अखेर ‘मनाचे श्लोक’चं नाव बदललं

    14-Oct-2025
Total Views |


मुंबई : ‘मनाचे श्लोक' हा चित्रपट मागचे काही दिवस प्रचंड वादाच्या भोवऱ्यात अडकलेला पाहायला मिळाला. चित्रपटाच्या नावावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. मृण्मयी देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित चित्रपट हा चित्रपट आता नव्या नावासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘तू बोल ना’ असं या सिनेमाचं नवं नामकरण करण्यात आलं आहे.

याआधी या चित्रपटाचे नाव ‘मना’चे श्लोक’ असं होतं. पण सज्जनगड समर्थ सेवा मंडळ आणि हिंदू जनजागृती समिती याशिवाय काही संघटनांच्या वतीने चित्रपटाचा निषेध नोंदवण्यात आला होता. तसेच प्रदर्शन थांबवण्याचा प्रयत्न केला गेला. आणि या सगळ्याप्रकारानंतर अखेर चित्रपटाचं नाव आता बदलण्यात आलं आहे.


राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या ‘मनाचे श्लोक’ धार्मिक ग्रंथाच्या नावाचा वापर करून त्याच नावाने मराठी चित्रपटाची निर्मिती करणे, म्हणजे हिंदूंच्या श्रद्धेचा बाजार मांडणे आहे. शासन आणि सेन्सॉर बोर्डाने याची तातडीने गंभीर दखल घेऊन 'मनाचे श्लोक' हे नाव चित्रपटाच्या शीर्षकातून हटवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली होती.‌ त्याचबरोबर चित्रपटाचे नाव न बदलल्यास चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा स्पष्ट इशाराही समितीद्वार देण्यात आला होता.

त्यानंतर पुणे तसेच अन्य काही ठिकाणी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर निषेध नोंदवण्यात आला होता. तसेच शो देखील बंद पाडले होते. त्यानंतर आता नव्या नावाने सिनेमा १६ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात मृण्मयी देशपांडे, राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब अशी तरुणांची तगडी फळी झळकणार आहे. तसेच लीना भागवत, मंगेश कदम, शुभांगी गोखले आणि उदय टिकेकर हे ज्येष्ठ कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.