जेरुसलेम : (Donald Trump) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इस्त्रायलचा सर्वोच्च नागरी सन्मान दिला जाणार आहे. इस्रायल-हमास संघर्षाबाबतीत ट्रम्प (Donald Trump) यांच्या निर्णायक भूमिकेची दखल घेत इस्त्रायल कडून 'प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ ऑनर' हा पुरस्कार दिला जाणार आहे. खरंतर जगातील आठ युद्धे आपण थांबवली असे म्हणत ट्रम्प (Donald Trump) यांनी थेट नोबेल शांतता पुरस्कारासाठी दावा केला होता. मात्र हा सन्मान जरी त्यांना मिळाला नसला तरी इस्त्रायलकडून त्यांना सन्मान दिला जाणार आहे.
राष्ट्रपती पदकाने सन्मानित केले जाणार
इस्रायलचे अध्यक्ष आयझॅक हर्झोग यांनी सोमवारी यासंदर्भात घोषणा केली. आयझॅक हर्झोग यांनी त्यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांच्या अथक प्रयत्नांद्वारे केवळ आपल्या प्रियजनांना घरी परत आणण्यास मदत केली नाही तर सुरक्षा, सहकार्य आणि शांततापूर्ण भविष्यासाठी खऱ्या आशेवर आधारित मध्य पूर्वेतील एका नवीन युगाचा पाया रचला आहे. त्यांना इस्रायली राष्ट्रपती पदकाने सन्मानित करणे हा माझा मोठा सन्मान असेल. येत्या काही महिन्यांत हा पुरस्कार प्रदान केला जाईल."
इस्रायलचा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार 'प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ ऑनर' हा अशा व्यक्तींना दिला जातो, ज्यांनी इस्रायलसाठी किंवा मानवतेसाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे. माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना यापूर्वी २०१३ मध्ये हा सन्मान मिळाला होता.