‘चंद्रावर यान पाठविण्यापेक्षा आधी ते रस्त्यावरचे खड्डे बुजवा!’ अशी अवैज्ञानिक, असबद्ध बडबड करणार्यांची आपल्या देशात कमी नाहीच! पण, मोदी सरकार अंतराळापासून ते अंटार्क्टिकापर्यंत संशोधनाला व्यापक गती देत आहे. नुकतीच अर्थमंत्रालयाने ‘मैत्री-२’ या अंटार्क्टिका मोहिमेला मंजुरी दिली. त्यानिमित्ताने...
१७ हजार वर्षांपूर्वीची गोष्ट... संपूर्ण पृथ्वी हिमाच्छादित होती. जिथे नजर जाईल, तिथंवर फक्त पांढरीशुभ्र पसरलेली बर्फाची चादर. पण, त्यावेळी हिमयुगात अंटार्टिकाच्या किनार्यावर काहीतरी नाट्यमय घडले. समुद्रातील बर्फ वितळून पुन्हा खंडाकडे परत येत असताना, समुद्रातील दाब कमी झाला, ज्यामुळे खोल समुद्रात कार्बनडाय ऑसाईड अडकवण्याची नैसर्गिक प्रक्रिया मंदावली. परिणामी, पृथ्वीचे तापमान नाट्यमयरित्या वाढले आणि हिमयुगाचाच तो शेवट ठरला. या भौगोलिक घटनेवरून दक्षिण ध्रुवावरील अंटार्टिका खंडाचे पृथ्वीसाठीचे महत्त्व लक्षात यावे.
शाळेत भूगोलाच्या अभ्यासामुळे नकाशावर अंटार्टिका खंडाचे जागतिक स्थान आपल्याला ठावूक असते. पण, या दक्षिण ध्रुवीय खंडाच्या पृथ्वीच्या वातावरणीय आणि जैवविविधतेच्या दृष्टिकोनातील महत्त्वाची मात्र फारशी कल्पना सर्वसामान्यांना नसते. तर असा हा अंटार्टिका खंड आकारमानानुसार जगातील पाचवा सर्वांत मोठा खंड. त्यातही पृथ्वीवरील सर्वांत मोठा हिमखंड असाही या खंडाचा लौकिक! या खंडावर केवळ समुद्रातीलच नव्हे, तर जमिनीवरील बर्फही आढळून येतो. म्हणूनच सर्वांत मोठा गोठलेला गोड्या पाण्याचा बर्फही याच अंटार्टिकात. उन्हाळा आणि हिवाळा अशा दोन्ही ऋतूंत तापमानानुसार बर्फाच्या पातळीतही इथे लक्षणीय बदल होतात. येथील तापमान उणे ९३ अंश सेल्सियस ते अधिक नऊ अंश सेल्सियसपर्यंत.
अंटार्टिकाच्या भूमीवर कित्येक मैल जाडीचे बर्फाचे थर आढळतात. या बर्फाचा वापर पृथ्वीचा वातावरणीय इतिहास जाणून घेण्यासाठीही तितकाच उपयुक्त ठरतो. आतापर्यंत अंटार्टिकामध्ये दोन मैल खोल खोदकाम केले गेले. त्या खोलीवरील बर्फाचा जेव्हा अभ्यास केला गेला, तेव्हा सापडलेला बर्फ तब्बल आठ लाख वर्षांपूर्वीचा असल्याचे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. त्यामुळे एकूणच पृथ्वीच्या उत्पत्तीचा मागोवा घेण्यासाठी, बारकाईने अभ्यास करण्यासाठी अंटार्टिका खंडाचाही अभ्यास ओघाने आलाच. म्हणूनच विविध देशांच्या शास्त्रज्ञांची पथके ही अंटार्टिकामध्ये ठाण मांडून असतात. कारण, या खंडावर अंटार्टिका कराराप्रमाणे कोणत्याही एका देशाची मालकी नाही.
खंडाच्या भूभागावर सैन्य तैनाती असेल किंवा आण्विक अथवा अन्य कोणत्याही प्रकारच्या शस्त्रास्त्रांचे स्फोट घडविणे, चाचण्या घेणे, खनिज उत्खनन करणे यावरदेखील सक्त बंदी. तसेच, हा खंड जैवविविधतेच्या बाबतीतही तितकाच संवेदनशील. या खंडावरील अतिशीत आणि शुष्क वातावरण सहन करणारे सजीवही मर्यादित. त्यातच काही पेंग्विन, सील, व्हेल मासे, वनस्पतींच्या प्रजाती या फक्त अंटार्टिका खंडातच आढळून येतात. असे या खंडाचे जागतिक महत्त्व लक्षात घेता, इथे संशोधन मोहिमा राबविण्यासाठी विकसित राष्ट्रांपासून ते अगदी विकसनशील राष्ट्रांपर्यंत शास्त्रज्ञांचीही तितकीच लगबग असते.
अमेरिका, रशिया, चीन, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नॉर्वे, जपान, द. आफ्रिका, पोलंड, बेल्जियम यांसारख्या कित्येक देशांचे अंटार्टिकामध्ये संशोधन तळ आहेत. भारतानेही ८०-९०च्या दशकात अंटार्टिका शोधमोहिमांचे वैज्ञानिक महत्त्व लक्षात घेता, १९८१ साली संशोधनाची सुरुवात केली. भारत सरकारच्या ‘पृथ्वी विज्ञान मंत्रालया’च्या अंतर्गत ‘राष्ट्रीय ध्रुवीय एवं समुद्री अनुसंधान केंद्र’ या संस्थेच्या अंतर्गत अंटार्टिका संशोधनाची मोहीम राबविली जाते. १९८३ साली भारताने अंटार्टिकावर ‘दक्षिण गंगोत्री’ या नावाने पहिले संशोधन केंद्र स्थापन केले. १९९० साली हे केंद्र बंद करण्यात आले. त्यानंतर ‘मैत्री’ आणि ‘भारती’ अशी भारताची दोन संशोधन केंद्रे अंटार्टिकामध्ये उभी राहिली. त्याचबरोबरच ‘हिमाद्री’ नावाचे आणखी एक केंद्रही होते. ‘मैत्री’ केंद्र १९८९ साली, ‘भारती’ केंद्र २०१२ साली सुरू झाले. आता भारताने ‘मैत्री-२’ या केंद्राची स्थापना करण्याचा निर्णय घेतला असून, हे केंद्र २०२९ साली कार्यान्वित होईल. पण, या सगळ्या केंद्रांवर आजवर झालेला खर्च पाहता, भारतीयांनी नेमके काय संशोधन केले, तेही समजून घेणे क्रमप्राप्त.
अंटार्टिकावरील भारतीय शास्त्रज्ञांच्या चमूने २०१७ साली नवीन प्रकारच्या वनस्पतीच्या प्रजातीचा शोध लावला होता. तसेच ‘मैत्री’ केंद्रावरील शास्त्रज्ञांनी केलेल्या ओझोनच्या अभ्यासाअंती असे आढळून आले की, वातावरणातील ओझोनचे छिद्र कमी होण्याची प्रक्रिया जितया वेगाने आर्टिकवर घडते, तितयाच वेगाने ती अंटार्टिकावर घडताना दिसत नाही. त्याबरोबरच नव्याने शोध लागलेल्या २४० नव्या मायक्रोबॅटेरियांच्या प्रजातींपैकी ३० प्रजातींचा शोधदेखील भारतीय शास्त्रज्ञांनी लावला. अंटार्टिकातील चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास, सूर्यग्रहणावेळी सावल्यांच्या पट्ट्यांचे निरीक्षण यांसारखे कित्येक महत्त्वपूर्ण शोध आजवरच्या अंटार्टिकामधील ३० हून अधिक वैज्ञानिक मोहिमांमध्ये भारताच्या नावावर आहेत.
आता याच ‘मैत्री’ केंद्राच्या जवळ ‘मैत्री-२’ केंद्र उभे राहणार असून, ९० संशोधकांना इथे वास्तव्य करून अंटार्टिकावर अधिक खोलवर संशोधन करता येणार आहे. या संशोधन केंद्राचे कामकाज चालविण्यासाठी अक्षय ऊर्जास्रोतांचा वापर होणार असून, उन्हाळी मोहिमांसाठी सौरऊर्जा आणि अंटार्टिकावर वाहणार्या जोरदार वार्यांचा वापर पवनऊर्जानिर्मितीसाठी केला जाईल. तसेच, या संशोधन केंद्रावर स्वयंचलित उपकरणे तैनात करण्याची योजना आहे, जी डेटाची नोंद घेईल आणि तो भारताच्या मुख्य भूमीवर पाठवेल. एकूणच या नवीन केंद्रामुळे हवामान बदल, हिमनदीशास्त्र आणि जैवविविधता यांसारख्या क्षेत्रांतही प्रगत अभ्यासाच्या संधी खुल्या होणार आहेत, ज्यामुळे अंटार्टिकासारख्या गोठलेल्या खंडावरील भारताच्या संशोधन क्षमतांमध्येही निश्चितच वाढ होईल.
खरं तर कुठल्याही देशाच्या प्रगतीचे मोजमाप हे केवळ आर्थिक निकषांवर आधारित नसते, तर तो देश विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन आणि विकास या क्षेत्रांतही किती पुढारलेला आहे, यावरूनही त्या देशाच्या प्रगतीचा आलेख ठरत असतो. मोदी सरकारच्या काळातही अंतराळ प्रगतीबरोबरच अन्य वैज्ञानिक मोहिमांकडे विशेषत्वाने लक्ष केंद्रित केले गेले. गेल्या दशकात भारताचा संशोधन आणि विकासावरील सकल खर्च (ॠएठऊ) जो २०१३-१४ साली ६० हजार, १९६ कोटी रुपये इतका होता, तो आता १.२७ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. हे सत्य असले, तरी भारतात संशोधन आणि विकासावर एकूण ‘जीडीपी’च्या एक टक्क्यांपेक्षा (०.६४ टक्के) कमी खर्च केला जातो. विकसित देशांमध्ये हे प्रमाण दोन ते पाच टक्क्यांच्या घरात आहे. त्यामुळे अंतराळापासून ते अंटार्टिकापर्यंत भारताच्या वैज्ञानिक प्रगतीचा आलेख भविष्यात निश्चितच उंचावणारा असला, तरी आणखीन फार मोठा टप्पा भारताला गाठायचा आहे, हेही खरे!