सापाड, उंबर्डे, गंधारे, गौरीपाडा आदी गावांच्या भूमिअभिलेख नोंदींतील चुकादुरुस्त करण्याची मागणी

भाजपा माजी आमदार नरेंद्र पवार यांची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पत्राद्वारे बैठक घेण्याची मागणी

    14-Oct-2025   
Total Views |
 
Narendra Pawar
 
कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील मौजे सापाड, उंबर्डे, गंधारे, गौरीपाडा तसेच इतर गावांच्या भूमिअभिलेख कार्यालयातील नोंदींमध्ये गंभीर तफावत आढळल्याने यासंदर्भात तातडीने बैठक बोलविण्याची मागणी भाजपा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहून या विषयाची सविस्तर माहिती देत बैठक घेण्याची मागणी केली आहे.
 
 
माजी आमदार पवार यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की संबंधित गावांमधील मूळ सर्वे नंबरच्या नोंदी सिटी सर्वे नंबरप्रमाणे करण्यात आल्या आहेत. मात्र, या प्रक्रियेदरम्यान प्रत्यक्ष जागेवर पाहणी न करता तसेच संबंधित शेतकरी आणि खातेदारांना कोणतीही नोटीस, सूचना किंवा सुनावणी न देता नोंदी करण्यात आल्या आहेत. परिणामी चौकशी नोंदवही, आलेख आणि नकाशांमध्ये अनेक ठिकाणी गंभीर चुका, विसंगती निर्माण झाल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
या सदोष नोंदींमुळे शेतकरी आणि मूळ खातेदारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, न्याय मिळण्यात अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत आपल्या दालनात बैठक आयोजित करण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केली आहे.
 
हेही वाचा : पाकिस्तानचा लाळघोटेपणा पाहून मेलोनींच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले; रिएक्शन कॅमेऱ्यात कैद, Video व्हायरल!
 
तसेच या बैठकीतून सदोष नोंदींचा सखोल आढावा घेऊन योग्य दुरुस्तीच्या उपाययोजना केल्या गेल्यास अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि प्रशासनावरील विश्वासही दृढ होईल अशी भूमिकाही नरेंद्र पवार यांनी व्यक्त केली आहे. सदर विषयांमध्ये महसूल मंत्री यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद आला असून लवकरच सदर विषयात बैठक लावण्याचे आश्वासन महसूल मंत्री यांनी दिले आहे.