मुंबई (विशेष प्रतिनिधी) - बल्लारशाह-गोंदिया रेल्वे मार्ग हा वाघांसाठी कर्दनकाळ ठरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. सोमवार दि. १३ आॅक्टोबर, रोजी या मार्गावर एका नर वाघाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला (gondia-balharshah railway). या मार्गावर आजवर १८ वाघांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे (gondia-balharshah railway). अशा परिस्थितीत हा रेल्वमार्ग वाघांबरोबरच इतर वन्यजीवांसाठी कर्दनकाळ ठरत असताना देखील रेल्वे प्रशासन अजूनही बघ्याच्या भूमिकेत आहे (gondia-balharshah railway).
रविवारी गोंदिया कडून बल्लारशाहकडे जाणाऱ्या पॅसेंजर रेल्वेने रात्री ११ वाजण्याच्या सुमारास एका वाघाला धडक दिली. या धडकेत वाघ जागीच मृत्यू पावला. वन विभाग, हॅबिटॅट कॉन्झर्वेशन सोसायटीचे सदस्य आणि राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाच्या सदस्यांनी घटनास्थळी जाऊन पाहिल्यानंतर तो 'टी-४०' असा सांकेतिक क्रमांक असलेला 'बिट्टू' नावाचा वाघ निघाला. बल्लारशाह-गोंदिया हा रेल्वे मार्ग वन्यजीवांसाठी आणि त्यातही खास करुन वाघांसाठी कर्दनकाळ ठरत असल्याचे वृत्तांकन वारंवार दै. 'मुंबई तरुण भारत'ने केले आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात या मार्गिकेवरील सिंदेवाही येथे रेल्वेच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू झाला होता. गेल्या वर्षी या मार्गिकेवरील अजुर्नी मोरगाव, नागभीड येथे देखील वाघांना आपला जीव गमवावा लागला होता. राज्यातील वनक्षेत्र आणि व्याघ्र भ्रमणमार्गामधून जाणाऱ्या आठ रेल्वे मार्गिकांवर वन्यजीवांच्या सुककर हालचालीच्या दृष्टीने उपाययोजना राबविण्याची शिफारस 'भारतीय वन्यजीव संस्थान'ने (डब्लूआयआय) केली होती. यामध्ये बल्लारशाह-गोंदिया रेल्वे मार्गिकेवरील गोंदिया-वडसा, वडसा-नागभीड-मूल, मूल-चंद्रपूर आणि चंद्रपूर-राजुरा-कागजनगर या मार्गिकेवर वन्यजीवांच्या हालचालींसाठी उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात आल्या होता.
याच मार्गिकेवर मध्यप्रदेशमधील बालाघाट - नैनपुरदरम्यान वन्यजीवांच्या सुखकर हालचालींसाठी १० अंडरपास आणि दोन ओव्हरपास बांधण्यात आले आहेत. म्हणजेच काही ठिकाणी रेल्वे मार्ग उन्नत स्वरुपात बांधण्यात आला आहे, तर काही ठिकाणी रेल्वे मार्गावरुन वन्यजीवांसाठी उन्नत पूल उभारण्यात आला आहे. या अंडरपास आणि ओव्हरपासमधून २३ प्रजातींचे वन्यजीव ये-जा करत असल्याची नोंद 'वाईल्डलाईफ काॅन्झर्वेशन ट्रस्ट'ने केली आहे. यामध्ये वाघ आणि बिबट्याचा देखील समावेश आहे. अशा प्रकारच्या कोणत्याही उपाययोजना या बल्लारशाह गोंदिया रेल्वे मार्गावर करण्यात आलेल्या नाहीत. या रेल्वे मार्गिकेवर वारंवार होणाऱ्या वन्यजीवांच्या मृत्यूच्या घटना पाहता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये एक जनहित याचिका दाखल करण्यात आलाी आहे. या याचिकेवर सोमवारी सुनावणी पार पडली. यावेळी याचिकाकर्त्यांनी न्यायालयासमोर चंद्रपूरच्या मुख्य वनसंरक्षकानी या मार्गिकेवर वन्यजीवांसाठी उपाययोजना राबविण्याच्या अनुषंगाने रेल्वेला २०१८ साली लिहेले पत्र आणि डब्लूआयआयने या मार्गिकेवर सुचवलेल्या शिफारसींची प्रत सादर केली. डब्लूआयआयच्या या शिफारसींचे वार्तांकन दै. 'मुंबई तरुण भारत'ने केले होते. न्यायालयात सादर झालेल्या माहितीनुसार २९ आॅक्टोबर ते २८ नोव्हेंबर या काळात रेल्वे आणि वन विभागाचे एक पथक एकत्र मिळून या मार्गावर सर्वेक्षण करणार आहेत. त्यासंबंधीचा अहवाल हा नोव्हेंबर अखेरीस न्यायालयासमोर सादर केला जाणार आहे.
'बिट्टू'चा इतिहास
बिट्टू वाघ हा प्रसिध्द जय नामक वाघाचा बछडा होता. बिट्टूचा जन्म उमरेड कऱ्हाडलाच्या जंगलात झाला होता. कालांतराने जयची दोन्ही मुलं श्रीनिवास आणि बिट्टू यांनी ब्रम्हपुरीच्या जंगलात स्वतःच अस्तित्व निर्माण केले. श्रीनिवास या वाघाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. त्यानंतर बिट्टूने ब्रम्हपुरी जंगलात स्वतःचे साम्राज्य निर्माण केले. बिट्टू हा जयचा बछडा असल्याने आणि तो धीट असल्याने त्याला पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असे. पर्यटन क्षेत्रात नसूनही या वाघाची सर्वांना भुरळ होती. सिंदेवाही परिसरात वस्तीच्या आजूबाजूला फिरत असतांना कुठल्याही मानव वन्यजीव संघर्षात त्याचा समावेश नसल्याने तो सर्वांचा लाडका वाघ झाला होता. त्या भागात बिट्टू वाघाकडून कुठलीही मानवी हानी झाली नाही.