मुंबई : (Mumbai Metro) मुंबई मेट्रो लाईन ३ म्हणजेच अॅक्वा लाईनसाठी ( Aqua Line) आता 'व्हॉट्सअॅप' (WhatsApp) आधारित तिकीट सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची चांगलीच सोय झाली आहे. ही सुविधा 'मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) ( Mumbai Metro Rail Corporation) तर्फे 'पेलोकल फिनटेक प्रायव्हेट लिमिटेड' (Pelocal Fintech Private Limited) या कंपनीच्या सहकार्याने सुरू करण्यात आली आहे. या सेवेचा लाभ घेणं अगदीच सोपे असून, यासाठी कोणत्याही प्रकारचा स्वतंत्र अॅप डाऊनलोड करण्याची गरज नाही.
What'sApp वर तिकिट कसे मिळवावे ?
हे तिकीट मिळवण्यासाठी, प्रवाशांना फक्त व्हॉट्सअॅपवर +९१ ९८७३० १६८३६ या नंबरला "हाय" पाठवावे लागेल किंवा स्टेशनवर असलेला क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल आणि क्षणातच क्यूआर आधारित व्हॉट्सअॅप (WhatsApp) तिकीट तयार होईल. शिवाय ही सेवा प्रवाशांना एका व्यवहारात सहा तिकीटे तयार करण्याची परवानगी देते, असे एमएमआरसीने सोमवारी दि. १३ ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. दरम्यान, या सुविधेमुळे तिकिट व्यवहारातील गतिशीलता वाढणार असून, यामध्ये यूपीआय-आधारित पेमेंटसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही, तर कार्ड व्यवहारांसाठी किमान शुल्क लागू असेल," असेही त्या पत्रकात म्हटले आहे.
"हा उपक्रम म्हणजे, मुंबईतील नागरिकांना अखंड, कार्यक्षम आणि शाश्वत प्रवास अनुभव देण्याच्या एमएमआरसीच्या वचनबद्धतेचा एक भाग आहे. व्हॉट्सअॅप (WhatsApp) हे माध्यम सर्वत्र मोठ्या प्रमाणात वापरले जाते, याचा वापर तिकिट खरेदीसाठी करणे, हे मुंबईकरांसाठी अधिक सोयीस्कर होणार आहे", असे एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी सांगितले.