भगवान बिरसा मुंडा आणि तंट्या भिल्ल यांना आदर्श मानत समाजासाठी कार्य करणारे डॉ. कुंडलिक चिंधू पारधी, आज महादेव कोळी समाजाचे आदर्श आहेत. त्यांच्या जीवनाचा मागोवा घेणारा लेख...
रिबीच्या त्रासाने सखुबाई यांनी अडीच वर्षांच्या आणि आठ महिन्यांच्या दोन लहान मुलांना घेऊन विहिरीत जीव दिला. पाच वर्षांचा मोठा मुलगा मात्र नेमका तिथे नव्हता. त्यामुळे तो वाचला. मामाने मुलाला वसतिगृहात शिकायला पाठवले. पण, ते पाठवणे पाठवणेच होते. त्या मुलाला सहसा कुणीही ना बघायला आले, ना भेटायला. मायेचे दोन शब्द, ममतेने आपुलकीने कुणीतरी समजून घेणे यासाठीही हा बालक पोरका झाला. हाच तो बालक आज गरजू, गरीब, होतकरू विद्यार्थ्यांचा भक्कम आधार ठरला आहे. ते आहेत कलाशाखेतील पदव्युत्तर शिक्षण, ‘नेट’, ‘सेट’, ‘डीएड’, ‘बीएड’, ‘डॉक्टरेट’ पुढे ‘पोस्ट डॉक्टरेट’पर्यंतचे शिक्षण घेऊन पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयामध्ये प्राध्यापक असलेले डॉ. कुंडलिक चिंधू पारधी. भयाण चक्रात अडकलेल्या कितीतरी विद्यार्थ्यांना त्यांनी पुन्हा शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणले. आज तेच विद्यार्थी सरकारी आणि खासगी क्षेत्रात मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत.ग्रामीण भागातून मुलं शहरात शिकायला येतात. मात्र, घरची गरिबी आणि शैक्षणिक संधीबाबतचे अज्ञान यामुळे ते अनेकवेळा शिक्षण अर्धवट सोडतात. या विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठीची डॉ. कुंडलिक यांची भूमिका मोठी आहे.
महादेव कोळी समाजाचे चिंधू आणि सखूबाई हे मूळचे अकोला जिल्ह्यातले ढेगेवाडीचे. आदिवासी समाजाचे सगळेच प्रश्न या कुटुंबीयांच्या घरातही ठाण मांडून. या सगळ्याला कंटाळून सखुाबाईंनी दोन लेकरांसह आत्महत्या केली. चिंधू यांनी दुसरे लग्न केले. पण, या सगळ्या चक्रव्युहात सापडलेल्या कुंडलिक हे दहावीपर्यंत वसतिगृहात शिकले. यादरम्यान खेळाडू म्हणून विशेष लौकिक आणि प्राविण्यही मिळवले. हे सगळे करत असताना त्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊन ते चार विषयांत अनुत्तीर्ण झाले. यावर काही लोकांचे म्हणणे होते, "तू काय शिकणार? आयुष्यात कधी दहावी पास होणार नाहीस, लिहून घे.” अनुत्तीर्ण झाल्यामुळे त्यांना वसतिगृहही सोडावे लागले. कुठे राहणार, काय करणार आणि कसे शिकणार? त्यावेळी रा. स्व. संघाचे प्रचारक महेश पोहनेरकर कुंडलिक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी तालुक्याच्या संघकार्यालयात त्यांची राहायची व्यवस्था केली. दरम्यान, कुंडलिक यांनी एका हॉटेलमध्ये साफसफाईची नोकरी पत्करली. सकाळी ८ ते सायंकाळी ६ या बदल्यात त्यांना दोन वेळचे जेवण आणि थोडेफार पैसेही मिळू लागले. कुंडलिक यांनी हॉटेलवाल्याला विनंती केली की, मधले दोन तास त्यांना दररोज सुट्टी द्यावी. यावेळेत त्यांनी दहावीच्या अभ्यासासाठी खासगी शिकवणी लावली. या शिकवणीचे शुल्क भरणे शक्यच नव्हते.
म्हणून मग कुंडलिक यांनी खासगी शिकवणी घेणार्यांना विनंती केली की, ते वर्ग भरण्याआधी आणि सुटल्यानंतर ते वर्गखोली स्वच्छ करतील. केरकचरा काढतील. त्या मोबदल्यात ते शिकवणीमध्ये शिकतील. इतरही काही काम करतील. ते स्वतः शिकत आणि रात्री अशाच प्रकारे शिक्षण सोडलेल्या मुलांची विनाशुल्क शिकवणी घेत. यातून अनेक विद्यार्थ्यांनी शैक्षणिक यश मिळवले आणि ते आज अनेक क्षेत्रांत प्रगतिपथावर आहेत. अशा प्रकारे याच काळात रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांशी, विशेषतः ‘वनवासी कल्याण आश्रमा’शीही संपर्क होत होता. रा. स्व. संघाचे शशिकांत रसाळ नेहमी प्रेरणादायी कथा सांगत. त्यातून कुंडलिक यांना प्रेरणा मिळे. त्यामुळेच उच्चशिक्षणासाठी त्यांनी नाशिक येथे ‘डीएड’, ‘बीएड’ केले आणि पुण्यात त्यांनी ‘एमफील’ केले आणि ‘पीएच.डी.’ही केली. त्यांनी पाहिले होते की, मुलं गावाहून शिक्षणासाठी येतात. पण, खर्च न झेपल्याने शिक्षण अर्धवटच सोडतात, निराश होऊन व्यसनाधीनही होतात. पुंडलिक यांनी ओळखीने केटरिंगची ऑर्डर घेणे सुरू केले. केटरिंगच्या माध्यमातून अशा शेकडो मुलांना त्यांनी रोजगार प्राप्त करून दिला. आज त्यातली काही मुलं प्रशासकीय सेवेत मोठ्या पदावर आहेत.
पुढे त्यांना न्यायालयात शिपाईची नोकरी लागली. एकदिवशी न्यायाधीशांना माहिती पडले की, कुंडलिक ‘पीएच.डी.’ झालेले आहेत. ते कुंडलिक यांची गळाभेट घेत म्हटले, "अरे इतका शिकलास; मेहनती आहेस; तुला चांगली प्राध्यापकाची नोकरी मिळेल.” कुंडलिक यांनी प्राध्यापकाच्या नोकरीसाठी प्रयत्न सुरू केले. एका विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे त्यांनी शिपाईची नोकरी सोडली. पण, नेमके त्याचवेळी ‘कोरोना’ आल्याने महाविद्यालयातील भरती रद्द झाली. कुंडलिक यांनी ठरवले की, पुण्यात प्राध्यापकाची नोकरी करायची. त्यासाठी पुणे विद्यापीठामधून त्यांनी ‘पोस्ट डॉक्टरेट’ शिक्षण पूर्ण केले. या सगळ्या संघर्षात पत्नी सीता यांची समर्थ साथ लाभली. डॉ. कुंडलिक यांना शोषित-वंचित समाजाचा उच्चशिक्षणातील टक्का वाढावा, यासाठी आयुष्यभर काम करायचे. खरंच जीवनाचा संघर्ष आणि त्या संघर्षातही त्यांनी जपलेली मानवता दिसली की, नतमस्तक व्हायला होते. त्यांच्या जीवनाबद्दल वाटते की,
भाकरीचा चंद्र शोधतानाही
सूर्य जपला अंतराम्यातला
जमिनीचे बंध जपले अन् तरीही
गवसणी घातली आकाशाला॥