अर्थविचार हा भारतीय संस्कृतीसाठी नवीन नाहीच. कौटिल्याच्या अर्थशास्त्रासह अन्य पौराणिक ग्रंथांतूनही प्राचीन भारतीय अर्थविचाराचे तत्वज्ञान आपल्यासमोर उलगडते. प्राचीन भारतीय अर्थविचाराचे आजच्या काळात सरसकट वापरणे गैरलागू ठरावे. पण, या नियमांमागील तत्त्वचिंतन जाणून घेणे आजच्या काळासाठीही तितकेच उपयुक्त ठरावे. त्याविषयी सविस्तर...
पश्चात्य अर्थविचारांचा आणि त्यामागील तत्त्वप्रणालींचा मागोवा घेतल्यास, त्यात शाश्वतता या तत्त्वाचा विचार नाही, हे स्पष्ट आहे. भारतीय निसर्गदृष्टीचाही विचार करताना आपण हे पाहिले की, नैसर्गिक संसाधनांच्या वापराविषयीची मूलभूत तत्त्वे पाश्चात्य संस्कृतीत आणि भारतीय संस्कृतीत भिन्न स्वरूपाची आहेत. त्यामुळे पाश्चात्य अर्थविचारांच्या मर्यादा पाहिल्यानंतर त्यांचे उत्तर शोधताना भारतीय चिंतनाकडे वळणे अपरिहार्य आहे. दुर्दैवाने साधारण दोन शतकांच्या प्रत्यक्ष आणि वैचारिक गुलामगिरीचा परिणाम वर्तमानकाळात असा आहे की, भारतीय अर्थचिंतनाचे योग्य आकलन करून घेण्याची मानसिक पार्श्वभूमी आज नाही. प्राचीन काळापासून चालत आलेल्या कित्येक परंपरा आज खंडित झाल्यामुळे आपल्याला मिळू शकणारे ज्ञान केवळ ग्रंथांच्या वाचनातून आहे. त्यांचे भारतीय मनोभूमिकेतून योग्य आकलन करून घेतल्यासच त्याचा योग्य तो लाभ होऊ शकेल, अन्यथा पाश्चात्य विचारांचेच समर्थन करणारा अन्वय लावणारे भारतीय चिंतनाचे आकलन यापूव झालेले आहेच. अर्थविषयातील भारतीय चिंतनाची तोंडओळख करून घेताना त्याच्या वेगळ्या मांडणीचीही थोडी चर्चा आज आपण करू.
अर्थशास्त्र म्हटले की, सर्व भारतीयांना विष्णुगुप्त चाणक्य आठवतो. ‘कौटिलीय अर्थशास्त्र’ नावाने त्याचा ग्रंथ विख्यात आहे. परंतु, याच ग्रंथानुसार चाणक्याने त्याचे विचार मांडताना प्राचीन ऋषींच्या मताचा विचार प्रथम करीत, नंतर स्वतःची मते व्यक्त केली आहेत. प्राचीन काळातील अर्थशास्त्र विषयावरील प्रमुख विचार ‘बार्हस्पत्य शास्त्र’ आणि ‘औशनस शास्त्र’ या अनुक्रमे देवांच्या आणि दैत्यांच्या गुरूंनी म्हणजे बृहस्पती आणि शुक्राचार्यांनी मांडलेल्या शास्त्रांमध्ये विभागले गेले असल्याचे कौटिल्याचा ग्रंथ आपल्याला सांगतो. हे दोन्ही ग्रंथ पौराणिक मतानुसार अतिप्राचीन असे असल्याने त्यांची नेमकी कालनिश्चिती संभवत नाही. कौटिल्य त्यानंतरही अर्थशास्त्र विषयात अनेक विभिन्न मतप्रवाह असून इंद्र, शिव, प्राचेतस मनू आदी या मतांचे रचयिते असल्याचे सांगतो. या सर्व मतांचा तौलनिक विचार इथे शक्य नाही. परंतु, प्राचीन भारतीय अर्थशास्त्राचा आजच्या संदर्भात विचार करताना त्याच्या विषयव्याप्तीचा विचार सर्वप्रथम करायला हवा.
कौटिल्याच्या मते, मनुष्यांच्या जीवितवृत्तीकरिता पृथ्वीच्या भरणपोषणाचे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. ही व्याख्या जशी हिंदू जीवनदृष्टीशी सुसंगत आहे, तशी ती कौटिल्याच्या काळाशीही सुसंगत आहे. कौटिल्याच्या काळात मानवी उद्यमाचे दोन महत्त्वाचे आयाम म्हणजे शेती आणि पशुपालन. या दोन्ही उद्यमांसाठी महत्त्वाची आवश्यकता म्हणजे योग्य अशी भूमी. मानवी समाजाच्या ज्या प्राथमिक गरजा आहेत, त्या भागवण्याचे साधन असलेले हे दोन व्यवसाय असल्याने समाजात त्यांचे वहन योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात होणे आवश्यक. कौटिल्याच्या मते, राज्य शासनाचे महत्त्वाचे कार्य हे अर्थनियमन आहे. महाभारतात राज्यव्यवस्थेची उत्पत्ती सांगताना भीष्म म्हणतो की, “प्राचीन काळी कोणत्याही राज्याचा कोणी राजा नव्हता. केवळ धर्माच्या आधारे प्रजाच स्वतःचे रक्षण करीत असे. परंतु, नंतर धर्माचा क्षय झाल्यावर मात्स्यन्यायाचा अवलंब होऊ लागला आणि दंडधारी राजाची आवश्यकता समाजात निर्माण झाली.” चाणक्यही मात्स्यन्यायाने चालणाऱ्या समाजाच्या अर्थव्यवहारांचे नियमन राजदंडाआधारे होणे आवश्यक मानतो. ‘कौटिलीय अर्थशास्त्र’ हे याचमुळे राजांना किंवा राजसत्तेला उद्देशून लिहिलेले शास्त्र आहे. भारतीय मत आणि पाश्चात्य मत यांच्यात सर्व अर्थव्यवहारांचे मूळ राज्यव्यवस्था असण्याबाबत एकमत असल्याचे आपल्याला दिसते. मुक्त अर्थव्यवस्थेचा प्रणेता ॲडम स्मिथ आपल्या ग्रंथाचे नाव ‘राष्ट्रांच्या संपत्तीच्या कारणांचा अभ्यास’ असे म्हणतो आणि त्याचा विरोधक मार्क्स हा बाजारपेठीय व्यवस्थेचा उपाय म्हणून थेट सरकारी उद्यमांच्या उभारणीची सूचना करतो.
परंतु, भारतीय आणि पाश्चात्य अर्थचिंतनातील महत्त्वाचा फरक त्यामागील नीतीतत्त्वांचा आहे. या सृष्टीच्या अधिकाराचे आणि तिच्या भोगाचे तत्त्व सांगताना ‘ईशावास्योपनिषद’ आपल्याला ‘ईशावास्यं इदं सर्वम्’ सांगताना ‘तेन त्यक्तेन भुंजीथाः’ असेही सांगते. संयमित भोगाचा हा विचार हिंदू अर्थविचाराच्या केंद्रस्थानी आहे, असे म्हणता येईल. सौख्यवादाच्या आणि उपयुक्ततावादाच्या आधारे उभे राहिलेले पाश्चात्य अर्थशास्त्र या विषयात एक वेगळीच भूमिका घेतो. शोषणाच्या प्रवृत्तीतून उभी राहिलेली अर्थव्यवस्था शाश्वत स्वरूपात जागतिक मानवी समाजाला अपुरी पडेल, हे स्पष्ट असताना या प्रश्नाचे एक सैद्धांतिक उत्तर म्हणून उपनिषदांचे मत महत्त्वाचे आहे. परंतु, भारतीय चिंतन केवळ सैद्धांतिक आदर्शवादाचे आहे, असा समज करून घेणे चुकीचे ठरेल. धर्माची बाजू कोणती हे माहीत असताना भीष्मद्रोणादी वीर कौरवांच्या बाजूने का लढले, या युधिष्ठिराच्या प्रश्नाचे उत्तर देताना ‘अर्थस्य पुरुषो दासः’ हे भीष्माचे वचन सुप्रसिद्ध आहे.
भारतीय समाजचिंतनातील यासंदर्भात महत्त्वाचे योगदान हे चतुष्टय पुरुषार्थाच्या विचाराचे आहे, असे म्हणता येईल. हिंदू मान्यतेनुसार जीवनातील सर्वश्रेष्ठ आदर्श हा धर्मपालनाचा आहे. हा धर्म जसा व्यक्तीचा सांगितला गेला आहे, तसाच तो व्यवस्थांच्या संदर्भातही कल्पिता येतो. अर्थशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या म्हणजे राज्यव्यवस्था आणि अर्थव्यवस्था. या व्यवस्थांचा आणि त्यांचे संचालन करणाऱ्या व्यक्तींचा धर्म नेमका काय, याविषयीचे चिंतन भारतीय तत्त्वज्ञान मांडते आणि या धर्माचे पालन हा त्या व्यवस्थांच्या अंतर्गत आदर्श ठरतो. चतुष्टय पुरुषार्थामध्ये भारतीय चिंतन धर्म आणि अर्थाबरोबर कामविचारही अंतर्भूत करते. त्यागपूर्वक भोग घ्यावा, असे सांगताना भोगाला भारतीय चिंतनात सर्वथा नाकारलेले नाही.
‘धर्मादर्थश्च कामश्च’ अशी घोषणा करत, महाभारतकारांनी अर्थाला जरी धर्माच्या आधारे बांधले असले, तरी व्यवहारात अर्थाचे नियमन राज्यशासनाद्वारे व्हावे, असा विचार हिंदू अर्थचिंतनात मांडला गेला आहे. कौटिल्य तर ‘अर्थ एव प्रधानः| अर्थमूलो धर्मः|’ असे मत व्यक्त करतो. अर्थव्यवहार व्यवस्थित चालू राखण्यासाठी राजाने करण्याच्या विविध कार्यांची यादी अर्थशास्त्र आपल्याला सांगते. यात कृषीसाठी बियाणे, पशुधन अवजारे इत्यादींचा पुरवठा, सिंचनासाठी जलाशय, बंधारे इत्यादींची निर्मिती, जंगलांचे संरक्षण, त्यातून मिळणाऱ्या उत्पादनांचे नियमन, खनिजकर्म-धातुकर्म यांना साहाय्य, सार्थांच्या (प्रवासी व्यापारी संघ) प्रवासासाठी मार्गांची निर्मिती, त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था या सर्व कार्यांचे वर्णन आहे. या कार्यांसाठी सरकारी सेवकांची नियुक्ती आणि त्यांच्या कार्यांची तसेच वेतनाची निश्चिती अर्थशास्त्रात आहे. या सर्व सरकारी यंत्रणा चालवण्यासाठी आवश्यक निधी प्राप्त व्हावा, यासाठी विविध करांचे प्रयोजन सांगितले आहे. त्यातही स्वजनांकडून घ्यावयाच्या आणि परकीयांकडून घ्यावयाच्या करांमध्ये भेद सांगितला असून, त्यामागील अर्थशास्त्रीय तत्त्वांचेही विवरण आहे. थोडक्यात म्हणजे, भारतीय चिंतन केवळ तात्त्विक मीमांसा करून थांबत नाही, तर अर्थव्यवहारांच्या चलनाचे व्यावहारिक नियमही घालून देते.
परंतु, प्राचीन भारतीय अर्थविचार त्याकाळच्या अर्थव्यवहारांच्या सोपेपणामुळे आजच्या काळात काहीसा मर्यादित वाटू शकतो. कृषी आणि पशुपालन याव्यतिरिक्त अनेक धातुकाम, विणकाम यासारखी कारागिरीची जी कामे त्या काळी प्रचलित असतील, त्यांना अर्थव्यवहारात विशेष महत्त्वाचे स्थान नाही. ज्यांना आपण ‘प्राथमिक उद्योग’ म्हणतो, त्यात व्यस्त लोकांच्या अर्थव्यवहारांना प्राधान्य असून ते समाजाच्या मूलभूत गरजा भागवतात, याचे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे महत्त्व मान्य केल्याचे आपल्याला दिसते. वस्तूंच्या मूल्यवर्धनाचे तत्त्व आणि त्याप्रमाणात किंमत आकारणीचे तत्त्व जे आज आपल्याला रोजच्या व्यवहारात दिसते, ते प्राचीन काळात फारसे अवलंबलेले आपल्याला दिसत नाही. अर्थव्यवहारांचे सर्व प्रमुख सिद्धांत हे औद्योगिक क्रांतीच्या पार्श्वभूमीवर मांडले गेले आहेत. यंत्रपूर्व काळातील अर्थचिंतन जसेच्या तसे लागू करणे कालचक्राला उलट फिरवण्यासारखे आहे.
म्हणून प्राचीन भारतीय अर्थविचाराचे आजच्या काळात महत्त्व शोधताना आपली गंतव्याविषयीची दृष्टी स्पष्ट असणे आवश्यक आहे. कौटिल्याच्या काळातील अमात्य परिषदेची रचना, अर्थनियमनासाठी विविध अधिकाऱ्यांच्या नेमणुका, त्यांच्या वेतनाचे नियम आणि कार्याच्या परिशीलनाच्या पद्धती आज वापरणे सर्वथा गैरलागू ठरेल. पण, या सर्व नियमांच्या मागचे तत्त्वविचार जाणून घेणे कदाचित आजच्या काळासाठीही उपयुक्त आहे. मानवी व्यवहारांची परिमाणे जरी आज बदललेली असली, तरी त्यामागचे स्वभाव बदललेले नाहीत. त्यामुळे अर्थव्यवहारांमागील मूलभूत प्रेरणा त्याच आहेत. पाश्चात्य चिंतकांनी केवळ या प्रेरणांचा अभ्यास करत आणि त्यांच्या तर्कप्रधान विचारप्रणालीचा आधार घेत एक अर्थचिंतन उभे केले. मानवी प्रेरणांच्या संबंधी जे वेगळे आदर्श भारतीय चिंतन मांडते आणि तर्कप्रधानतेपलीकडे जाऊन स्थानीय संदर्भांच्या महत्तेचा आधार घेत जे मानवी वर्तनाचे प्रतिमान बनवते, त्याचा आधार घेत प्राचीन भारतीय अर्थचिंतनही उभे राहिले आणि आजचे भारतीय अर्थचिंतनही उभे राहू शकते.
- डॉ. हर्षल भडकमकर
(लेखकाने मुंबईतील ‘टीआयएफआर’ येथून खगोलशास्त्रात ‘पीएच.डी.’ प्राप्त केली आहे. सध्या एका खासगी वित्तसंस्थेत नोकरी करत असून ‘प्रज्ञा प्रवाह’ या संस्थेचे कोकण प्रांत कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत आहेत.)
9769923973