मालदीव तसे बघायला गेल्यास एक लहान राष्ट्र! मात्र, याच मालदीवने नुकताच एक ऐतिहासिक टप्पा गाठत, जगाला त्या यशाची दखल घेण्यास भाग पाडले आहे. ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या मान्यतेनुसार, आईकडून नवजात शिशूंमध्ये होणारे एचआयव्ही, सिफिलिस आणि हिपॅटायटिस बी या तीन गंभीर संसर्गजन्य रोगांचे संक्रमण पूर्णपणे रोखणारा हा पहिला देश ठरला आहे. मालदीवसारख्या लहान बेटसदृष्य राष्ट्राचे हे यश आज संपूर्ण जागतिक आरोग्य यंत्रणेसाठीच एक प्रेरणादायी टप्पा ठरले आहे.
संसर्गजन्य रोगांवर मात करण्यासाठी संशोधनाची, विविध पद्धतींच्या विकासाची आज गंभीर गरज जगभरात आहे. ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या अहवालानुसार, सध्या जगभरात साडेतीन-चार लाख नवजात बालकांमध्ये दरवर्षी एचआयव्हीचा संसर्ग होतो. सुमारे दोन लक्ष नवजात मुलांचा मृत्यू सिफिलिसमुळे होतो, तर हिपॅटायटिस बीचा संसर्ग अंदाजे ४२ दशलक्ष लोकांवर परिणाम करत आहे. या रोगांमुळे दीर्घकालीन आजारांचा सामना करावा लागतो. त्यामुळे सामाजिक आणि आर्थिक तणावाचाही सामना त्या रुग्णांना आणि पडतो. त्यामुळेच यासंदर्भात मालदीवने साधलेले यश जागतिक आरोग्य क्षेत्रासाठी एक नवीन दिशादर्शक ठरते आहे.
मालदीवच्या यशामागे सर्वसमावेशक आरोग्य धोरणातील सातत्य आणि गुणवत्तापूर्ण अंमलबजावणी महत्त्वाची ठरली आहे. आज मालदीवमध्ये प्रत्येक गरोदर महिलेची पहिल्या त्रैमासिकात तपासणी केली जाते. कोणत्याही रोगाचे तातडीने निदान झाल्यास त्यावर लगेच उपचार सुरू होतात. नवजात बालकांनाही जन्माच्या २४ तासांत हिपॅटायटिस बी लस देणे अनिवार्य केले गेले आहे. सिफिलिससाठी नियमित रक्त तपासण्या आणि पेनिसिलिन थेरपीचा उपयोग करून नवजात बालकांमधील संसर्गाचे प्रकरण शून्यावर नेण्यात मालदीवला यश लाभले आहे. यशाची ही पद्धत वैद्यकीय प्रोटोकॉल, सामाजिक सहभाग, निगराणीतील सातत्य या त्रिकूटावर आधारलेली आहे.
वैद्यकीय दृष्टिकोनातून हे यश ‘डेटा-ड्रिव्हन’ धोरणांचेही यश आहे. मालदीवने राष्ट्रीय आरोग्य डेटाबेस आणि इलेट्रॉनिक रेकॉर्डिंगच्या माध्यमातून प्रत्येक तपासणी व लसीकरणाच्या परिणामांची नोंद ठेवली आहे. त्यामुळे रिअल-टाईम मॉनिटरिंगमुळे धोरणात्मक सुधारणा तातडीने करणे शक्य होते. तसेच, आरोग्य कर्मचार्यांचे प्रशिक्षण, समाजामध्ये जागरूकता वाढवणे आणि मातृ-शिशु स्वास्थ्य केंद्रांच्या सातत्यपूर्ण सेवांमुळे मालदीवच्या या आरोग्य उपक्रमाची परिणामकारकता उच्च राहिली आहे.
मालदीवचे यश जागतिक आरोग्य धोरणावर दीर्घकालीन परिणाम घडवू शकते. मालदीवच्या यशामुळे विकसनशील देशही योग्य धोरण, गुणवत्ता आणि सामाजिक सहभागातून आरोग्यातील मोठ्या समस्यांना रोखू शकतात, हाच संदेश आज जगात गेला आहे. सामाजिक दृष्टीने या यशामुळे नागरिकांचा आरोग्यव्यवस्थेवरचा विश्वास वाढतो, त्यामुळे अधिक सक्रिय सहभागाची प्रेरणा मिळते आणि नवजात मुलांसाठीचे सुरक्षित व निरोगी भविष्यही सुनिश्चित होते. आर्थिक दृष्टिकोनातूनही हे यश महत्त्वाचे आहे. संसर्गजन्य रोगांमुळे होणारा दीर्घकालीन उपचार खर्च कमी होतो, आरोग्य सेवा प्रणाली अधिक सक्षम बनते आणि देशाच्या आरोग्य धोरणावर दीर्घकालीन बचत होते.
मालदीवच्या अनुभवातून एक महत्त्वाचा संदेश स्पष्ट होतो, आरोग्य सेवा आणि धोरण फक्त सरकारी प्रयत्नांवर अवलंबून नसतात; समाजाचा सहभाग आणि जागरूकता आवश्यक आहे. वैश्विक आरोग्य अभ्यासकांनी या यशाकडे पूर्वग्रहदूषित नजरेने न पाहणे आवश्यक आहे. मालदीवचे यश जागतिक संसर्गजन्य रोग प्रतिबंधासाठी एक आदर्श मॉडेल ठरू शकते. भविष्यात याच तत्त्वांचा वापर करून जगभरातील अनेक देश नवजात मुलांमध्ये संसर्गजन्य रोगांचे प्रसार कमी करू शकतात.
त्यामुळेच आता आरोग्यही काही फक्त विकसित देशांची मक्तेदारी राहिलेली नाही. मालदीवसारखे देशही आता विविध प्रयोगांतून जागतिक आरोग्य व्यवस्थेमध्ये सक्रिय योगदान देत आहेत. त्यामुळे नजीकच्या काळात अनेक रोगांवर विकसनशील राष्ट्रांकडून उत्तम उपाययोजना पुढे आलेल्या निश्चितच दिसतील. मालदीवचे यश निश्चितच आरोग्य व्यवस्थेच्या क्षेत्रात लहान देशांसाठी उषःकाल ठरणार आहे.
- कौस्तुभ वीरकर