पी. चिदंबरम यांनी ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ला ‘चुकीचा मार्ग’ म्हणत, "इंदिरा गांधींना त्याची किंमत जीवाने चुकवावी लागली,” असे विधान केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. त्यांच्या या वक्तव्याने १९८४ सालच्या रक्तरंजित इतिहासावर नव्याने चर्चा सुरू झाली असून, काँग्रेसच्या जबाबदारीपासून पळ काढण्याच्या वृत्तीवरही नेमकेपणाने बोट ठेवले
माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ ही चूक होती आणि "इंदिरा गांधी यांना त्याची किंमत आपले जीवाचे मोल देऊन चुकवावी लागली,” असे नुकतेच केलेले विधान वादग्रस्त ठरले असून, काँग्रेसला ते अडचणीत आणणारे ठरले आहे. चिदंबरम यांच्या विधानाने काँग्रेसला पुन्हा एकदा आरोपीच्या पिंजर्यात उभे केले आहे. १९८४ हे वर्ष भारताच्या इतिहासाच्या दृष्टीने धक्कादायकच! अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात दहशतवाद्यांविरुद्ध राबवण्यात आलेले ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ हे भारताच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत निर्णायक ठरले. मात्र, त्याचवेळी देशातील सांप्रदायिक संतुलनाला तडा देणारेही ते ठरले. आज, जवळपास चार दशकांनंतर, त्या घटनेला पुन्हा उजाळा माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी दिला आहे. चिदंबरम यांचे विधान इतिहासाचे पुनरावलोकनच नव्हे; तर ते काँग्रेसच्या अंतर्गत विचारसरणीतील गोंधळाचेही द्योतक ठरते.
१९८० सालच्या दशकाच्या प्रारंभी पंजाबमधील खलिस्तानी चळवळ उग्र होत चालली होती. भिंद्रनवाले याच्या नेतृत्वाखालील दहशतवाद्यांनी सुवर्ण मंदिराच्या परिसरात शस्त्रास्त्रांचा साठा करून, धार्मिक स्थळाचे रूपांतर दहशतवादी तळात केले. पंजाब सरकारच्या हातातून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेली होती आणि स्थानिक पोलीस दल निष्क्रिय बनले होते. अन्य कोणताही पर्याय शिल्लक राहिला नसल्याने, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी, लष्कराच्या माध्यमातून सुवर्ण मंदिरातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्याचा निर्णय घेतला. काहींनी असेही म्हटले की, हा निर्णय घेण्यास विलंब झाला, तर काहींनी तो भावनिकदृष्ट्या धोकादायक ठरल्याचे म्हटले.
‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’मध्ये भिंद्रनवाले आणि त्याचे सहकारी ठार झाले. मात्र, खलिस्तानी विचारधारा नाहीशी झाली नाही. त्याउलट, या कारवाईनंतर शीख समुदायात असंतोष वाढीस लागला आणि खलिस्तानी चळवळ आणखीच जोराने फोफावली. धार्मिक भावनांना धक्का बसल्याने पंजाबमधील परिस्थिती अस्थिर झाली. यातूनच इंदिरा गांधींची हत्या झाली. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर, दिल्लीसह अनेक शहरांमध्ये उसळलेल्या शीखविरोधी दंग्यांनी देश पुन्हा एकदा हादरला. हजारो निर्दोष शिखांना ठार करण्यात आले. दुर्दैवाने, त्या हिंसाचारात सहभागी असलेल्या अनेक काँग्रेसी नेत्यांना मात्र संरक्षण मिळाले.
चिदंबरम यांच्या विधान राजकीय पातळीवर गंभीर परिणाम करणारे ठरले आहे. काँग्रेसने अनेक दशकांपासून ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’चे श्रेय घेतले, तेव्हा वेळोवेळी त्या निर्णयाचे समर्थन करण्यात आले. आता त्याच घटनेला चूक म्हणणे म्हणजे, इंदिरा गांधींच्या राजकीय निर्णयक्षमतेवच प्रश्न उपस्थित करणे होय! हा विरोधाभासच काँग्रेसच्या अंतर्गत गोंधळाचे प्रतीक आहे. यश असले की त्याचे श्रेय काँग्रेसचे; मात्र अपयशाची वेळ आली की ते आमचे नव्हते, अशी भूमिका. हा श्रेयवाद विरुद्ध जबाबदारी टाळण्याचा स्वभाव काँग्रेसच्या इतिहासात नवीन नाही. त्या काळातही काही वरिष्ठ काँग्रेसी नेत्यांनी या कारवाईच्या यशस्वीतेबद्दल शंका व्यक्त केली होती मात्र, त्याला कोणीही ठाम विरोध केला नव्हता. निर्णय इंदिरा गांधींचाच होता. जनरल अरुण वैद्य यांनी संपूर्ण लष्करी कारवाई अचूकपणे पार पाडली. त्यांच्या कार्याचे कौतुकही केले गेले. दुर्दैवाने त्यांनाही यामध्ये हौतात्म्य आले.
चिदंबरम यांचे विधान एक वेगळाच मुद्दा समोर आणणारे ठरले आहे. काँग्रेसने आपल्या सात दशकांच्या इतिहासात केलेल्या असंख्य चुका यामुळे पुन्हा एकवार ऐरणीवर आल्या आहेत. अर्थातच, त्या चुका काँग्रेसने कधी मान्य केल्या आहेत का? हा प्रश्न कायम राहतो. राजकीय सोयीसाठी त्या काळात परिस्थिती वेगळी होती, असे सांगून या चुकांवर पांघरूण घातले गेले. चीनकडून भूभाग गमावण्याचा नेहरूंचा निर्णय आज देशाला किती महागात पडला, हे नव्याने नमूद करायला नको. काश्मीर प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघात नेत, त्याचे आंतरराष्ट्रीयीकरण काँग्रेसनेच केले. ‘गरिबी हटाव’च्या नावाखाली भारतीय अर्थव्यवस्थेला दशकानुदशके दावणीला बांधले गेले.
२०१४ सालच्या निवडणुकीतही काँग्रेसने ‘गरिबी हटाव’चाच नारा दिला होता, हे लक्षणीय. भारतीय सुरक्षा दलांचे आधुनिकीकरण दुर्लक्षित ठेवून, देशाच्या सीमांवरील संकटाची तीव्रता वाढवण्याचे पाप काँग्रेसचेच. १९७५ सालची लोकशाहीवर आघात करणारी आणीबाणी लादण्याचा अक्षम्य अपराधही काँग्रेसचाच. काँग्रेसने आपल्या कार्यकाळात भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिलेच आणि अशा भ्रष्टाचार्यांना संरक्षणही. ‘भ्रष्टाचार हाच शिष्टाचार’ असे काँग्रेसी कार्यकाळाबद्दल थोडयात म्हणता येईल. आपल्या गुप्तचर यंत्रणांनी आणलेल्या पाकिस्तानच्या आण्विक कार्यक्रमाची माहिती पाकिस्तानला काँग्रेसच्या सरकारनेच दिली. त्यामुळे पाकिस्तानाने भारताचे तेथे असणारे अनेक असेट शोधून मारले. त्यामुळे पाकिस्तानातील आपली गुप्तचर यंत्रणा कमकुवत झाली.
१९७१ सालच्या युद्धात भारताने जिंकलेला भूभाग पाकला पुन्हा देण्याची जी चूक काँग्रेसने केली, त्याचे परिणाम आजही भारताला भोगावे लागत आहेत. या सर्व निर्णयांमुळे देशाचे प्रचंड नुकसान तर झालेच मात्र, त्या काळातील कोणत्याही काँग्रेसी नेत्याने याची जबाबदारी आजवर स्वीकारलेली नाही.
चुकांचे खापर इतरांवर फोडायचे आणि श्रेय घ्यायला सर्वांत पुढे थांबायचे, हीच काय ती काँग्रेसी परंपरा.