नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला

    14-Oct-2025
Total Views |
   
नाशिक तसे शांत शहर. येथे कधी फार मोठे कलह निर्माण झाले आणि त्याने शहराची शांतता महिनोन्महिने भंग पावली, असे कधी झालेच नाही. अपवादाला तशा थोड्याफार चकमकी किरकोळ स्वरूपात घडल्या. पण, संपूर्ण शहर वेठीस धरले जाईल, इथपर्यंत कोणाची मजल गेली नाही. त्यामुळेच आपल्या गुणवैशिष्ट्यांमुळे जगभर ओळखल्या जाणार्‍या नाशिकने, येथे येणार्‍या प्रत्येकालाच आपल्या स्वभावाप्रमाणे थंडावाच देण्याचे काम मागील काही दिवसांपर्यंत केले. परंतु, विकासाच्या मार्गावर असलेले आणि धार्मिक शहर म्हणून प्रसिद्धी पावलेल्या या ’द्राक्षपंढरी’ला कोणाची नजर लागली की काय, इतकी परिस्थिती सध्या हाताबाहेर जाण्याच्या मार्गावर असल्याचे जाणवत आहे. त्याचे कारणही तसेच आहे. मागील काही दिवसांपासून नाशिकमधील गँगवॉर इतके विकोपाला गेले की, दिवसाढवळ्या खून पडायला लागले आहेत. राजरोस खंडणीसाठी धमकावणे, अपहरणासारख्या घटना घडत होत्या.
 
परिणामी देशभरातील भाविकांसाठी पवित्र कुंभनगरी नाशिकला झाले तरी काय? असा प्रश्न विचारणार्‍यांना उत्तर देण्यासाठी नाशिक शहर पोलिसांनी कंबर कसली. सातपूर येथील एका हॉटेलमधील गोळीबाराचे निमित्त झाले आणि शहर पोलिसांनी राजकीय पाठबळावर गुंडगिरी करणार्‍यांची गठडी वळण्यास सुरुवात केली. आम्हीच सरकार, बॉस, नाना, भाई सूत्रे सारी इथूनच हलतात, अशी कार्यकर्त्यांमार्फत स्वतःचीच पाठ थोपटून घेणार्‍यांना, पोलिसांनी चक्क पोपटासारखे सरळ करत ‘नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’ बोलायला भाग पाडले. कोणीही उठतो हातात कोयता, चाकू, पिस्तूल घेतो, रस्त्यात एखाद्याची मुद्दामहून कळ काढत पैशांची मागणी करतो, विरोध झाल्यास हल्ला केला जातो.
 
एखाद्या दुकानात शिरून हप्ता मागितला जातो, प्रतिकार केल्यास भोसकले जाते. औद्योगिक वसाहतींमध्ये कामगारांची लुटमार केली जाते. या सगळ्यालाच नाशिककर वैतागले होते. अशा सर्व गुंडांना पोलिसांनी आपला खाया दाखवत, या तथाकथित भाईंकडून ’नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला’ असे वदवून घेतले. ही चित्रफित समाजमाध्यमांत फिरू लागल्यावर सर्वसामान्य नाशिककरांनी पोलिसांच्या कारवाईचे स्वागत केले. यातून नाशिक हा कायद्याचाच बालेकिल्ला असल्याचे पोलिसांनी अधोरेखित केले.
 
महापालिका प्रशासनही जोशात
 
एकीकडे नाशिक पोलीस प्रशासन सर्वपक्षीय भाई, दादा, भाऊ, बॉस यांच्या तोंडून ‘नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’ वदवून घेत असतानाच, दुसरीकडे नाशिक महापालिका प्रशासनाच्या अंगातही दहा हत्तींचे बळ संचारले आहे. कधी नव्हे इतके गतिमान होत, सर्वसामान्य नाशिककरांना भेडसावणार्‍या समस्या सोडविण्याच्या उद्देशाने सर्व यंत्रणा तत्पर झाली आहे. सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर आल्याने, आवश्यक विकासकामे वेळेत पूर्ण करून, शहर सुशोभित करण्यासाठी होर्डिंग्जमुक्त करावे असे मनपा प्रशासनाच्या कानीकपाळी ओरडून नाशिककर सांगत होते. जोडीला शहरातील चाळण झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठीही, मनपा कार्यालयावर निवेदनांचा पाऊस पाडला गेला. परंतु, सरकारी काम आणि सहा महिने थांब या म्हणीप्रमाणे, नाशिक शहरात समस्यांनी चांगलेच डोके वर काढले होते.
 
पण, मागील चार ते पाच दिवसांपासून नाशिककर मनपा प्रशासनाच्या गतिमानतेचा सुखद अनुभव घेत आहेत. दोन महिन्यांपूर्वी अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ आणि नाशिक मध्यच्या भाजप आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी प्रशासनाला सोबत घेत, नाशिक शहराचा फेरफटका मारत विविध समस्या सोडविण्याच्या उद्देशाने मनपा आयुक्त मनीषा खत्री यांना अवगत केले होते. त्यामुळेच की काय, पण मनपाच्या अतिक्रमण विभागाने अनधिकृत अतिक्रमणांविरोधात धडक कारवाई करत, मागील चार ते पाच दिवसांत ४५९ ठिकाणची अतिक्रमणे जमीनदोस्त केली.
 
तर दुसरीकडे आयुक्त खत्री थेट रस्त्यावर उतरत रस्त्यांची डागडुजी होत असलेल्या ठिकाणी जाऊन कामाची पाहणी करत आहेत. येणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने शहरात साधु, महंत, भाविक आणि पर्यटक दाखल होतील. त्यामुळे शहरात सांडपाण्याच्या समस्येचा धोका निर्माण होईल. त्यासाठी ११ मलःनिस्सारण प्रकल्पांच्या डागडुजीसाठी केंद्र शासनाचा १६ कोटी, ७५ लाख रुपयांचा निधीही मिळाला आहे. शहरातील वाहतुककोंडी लक्षात घेता, ठिकठिकाणी वाहनतळेदेखील उभारली जाणार आहेत. हे सर्व प्रकल्प जेव्हा सुरू होतील, तेव्हा नाशिककरांच्या समस्या काही प्रमाणात हलया होतील एवढे मात्र नक्की. पण, त्यासाठी महापालिका प्रशासनाने कायमच असे कार्यक्षम राहून त्यांचे कामकाज करावे, हीच सर्वसामान्य नाशिककरांची अपेक्षा आहे.