(Image Credit : CM Devendra Fadnavis's Facebook)
मुंबई : (CM Devendra Fadnavis) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून आढावा बैठक घेतली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी आज अमरावतीत माध्यमांशी बोलताना सांगितलं की, “जिथे शक्य तिथे युती, नाहीतर समोरा-समोर लढू, तसेच मित्र पक्षांवर टीका करु नये”, असे निर्देश दिल्याचंही स्पष्ट केलं आहे.
युतीबाबत मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
“एकूणच कार्यकर्त्यांची मानसिकता आणि तयारी चांगली आहे. निवडणुकीसाठी पक्ष सज्ज आहे. ज्याप्रकारे निवडणुका लढण्याचा प्रयत्न आहे, त्यानुसार निर्देश दिले जातील. युतीच्या संदर्भातही आम्ही जे अधिकार आहेत, ते देत आहोत. जिथे शक्य आहे तिथे युती केली पाहिजे, असे निर्देश दिले आहेत. एखाद्या ठिकाणी युती झाली नाही, तरी मित्रपक्षावर टीका करु नये, असे निर्देश दिले आहेत. मला वाटतं महायुती म्हणून आमच्या तिन्ही पक्षांना चांगलं यश मिळेल”, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला आहे.
आढावा बैठकीसंदर्भात काय म्हणाले मुख्यमंत्री?
“अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी संपूर्ण महाराष्ट्रात विभागानुसार दौरे लावले आहेत. महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका, नगर पंचायती याच्या निवडणुका आहेत. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या (Local Body Elections) निमित्ताने आढावा घेण्याकरिता या आढावा बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. आमचे यापूर्वी मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र हे चार विभाग पूर्ण केले आहेत. आता अमरावतीचा विभागाचा आमचा आढावा आज संपतोय. आणि संध्याकाळी नागपूर केल्यानंतर केवळ मुंबई महानगरपालिका विभाग बाकी राहील, जी आम्ही पुढच्या आठवड्यात करु, असं मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितलं.
बोगस मतदानासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
शिक्षक मतदार संघातील बोगस मतदाना संदर्भात आमच्याकडे एक तक्रार आलेली आहे. ती तक्रार आम्ही निवडणूक आयोगाकडे दिली आहे. यावेळेस आम्ही पूर्णपणे लक्ष ठेवून आहोत. की कुठल्याही परिस्थितीत असे खोटे मतं नोंदवून कोणालाही निवडणूक लढता येऊ नये, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.