मसालानिर्मितीचा ‘सुवर्ण’प्रवास

    15-Oct-2025
Total Views |

निव्वळ अपेक्षापूर्तीचे स्वप्नरंजन न करता, नवर्‍याच्या खांद्याला खांदा लावत यशाचे शिखर सर करत कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देणार्‍या सुवर्णा गोसावी यांच्याविषयी...

म्हणजेच शक्ती! स्त्री कोणत्याही रूपामध्ये पुरुषाची शक्ती म्हणूनच उभी ठाकलेली दिसते. लहान बाळाला असलेला आईचा आधार ते अडचणीच्या काळात अर्धांगिनीच्या सल्ल्याने मिळालेला धीर आयुष्यात अनेकांनी अनुभवला असेलच. कोणासाठीही न बदलणारा बाप मुलीच्या हट्टासाठी मात्र स्वतःमध्ये हसत हसतच बदल करताना अनेकदा दिसतो. भाऊ-बहिणीच्या नात्याचे अनेक प्रसंग अधिक पुराणकाळापासून सर्वांनीच ऐकले आहेत. संकटाच्या काळात पुरुषाच्या आत्मविश्वासात वृद्धी करण्यात स्त्रीचा हातभार मोठाच! म्हणूनच हिंदू संस्कृतीत ‘यत्र नार्यस्तु पूज्यंते, रमंते तत्र देवता’ असे सांगितले आहे. आज अनेक घरांमध्ये स्त्रीच्या धैर्य आणि कष्टानेच संसारातील गरिबी दूर होऊन, घराला समृद्धीची दिशा मिळाल्याची अनेक उदाहरणे आहेत. अशा अनेक गाथांपैकी एक म्हणजे नाशिक जवळील नांदूर-शिंगोटे गावच्या उद्योजिका सुवर्णा संजय गोसावी यांची कथा.

सुवर्णा यांचा जन्म नाशिकच्या सिन्नर येथे शेतकरी कुटुंबात झाला. सुवर्णा यांच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची. शेतीवाडी करून आईवडील अन्यही ठिकाणी मोलमजुरी करायचे. त्यातूनच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चाले. त्याही परिस्थितीमध्ये आनंद मानण्यासाठीचा मोठेपणा त्यांच्या आईवडिलांकडे होता. तेच संस्कार सुवर्णा यांच्यावरही झाले.

आयुष्याचा गाडा पुढे हाकत असतानाच सुवर्णा यांच्यावर एक आघात झाला. लहान वयामध्येच त्यांचे पितृछत्र हरपले. त्यामुळे घरातील परिस्थिती अधिकच हलाखीची झाली. अशा परिस्थितीमध्ये इयत्ता चौथीपर्यंतचे शिक्षण घेणेच सुवर्णा यांना शक्य झाले. त्यानंतर त्यांचे शिक्षण सुटले ते कायमचेच. घरातील आर्थिक परिस्थितीमुळे वयाच्या १२व्या वर्षीच सुवर्णा यांचे लग्न लावून देण्यात आले. त्यामुळे लहान वयातच त्यांच्यावर संसाराची जबाबदारी येऊन पडली.

सुवर्णा यांचे लग्न झाले असले, तरीही त्यांच्या आयुष्यातील आर्थिक परिस्थितीची भीषणता कमी झाली नव्हती. त्यांच्या सासरीही गरिबी पाचवीला पूजलेली. सुवर्णा यांचे यजमान आचारी म्हणून अनेक ठिकाणी कामाला जात असत. तसे पाहायला गेले, तर हातावरचेच त्यांचे पोट. त्यातही राहत्या घराचाही थांगपत्ता नव्हता. मात्र, अशा परिस्थितीतही त्यांनी नवर्‍याची खंबीरपणे साथ दिली. त्यांच्या क्षमतेनुसार सहकार्य केले.

दरम्यानच्या काळात सुवर्णा यांच्या संसारवेलीवर दोन फुले फुलली. सुवर्णा यांना पुत्ररत्नांचा लाभ झाला. त्यामुळे सुवर्णा यांच्या कुटुंबामध्ये आलेला आनंदाचाच हा क्षण होता. दुसरा मुलगा सहा महिन्यांचा असतानाच, सुवर्णा यांनी एका कापडाच्या दुकानामध्ये काम करण्यास सुरुवात केली. घरात खाणारी तोंडे चार झाली असल्याने, एकाच व्यक्तीवर आर्थिक भार नको हाच विचार त्यामागे होता. आठ वर्षे त्यांनी या कपड्याच्या दुकानामध्ये काम केले. याच काळात नाशिकमध्येच त्यांनी स्वतःचे भाड्याचे घरही घेतले. त्यामुळे त्यांच्या आयुष्याला एक स्थैर्य प्राप्त झाले.

सुवर्णा यांच्यातील गुण म्हणजे, नवीन कौशल्य शिकण्याची त्यांना असलेली उपजत आवड. कपड्याच्या दुकानात काम करतानाच सुवर्णा एका बचत गटाशी जोडल्या गेल्या. त्या बचत गटाच्या माध्यमातून विविध प्रकारचे कौशल्य विकास कार्यक्रम घेतले जात. असेच मसाला तयार करण्याचे ज्ञान देणार्‍या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण वर्गाला सुवर्णा यांनी प्रवेश घेतला आणि मसालानिर्मितीचे तंत्रही शिकून घेतले होते.

यानंतरच्या काळात स्वतःचा काही व्यवसाय उभा करावा म्हणून सुवर्णा यांनी चहाच्या व्यवसायाची सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी चहाच्या टपरीवर चहा विकण्यास सुरुवात केली. यामध्ये बर्‍यापैकी अर्थार्जन त्यांना होऊ लागले होते. त्यामुळे घरामध्ये आर्थिकबाबतीत काहीसे स्थैर्यही निर्माण झाले. याच काळात त्यांच्या यजमानांनाही एका उपहारगृहात नोकरी मिळाली. सर्वकाही आलबेल असताना नशिबाची परीक्षा काही केल्या संपत नव्हती. चहाचा व्यवसाय सुरू करून तीन वर्षे झाली होती, व्यवसायामध्ये काहीसा जमही बसला होता आणि त्याचवेळी ‘कोविड’ची साथ पसरली. या महामारीमध्ये अनेक लहान व्यवसायांना फटका बसला. तसाच फटका सुवर्णा यांच्या व्यवसायालाही बसला. काही काळासाठी बंद केलेला हा व्यवसाय नंतर सुरू करणे सुवर्णा यांना शक्यच झाले नाही. त्यामु़ळे पुन्हा एकदा पूर्वीचेच दिवस येणार की काय? असे विचार त्यांच्या मनात येऊ लागले.

मात्र, त्याचवेळीमसालानिर्मितीचे घेतलेले प्रशिक्षण त्यांच्या मदतीला धावून आले. ‘कोविड’ काळामध्ये मोबाईलवर त्यांनी मसालानिर्मितीच्या अनेक चित्रफिती पाहिल्या होत्या. त्यामुळे त्यांनी नंतरच्या काळामध्ये गावातील दोन महिलांनाच घरच्या घरी मसाला तयार करून दिला. त्या महिलांना सुवर्णा यांच्याकडील मसाला आवडल्याने त्यांनी कायमस्वरूपी त्यांच्याकडूनच मसाला घेण्याचे मान्य केले. इथेच सुवर्णा यांच्या नव्या व्यवसायाचा पाया घातला गेला. त्यानंतरच्या काळामध्ये सुवर्णा यांनी स्थानिक पातळीवर कमी प्रमाणात, पण विविध प्रकारच्या मसाल्यांची विक्री करण्यास सुरुवात केली. अल्पावधीतच या व्यवसायाला बाजारपेठातून उत्तम प्रतिसाद मिळू लागला. आज विविध प्रकारचे मसाले सुवर्णा यांच्याकडे मिळत असून, सगळेच मसाले सुवर्णा घरच्या घरी तयार करतात. मिरची मसाला, हळद यांना सर्वांत जास्त मागणी असल्याचेही सुवर्णा नमूद करतात. आज सुवर्णा यांच्या व्यवसायाची उलाढाल वर्षाला दहा लाखांच्या घरात आहे. भविष्यात व्यवसायाल उन्नत स्वरूप देण्यासाठी मशीन खरेदी करण्याचा विचार असल्याचेही सुवर्णा सांगतात. या सगळ्या प्रवासामध्ये ‘उमेद’ उपक्रमाची झालेली मदत लाख मोलाची आहे, असेही सुवर्णा नम्रपणे नमूद करतात. सुवर्णा यांनी त्यांच्या यजमानांच्या खांद्याला खांदा लावून फक्त अपेक्षांनाच न कुरवाळता, स्वप्नपूर्ण करण्यासाठी मेहनत घेतल्याने आज नाशिकमध्ये या दाम्पत्याची वास्तूही झाली आहे. सुवर्णा यांचा प्रवास सर्वांर्थाने आदर्शच आहे. सुवर्णा गोसावी यांच्या पुढील प्रवासाला दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या हार्दिक शुभेच्छा!

- कौस्तुभ वीरकर
(अधिक माहितीसाठी संपर्क ७७९६१३५२६८)