला आहे. तेथे गृहयुद्धासारखी स्थिती. त्यामुळे पाकिस्तानवर दबाव ठेवण्यासाठी अफगाणिस्तानशी मैत्री आवश्यकच. मुळात अफगाणिस्तानानेच भारताकडे सर्वप्रथम मैत्रीचा हात पुढे केला, हे देखील लक्षात घेतले पाहिजे. आपल्या देशातील मौल्यवान खनिजसंपत्तीही भारताला देण्यास अफगाण राजवट तयार आहे. अफगाणिस्तानशी संबंध सुधारल्याचे अनेकविध भूराजकीय लाभ भारताला होणार आहेत. त्यामुळे त्या देशाशी संबंध सुधारणे ही भारताच्या सुरक्षेशी संबंधित बाब. अर्थात, इतका सगळा विचार अख्तर कशाला करतील म्हणा! कारण, त्यांना मोदी सरकारवर टीका करण्याचे निमित्तच हवे असते. राजकीय, सामरिक आणि परराष्ट्र कूटनीतीचे ज्ञान नसताना अख्तर यांनी केलेली टीका हे केवळ बेजबाबदार वक्तव्य ठरते.

धार्मिक असणे म्हणजे कट्टरवादी असणे हीच ज्यांची समजूत आहे, असे अख्तरसारखे कथित पुरोगामी हे खरे म्हणजे मनाने बुरसटलेलेच आहेत. अख्तर असोत की नासिरुद्दिन शहा, यांच्यासारख्यांना मोदी सत्तेवर आल्यापासून जी मळमळ झाली आहे, ती वेळोवेळी बाहेर पडते. त्यातून त्यांचा खरा मतलबी चेहरा दिसून येतो.


Powered By Sangraha 9.0